भारताला लाभलेला द्रष्टा अन् मुत्सद्दी नेता!
By Admin | Updated: December 12, 2015 00:08 IST2015-12-12T00:08:22+5:302015-12-12T00:08:22+5:30
पवार साहेबांच्याच कारकिर्दीत १९९४ मध्ये मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाले.

भारताला लाभलेला द्रष्टा अन् मुत्सद्दी नेता!
राजेंद्र्र दर्डा, एडीटर इन चिफ, लोकमत
पवार साहेबांच्याच कारकिर्दीत १९९४ मध्ये मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नामांतर झाले. ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्याची अनेक वर्षे औरंगाबादेत घालविली, वंचितांसाठी शिक्षणाची सोय केली, त्यांचे नाव येथील विद्यापीठाला देणे आवश्यकच होते. ते त्यांनी अतिशय निश्चयपूर्वक केले. पवार साहेबांच्या राजकीय व सामाजिक कारकिर्दीतील हा सर्वांत मोठा निर्णय ठरला. महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांनी घेतलेले निर्णय मैलाचे दगड ठरले. त्यांच्या पुढाकारातूनच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना हक्काचे आरक्षण मिळाले. कोणतेही दारुदुकान मतदानाद्वारे बंद करण्याचा हक्क त्यांनी महिलांना बहाल केला.
अमृत महोत्सवी वर्ष ओलांडून पवार साहेब आज वयाच्या ७६ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. महाराष्ट्राची विधानसभा असो की भारतीय संसद, सलग ४८ वर्षे पवारांच्या संसदीय कारकिर्दीत एक दिवसही खंड पडलेला नाही. साठच्या दशकात राज्यातल्या तरूण पिढीवर स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे राजकीय संस्कार केले त्या बेरजेच्या राजकारणाचा देदीप्यमान वारसा शरदराव पवारांनी महाराष्ट्रातच नव्हे तर राष्ट्रीय राजकारणातही मनापासून जपला आहे. सध्या तरी पवार साहेबांइतका मुत्सद्दी, धोरणी, द्रष्टा आणि भारतीय राजकारणाचे मर्म जाणणारा नेता, महाराष्ट्रात अन्य कोणत्याही पक्षात नाही. एका अर्थाने महाराष्ट्रात विद्यमान राजकीय नेतृत्वाच्या सर्वपक्षीय पिढीचे ते एकमेव ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत.
पवारांची वैचारिक जडणघडण दीर्घकाळ काँग्रेस पक्षातच झाली. १९७८ पासून मात्र त्यांच्या राजकीय कारकिर्दीत काही महत्वाची स्थित्यंतरे आली. राजकारणात आणि राज्यकारभारात पवारांचे बरेच निर्णय अनेकदा कोड्यात टाकणारे ठरले. प्रत्येक घटनेनंतर राजकीय विश्लेषकांनी त्याचे तऱ्हतऱ्हेने विश्लेषण केले. तथापि प्रत्येक प्रसंगात पवार स्थितप्रज्ञ राहिले. निवडणुकांच्या आखाड्यात, राजकीय समरांगणात परस्परांवर विखारी हल्ले चढवल्यामुळे प्रतिस्पर्ध्यामधे काही काळ कटुता येते हे खरे, पण वैचारिक मतभिन्नता हे राजकारण्यांच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. जनतेच्या दु:खाच्या, विषण्णतेच्या, आनंदाच्या, उत्सवांच्या प्रसंगात सर्व राजकारण्यांनी एकजुटीने ठामपणे त्यांच्या मदतीला उभे राहिले पाहिजे, इतरांच्या विचारांचा अन् मतभेदांचा सन्मान केला पाहिजे, ही राजकीय शिकवण अलीकडे काहीशी धूसर होत चालली आहे. पवारांनी स्वत: मात्र कायम त्याचे भान ठेवले.
