वरदायिनीची कृपा

By Admin | Updated: August 19, 2016 04:17 IST2016-08-19T04:17:38+5:302016-08-19T04:17:38+5:30

सोलापूर जिल्ह्याच्या वरदायिनीची सध्या कृपा आहे. उजनी धरणातील पाणीसाठा वाढला आहे. आता गरज आहे ती पाणी नियोजनाची...

Varadayini's grace | वरदायिनीची कृपा

वरदायिनीची कृपा

 - राजा माने

सोलापूर जिल्ह्याच्या वरदायिनीची सध्या कृपा आहे. उजनी धरणातील पाणीसाठा वाढला आहे. आता गरज आहे ती पाणी नियोजनाची...

दुष्काळाच्या संकटाने गेली दोन वर्षे बळीराजाला नाडले. जिल्ह्यात पाऊस नाही म्हणून सर्वच शेतकरी अडचणीत आणि पाऊस नाही म्हणून उजनी धरणातही पाणी नाही. धरणात पाणी नाही म्हणून जिल्ह्यातील सुमारे ३५ लाख लोकसंख्या पिण्याच्या पाण्यासाठी त्रस्त! हे दुष्टचक्र सोलापूर जिल्ह्याच्या पाचवीला पुजलेले.
मागील दोन वर्षांत याच दुष्टचक्राने जिल्ह्याचे अर्थकारण बिघडविले. रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून खरीप हंगामात शेतकरी दुष्काळ असूनही शासनाच्या सवलतीपासून दूर राहिला. साखर कारखानदारी अडचणीत आल्याच्या धास्तीने ऊस उत्पादक शेतकरीही ऊस मोडू लागला. उसाचे क्षेत्र घटले. या पार्श्वभूमीवर या वर्षी पावसाची कृपा होईल, या आशेवर शेतकरी तग धरून राहिला. जिल्ह्याचे अर्थकारण उजनी धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून असते.
१२१ टीएमसी पाणी क्षमता असलेल्या या धरणात पाणी साठणे हे पूर्णपणे पुणे जिल्ह्यातील पाऊसमानावर अवलंबून असते. आतापर्यंत तरी तिकडे चांगला पाऊस झाला. त्यामुळे उजनी धरण आज उणे साठ्यातून तब्बल ६२ टक्के अधिक साठ्यापर्यंत पोहोचले. कालव्यातून पाणी सोडावे, बोगद्यातून पाणी सोडावे या मागणीसाठी गेली काही वर्षे आंदोलने आणि टोकाचा पाठपुरावा करूनही उजनी धरणातून पाणी सोडले जायचे नाही. या वर्षी मात्र अगदी मागणी पुढे यायच्या आतच पाणी सोडल्याने शेतकरी आनंदला! पाण्यासाठी कालवे आसुसलेले होते. तब्बल १७ महिने कोरडे पडलेल्या कालव्यांमधून आज पाणी वाहाते आहे.
उजनी धरणातील वाढलेल्या पाणी साठ्यामुळे सर्वच आघाड्यांवर उत्साह आणि आनंद दिसत आहे. या आनंदी वातावरणाचे परिणाम सोलापूरच्या बाजारपेठेवरही दिसू लागले आहेत. सर्व काही आलबेल असताना वास्तवाचे भान मात्र ठेवायला हवे.
उजनी धरणाला सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हटले जाते. या वरदायिनीचा आपण कशा पद्धतीने उपयोग करून घेणार, हा खरा प्रश्न आहे. जलयुक्त शिवार योजना कामात राज्यात जिल्ह्याने पहिला क्रमांक मिळविला. ठिबक सिंचन आघाडीवर देखील जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. हे विक्रम प्रस्थापित झाले ते जिल्ह्यावर पाण्याचे संकट असताना! आता उजनी धरणातील पाणी साठ्यामुळे पाण्याच्या संकटाची चिंता जवळजवळ संपल्याचे वातावरण सर्वच क्षेत्रांत दिसते आहे.
वास्तविक जिल्ह्यात या वर्षीही पाऊस अपेक्षेप्रमाणे झालेला नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरअखेर ४८९ मि.मी. एवढा पाऊस झाला होता. या वर्षी आजपर्यंत केवळ २१२ मि.मी. एवढाच पाऊस झालेला आहे. मान्सून राज्यात कधीही बरसला तरी परतीच्या पावसाचा जिल्हा म्हणून सोलापूरकडे पाहिले जाते. गत वर्षीपेक्षा कमी पाऊस होऊनही परतीच्या पावसाकडे खरीप हंगामाची शेती डोळे लावून बसलेली आहे. या वास्तवाचे भान ठेवून पुन्हा एकदा पाणी बचतीच्या महतीची आठवण प्रत्येकाला देण्याची वेळ आली आहे.
सुमारे दोन लाख हेक्टर्स ऊसाचे क्षेत्र आणि ३५ साखर कारखाने असलेल्या या जिल्ह्यात ऊसाचे क्षेत्र या वर्षी घटलेले आहे. सध्या अनेक शेतकरी ऊसाचे बेणे मिळेल त्या किमतीत घेऊन नव्या ऊस लागवडीच्या प्रयत्नाला लागल्याचे दिसते. उजनी धरणातील पाणी साठा वाढत असताना वीर धरणातून सोडलेल्या पाण्याचाही शेतकऱ्यांना चांगला उपयोग होतो आहे. या सर्व अनुकूल बाबींचा शिस्तबद्ध उपयोग करण्यासाठी शेततळ्यांची संख्या वाढणे आवश्यक आहे.
‘मागेल त्याला शेततळी’ ही लोकप्रिय घोषणा केवळ कागदावरच यशस्वी होऊन चालणार नाही. प्रत्यक्षात किती शेत तळ्यांमध्ये किती पाणी साठले हे त्रयस्थपणे पाहाणे आवश्यक आहे. उजनी असेल वा वीर धरण वाहत्या पाण्याला शेत तळ्यांमध्ये साठविण्याची संधी सोडता कामा नये. ठिबक सिंचनाद्वारेच ऊस पीक घेण्याचा नियमही काटेकोरपणे पाळण्याची सवय अंगवळणी पाडण्याची गरज आहे.
वरदायिनी उजनीची कृपा सध्या तरी जिल्ह्यावर झाली आहे. शाश्वत पाणीसाठा आणि त्याला अनुरूप पीकपद्धती हा विषय नेहमीच केवळ चर्चिला जातो. सध्याचे वातावरण तो कृतीत येण्यास अनुकूल आहे.

Web Title: Varadayini's grace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.