व्रतस्थ वृत्तीचा प्रज्ञावंत संशोधक
By Admin | Updated: July 7, 2016 03:51 IST2016-07-07T03:51:03+5:302016-07-07T03:51:03+5:30
डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या निधनानं पुण्यातील एक ज्ञानवृक्षच उन्मळून पडला. संशोधनासारख्या शास्त्रकाट्याच्या कसोटीच्या क्षेत्रात प्रज्ञेला, सर्जनाला त्यांनी वाव दिला. आपल्या कार्यातून

व्रतस्थ वृत्तीचा प्रज्ञावंत संशोधक
- विजय बाविस्कर
डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या निधनानं पुण्यातील एक ज्ञानवृक्षच उन्मळून पडला. संशोधनासारख्या शास्त्रकाट्याच्या कसोटीच्या क्षेत्रात प्रज्ञेला, सर्जनाला त्यांनी वाव दिला. आपल्या कार्यातून अभिजन-बहुजन संस्कृतीतील दरी मिटवली.
पुण्यात गेल्या आठवड्यात प्रस्थानत्रयी झाली. ज्ञानियांचा राजा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीनं व अजरामर शब्दरत्नांची उधळण करणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं विठुरायाच्या भेटीसाठी पंढरीकडे प्रस्थान केलं. याच दिवशी पुण्यनगरीचं खऱ्या अर्थानं भूषण, लोकसंस्कृती, लोककला-संतपरंपरेचे अभ्यासक, संशोधक, ऋषितुल्य व्रतस्थ ज्ञानमहर्षी डॉ. रामचंद्र चिंतामण ढेरे यांनी आपला देह ठेवून महायात्रेसाठी प्रस्थान केलं. पुण्याची प्रतिष्ठा देश-विदेशात वाढवणाऱ्या अनेक श्रेष्ठ विभुती या शहरात होऊन गेल्या. डॉ. रा. चिं. ढेरे हे या परंपरेतील एक महत्त्वाचं नाव. प्राच्यविद्यापंडित परंपरेतील वि. का. राजवाडे, श्रीधर व्यंकटेश केतकर, धर्मानंद कोसंबी आदींशी नातं सांगणारा हा संशोधक होता. त्यांनी संतसाहित्य, लोकसाहित्य, प्राचीन साहित्याचा अभ्यास लोकसंस्कृती, लोकपरंपरा, लोकदैवतांच्या अंगानं केला. त्यांचं हे अफाट संशोधनकार्य थक्क करणारं आहे. त्यांची शंभरावर असलेली ग्रंथसंपदा याची अजरामर साक्ष देत राहील.
पुणे परिसरात अंदर मावळातील निगडे या छोट्याशा गावात जन्मलेल्या रा. चिं. ढेरेंनी शिक्षण आणि उपजीविकेसाठी पुणं गाठलं. त्यानंतर सात दशकं पुण्यातच राहून त्यांनी संशोधनाचं भगीरथ कार्य सिद्धीस नेलं. या पुण्यभूमीविषयी त्यांच्या मनात अतीव कृतज्ञ भाव होते. पुण्यभूषण पुरस्कार त्यांना प्रदान झाला, त्या सोहळ्यात त्यांनी पुण्याचं ऋण व्यक्त केलं होतं. ‘या पुण्यानं मला अक्षरश: मातीतून वर काढलं. आधी पुण्यानं आणि मग सगळ्याच मराठी जगानं मला स्वीकारलं. पुण्यात येताना मी कुणीच नव्हतो. इथं आल्यावर मी अभ्यासक झालो, संशोधक झालो आणि मुख्य म्हणजे माणूस झालो,’ अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञ भावना व्यक्त केल्या होत्या. त्यांना प्रदान केलेला पुण्यभूषण पुरस्कार पुणेकरांच्या मनातील त्यांच्या स्थानाचं जणू प्रतीकच होतं. विविध पुरस्कारांनी ते सन्मानित झाले खरे, परंतु एखाद्या विद्यापीठापेक्षाही मोठं संशोधनकार्य एकहाती करणाऱ्या डॉ. ढेरेंच्या कार्याची देशपातळीवर योग्य ती दखल घेतली गेली नसल्याचा सल पुणेकरांच्या मनात आहे.
‘अण्णा’ नावानं सर्वपरिचित असलेल्या डॉ. ढेरेंच्या अफाट कार्याला ‘ढेरे विद्यापीठ’ असंही म्हटलं जायचं. खरं तर ऋषितुल्य, लोकसंस्कृतीचा उपासक, समर्पित संशोधक अशी अमुक एक उपाधी त्यांना लावता येणार नाही, असं त्यांचं कार्य असिम आणि अमिट होतं.
अण्णांनी प्रारंभीच्या काळात पुणे-मुंबई आकाशवाणीसाठी वेगवेगळ्या सांगीतिका लिहिल्या. ‘योगेश’ या टोपणनावानं कविताही केल्या; पण संशोधनाकडे वळल्यानंतर कविता मागे पडली. तरीही या कवितेनंच त्यांना संशोधन प्रांतातही सर्जनाशी बांधून ठेवलं. त्याविषयी त्यांनीच म्हटलंय, ‘संतपरंपरा आणि लोकपरंपरा हे माझ्या अभ्यासाचे विषय. माझ्या अभ्यासाचं क्षेत्रंच असं आहे, की तिथं आत जायचं तर मानव्याच्या महाद्वारातून जावं लागतं. माझ्या या वाटेवर कवितांचे दिलासे सारखे भरवसा देत राहिले.’
‘त्यांच्यातल्या कवीनं संशोधनाच्या प्रज्ञेचा हात धरला आणि संशोधन हाच त्यांच्यासाठी प्रातिभ शक्तीचा विलास ठरला, ही गोष्ट मराठी संशोधन क्षेत्रात असाधारण म्हटली पाहिजे,’ अशा नेमक्या शब्दात त्यांच्या कन्या व प्रख्यात कवयित्री अरुणा ढेरे यांनी अण्णांच्या कार्याचं वर्णन केलं आहे. पानशेतच्या पुरात त्यांच्या घरातील दुर्मिळ ग्रंथसंपदा वाहून गेल्यानंतर पुस्तकं खरेदी करण्यासाठी उसनवारी करताना प्रसंगी पत्नीचे दागिनेही त्यांनी गहाण ठेवले. त्या माऊलीनंही अर्धांगिनीची संकल्पना सार्थ ठरवून त्यांना साथ दिली. त्यांच्या संशोधनावर वादही निर्माण झाले, तरी त्या वादात अण्णा गुंतून पडले नाहीत. थोरामोठयांच्या निधनानंतर पोकळी हा शब्द अनेकदा वापरल्यानं त्यातला भाव हरवला आहे. मात्र, अशा या ज्ञानयोग्याच्या जाण्याने शब्दश: ती भरून न येणारी आहे.