राज्यकारभारात पवारांचे द्र्रष्टेपणही त्यांच्या काही खास निर्णयात जाणवते. बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर १९९३मध्ये मुंबईत मोठी दंगल उसळली आणि महिनाभराने बॉम्बस्फोटांची मालिकाही या महानगराने अनुभवली. पवार साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते. घटनेनंतर क्षणाचीही उसंत न घेता त्यांनी वेगाने निर्णय घेतले, अवघ्या २४ तासात मुंबई सावरली व पूर्ववत कामाला लागली. तथापि पवार तेवढयावर समाधानी नव्हते. एकेकाळी औद्योगिक राजधानी असलेल्या मुंबईचा झटपट कायापालट झाला पाहिजे, ही त्यांची महत्वाकांक्षा होती. यातूनच बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) या बिझिनेस डिस्ट्रिक्टची उभारणी झाली. या कॉम्प्लेक्समध्ये जगातल्या तमाम बँकांच्या शाखा, केंद्रीय स्तरावरील वित्तीय संस्थांची कार्यालये, नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई)चे मुंबईतील कार्यालय अशा अर्थकारणातील अनेक महत्वाच्या संस्था पवारांच्या वेगवान हालचालींमुळे मुंबईत दाखल झाल्या.
पूर्णवेळ राजकारण करत असतानासुद्धा जीवनातील एकही क्षेत्र असे नाही की, ज्या ठिकाणी पवार साहेबांचा सक्रिय वावर नाही. कृषी, उद्योग, आधुनिक तंत्रज्ञान या विषयांवर जितकी त्यांची पकड, तितकीच क्रीडा, साहित्य, कला, संस्कृती या विषयातही त्यांना प्रचंड रुची आहे. राजकारणातील एखादी व्यक्ती एकाचवेळी किती संस्था चालवू शकते, याचे उत्तम उदाहरण आहे पवार साहेब! विविध क्षेत्रात काम करणाऱ्या जाणकारांशी त्यांचा होणारा नेहमीचा संवाद यामुळे ते कोणत्याही विषयावर तितक्याच ताकदीने चर्चा करू शकतात अन् निर्णय घेऊ शकतात.
लोकमत वृत्तसमूहाने आजवर अनेक चढउतार पाहिले. विस्तृत लोकमत परिवारावर अनेकदा लोकानी प्रेमाचा वर्षाव केला तर क्वचित प्रसंगी गैरसमजातून उद्भवलेल्या आक्रमक हल्ल्यांनाही तोंड द्यावे लागले. एक प्रसंग या निमित्ताने खास नमूद करावासा वाटतो. वीस वर्षांपूर्वी ९ जून १९९५ रोजी दुपारी तीनच्या सुमारास लोकमतच्या औरंगाबाद कार्यालयावर सिल्लोडच्या शिवसैनिकांनी हल्ला चढवला. सुरक्षा रक्षकांना, संपादकीय विभागातल्या पत्रकारांना शिवीगाळ करत कर्मचाऱ्यांना मारहाण केली. दूरध्वनी, फॅक्स, संगणक, खुर्च्या, टेबल, पंखे अशा कार्यालयातल्या दिसेल त्या वस्तूंची नासधूस केली. कुठे आहेत तुमचे संपादक राजेंद्र दर्डा? असे विचारत हल्लेखोरांनी अक्षरश: धुडगूस घातला. मी व माझी दोन्ही लहान मुले ऋषी व करण त्यावेळी कार्यालयातच होतो. सिंगापूरचे उद्योगपती डॅडी बलसाराही त्यावेळी माझ्यासोबतच होते. हल्ल्यातून सुदैवानेच आम्ही बचावलो. दुसऱ्याच दिवशी सकाळी ११ वाजता काँग्रेसच्या काही नेत्यांसह, तत्कालीन विरोधी पक्षनेते शरद पवार यांनी तडक औरंगाबाद गाठले. लोकमतमध्ये येऊन त्यांनी केवळ आमची विचारपूसच केली नाही तर सर्वांना धीर दिला. राज्यात तेव्हा शिवसेना