वेदान्त जाहला स्वदेशी

By Admin | Updated: July 21, 2016 04:13 IST2016-07-21T04:13:20+5:302016-07-21T04:13:20+5:30

वैयक्तिक आणि सामुदायिक जीवन उन्नत करणे हे ब्रह्मविद्येचे किंवा वेदान्ताचे ध्येय होय.

Vedant Jahla Swadeshi | वेदान्त जाहला स्वदेशी

वेदान्त जाहला स्वदेशी


वैयक्तिक आणि सामुदायिक जीवन उन्नत करणे हे ब्रह्मविद्येचे किंवा वेदान्ताचे ध्येय होय. जीवनापासून दूर जाण्यासाठी वेदान्त अवतीर्ण झाला नाही. परंतु मध्यंतरीच्या काळात हा वेदान्त परदेशी झाला होता. संत एकनाथमहाराज म्हणतात, ‘परदेशी जाहला होता वेदान्त।’ उपनिषदातील ब्रह्मविद्या म्हणजे वेदान्त हा फक्त त्रैवर्णिकांनाच उपलब्ध असे. त्यामुळे बहुजन समाजाला हा वेदान्त पोथ्या-पुराणे आणि ग्रंथांमध्ये बंदिस्त होऊन परदेशी झाला होता आणि दुसरीकडे वेदान्त आणि व्यवहार यात फारकत होऊनही तो परदेशी झाला होता. ज्ञानदेवांनी परदेशी झालेला वेदान्त पुन्हा देशी केला आणि वेदान्ताचा तसेच कैवल्याचा अधिकार सर्वांना आहे, हे ठामपणे सांगितले. सामान्य कष्टकरी ज्ञानदेवांकडे येतो आणि सांगतो, ‘मला ग्रंथ वाचता येत नाही. मला ज्ञान समजत नाही. भक्तीपासून मी दूर आहे. तरीही मला कैवल्य हवे आहे.’ माऊली त्याला असे म्हणाले नाहीत की, ‘अरे तुला काहीच येत नाही; मग कैवल्य कसे मिळणार?’ ज्ञानदेव म्हणतात,
म्हणौनि स्वधर्मे निष्कामता।
अनुसरले पार्था।।
तेथ कैवल्यपद तत्वता।
पातले जगी।।
तू कष्ट करतोस, श्रम करतोस, त्या श्रमालाच देव समज. तुझ्या कर्मातच कैवल्य उभे राहील. सम असणाऱ्या या भगवंताची भक्ती जेव्हा मानवी समतेच्या व निरपेक्ष सेवेच्या रुपाने प्रकट होते तेव्हा वेदांत स्वदेशी होतो. ज्ञानदेवांच्या लेखी विद्वान, पंडित, शास्त्री, तत्वज्ञ यांच्याइतकाच बहुजन कष्टकरी समाजही कैवल्याचा अधिकारी म्हणून उभा राहातो. म्हणूनच सामान्यांच्या बोलीभाषेत त्यांच्या नित्याच्या व्यवहारातील कृषी, मोट, पाणी, झाडे, शिवार, शेतकरी, कष्टकरी, वने, अरण्ये, बैल, औजारे यासारख्या प्रतिमा वापरून त्यांनी ज्ञानभक्तीचा उपदेश करीत त्यांच्याही जीवनात शुद्ध कर्मयोगाचे प्रबोधन घडविले आहे.
परंपरागत कर्मकांडातील आणि लौकिक व्यवहारातील जडत्व त्यांना घालवायचे होते. त्यासाठी त्यांनी लोकाभिमुख होऊन, जनलोकात वावरून बहुजन समाजाच्या अंतरंगात आणि ब्राह्याचारात नवचैतन्यसाठी प्रयत्न केला. भक्तिपंथाचा उदय आणि विस्तार, देशभाषेची प्रतिष्ठा आणि त्याच्या अनुषंगाने लोकजीवनाच्या पृथगात्मतेची जाणीव या तीन संकल्पना स्वीकारून ज्ञानदेवांनी शास्त्रप्रामाण्याची चौकट काहीशी शिथील केली. पुरुषार्थप्रधान विवेकप्रामाण्याची बैठक दृढ केली. जनसमूहाच्या सामाजिक अभिसरणाठीच भक्तीपीठावर एकत्र आणले. समतेची पताका खांद्यावर घेतली आणि ज्ञानदेवांच्या नेतृत्वाखाली ही एकात्मतेची दिंडी निघाली. ही दिंडी महाराष्ट्राच्या लोकजीवनाचे सांस्कृतिक वैभव ठरली..
-डॉ. रामचंद्र देखणे

Web Title: Vedant Jahla Swadeshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.