भाजपा युतीचे सरकार सत्तेवर होते. लोकमतच्या हल्ल्यावरून पवारांनी विधान परिषदेत १८ जुलै १९९५ रोजी पावसाळी अधिवेशनात युती सरकारला धारेवर धरले. विधान परिषदेत नियम २६० अन्वये प्रस्तावावरील चर्चेत लोकमतवरील हल्ल्याचा उल्लेख करीत, राज्यात वृत्तपत्र स्वातंत्र्याला धोका निर्माण झाला आहे, गुंडगिरी व दहशतवादी प्रवृत्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही पवारांनी केली. माध्यमांच्या स्वातंत्र्यासाठी, शरद पवार नेहमीच खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यात आपले, परके असा भेदभाव त्यांनी कधीही केला नाही. वसंतदादांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमधून जुलै १९७८ मध्ये शरद पवार बाहेर पडले व पुलोदची स्थापना करीत महाराष्ट्रात सर्वांत तरूण मुख्यमंत्री बनले. वैचारिक मतभेदांच्या पातळीवर लोकमतने वेळोवेळी त्यांच्यावर प्रखर टीका केली. अर्थात व्यक्तिगत संबंध व राजकीय मतभिन्नता याची गल्लत दोघांनीही कधीही होऊ दिली नाही. पवार साहेबांशी दर्डा कुटुंबियांचे व्यक्तिगत संबंध कायमच उत्तम राहिले आहेत. माझे वडील आदरणीय बाबूजींनी पवारांच्या नेतृत्वाखालील दोन मंत्रिमंडळात ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. दोन्ही कार्यकाळात बाबूजींवर मोठ्या विश्वासाने त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या.
वेळेच्या बाबतीत पवार साहेब खूप काटेकोर आहेत. हा अनुभव मला अनेकदा आला. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत १० फेब्रुवारी १९९८ रोजी नांदेडमध्ये माजी मंत्री कमलकिशोर कदम यांच्याकडे ते मुक्कामाला होते. त्यावेळी लोकमतचा संपादक म्हणून मुलाखतीसाठी मला सकाळी ७ वाजताची वेळ त्यांनी दिली. इतक्या सकाळची वेळ दिल्याने मला आश्चर्य वाटले. सकाळी वेळेवर कदम यांच्या घरी पोहोचलो, पवार साहेब आधीच तयार होते. अवघ्या महाराष्ट्राची बारीकसारीक माहिती त्यांच्याकडे होती. या मुलाखतीत सोनियाजींबाबत नागपुरात बाळासाहेब ठाकरेंनी दिलेला इशारा, विधानसभा निवडणुकीतली पक्षांतर्गत गटबाजी, राज्यातले युती सरकार बरखास्त करण्याबाबत बीडमध्ये केलेले वक्तव्य, काँग्रेस-रिपब्लिकन-सपाची आघाडी, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राचे संभाव्य निकाल यासारख्या विविध मुद्यांवर ते अतिशय मुद्देसूद व मोकळेपणाने माझ्याशी बोलले.
लोकशाही आघाडी सरकारमधे राज्याचा शिक्षणमंत्री असताना पवार साहेब थेट मला फोन करून काही सूचना द्यायचे व उत्तम मार्गदर्शन करायचे. हे ॠणानुबंध कायमच दोघांनी जपले आहेत.
अमृतमहोत्सवी वाढदिवशी शरद पवारांना लोकमत परिवारातर्फे मन:पूर्वक शुभेच्छा देतांना, परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्य प्रदान करो, अशी शुभकामना आहे. त्यांच्यासारख्या द्र्रष्ट्या व मुत्सद्दी नेत्याची महाराष्ट्रालाच नव्हे तर साऱ्या देशाला नितांत गरज आहे.