वैष्णव चरणी ‘प्रभू’ सेवा...
By Admin | Updated: July 8, 2016 04:30 IST2016-07-08T04:30:29+5:302016-07-08T04:30:29+5:30
दहा लाखांचा वैष्णवांचा मेळा, आठ-दहा हजार वाहनांचा ताफा आणि आषाढी वारीची शिस्त राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख वीरेश प्रभू यांनी केलेले नियोजन...

वैष्णव चरणी ‘प्रभू’ सेवा...
- राजा माने
दहा लाखांचा वैष्णवांचा मेळा, आठ-दहा हजार वाहनांचा ताफा आणि आषाढी वारीची शिस्त राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख वीरेश प्रभू यांनी केलेले नियोजन...
पंढरीत दाखल होणारा वैष्णवांच्या आठ ते दहा हजार चारचाकी वाहनांचा ताफा आणि दहा लाखांची गर्दी यावर नियंत्रण ठेवणे हे पोलीस प्रशासनापुढील नेहमीचेच आव्हान राहिले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली की, आषाढी वारीतील अनेक प्रश्न कमी होतात. खरे तर हजारो वर्षांपासून अखंडपणे चाललेल्या या वैष्णव मेळाव्याचे कायमस्वरूपी नियोजन असायला हवे. पण इथे मात्र दर वर्षी नवे प्रश्न जन्म घेतात आणि दर वर्षीच्या नियोजनातही बदल होतो. तीच परंपरा घेऊन येऊ घातलेल्या आषाढी वारीला सामोरे जाण्यास जिल्हा पोलीस प्रमुख वीरेश प्रभू आणि त्यांची टीम सज्ज झाली आहे. ती सज्जता व सेवा वैष्णवचरणी कशी रुजू होते हा खरा लाखमोलाचा प्रश्न आहे.
वारकऱ्यांची स्वयंशिस्त हे आषाढी वारीचे वैशिष्ट्य आहे. तरीही पंढरपूर शहराला असलेल्या भौगोलिक मर्यादा, शहराची गर्दी सामावून घेण्याची क्षमता आणि संख्येच्या मानाने सोयी उपलब्ध करण्यात येणारे अडथळे यामुळे आषाढीचा बंदोबस्त हा नेहमीच आव्हान ठरतो. या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी वीरेश प्रभू यांनी नवे कल्पक मार्ग धुंडाळल्याचा अनुभव यावेळी येतो आहे. राज्यभरातून येणाऱ्या दिंड्या, त्यांची चालण्याची गती आणि त्यांना दिली जाणारी सुरक्षा यावर विशेष भर देण्यात आला आहे. पालखी मार्ग, दर्शन रांग आणि चंद्रभागा नदीचे वाळवंट ही तशी संवेदनशील केंद्रे. या ठिकाणी वारकऱ्यांची गर्दीही सतत असते आणि तिथेच त्यांना मदतीचीही गरज असते. गत वर्षीपर्यंत काही केंद्रांवरच सूचना देण्याची सुविधा होती. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचाही अभाव होता. या वर्षी मात्र सर्वच महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्या शिवाय वाळवंटासह चार ठिकाणी वारकऱ्यांना ध्वनिक्षेपकावरून सूचना देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी कधी, कोठे आणि कसे जावे याची माहिती पदोपदी मिळेल. माहितीच्या अभावामुळे खोळंबून राहणारी गर्दी आपोआप गतिमान राहील.
वारीच्या निमित्ताने पंढरीत आठ ते दहा हजार वाहने येतात. पंढरपूर शहरातून मार्गस्थ होणाऱ्या वाहनांचीही संख्या मोठी असते. त्या वाहनांना गावाच्या बाहेरील १६ पर्यायी मार्गाने जाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. साडेतीन हजार वाहनांना सामावून घेऊ शकणाऱ्या १० वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली आहे. ही व्यवस्था निश्चितच अपुरी आहे. त्यासाठी गावाच्या बाहेरच वाहनांची व्यवस्था पोलीस यंत्रणा करीत आहे.
तुकाराम पालखी आणि ज्ञानेश्वर पालखी या प्रमुख पालख्यांबरोबरच इतरही दिंड्यांच्या सुरक्षा आणि शिस्तीसाठी तब्बल ९० प्रशिक्षित बाईक कमांडोज २४ तास तैनात करण्यात आले आहेत. एके-४७ सारख्या अत्याधुनिक शस्त्रांबरोबरच प्रथमोपचारापर्यंतच्या सर्व सुविधा या कमांडोजकडे राहतील. या शिवाय इतरही ३६० प्रशिक्षित कमांडोज यात्रेच्या शिस्तीवर करडी नजर ठेवतील.
तब्बल दहा हजार लोक वारकऱ्यांना शिस्त आणि इतर सुविधांसाठी मदत करतील. त्यात अडीच हजार पोलीस मित्रांचाही समावेश आहे. हे पोलीस मित्र वारीतील ३० ठिकाणी शिस्तबद्ध सेवा देण्याचे काम करतील. यावेळी दोन अत्याधुनिक शस्त्रधारी वाहने देखील तैनात करण्यात आलेली आहेत. सहा बॉम्बशोध पथके ४२ कर्मचारी आणि शस्त्रास्त्रांसह तयार ठेवण्यात आली आहेत. अनिरुद्धबापू आपत्कालीन व्यवस्थापन संस्थेचे ३०० प्रशिक्षित कार्यकर्ते यात्रा यशस्वी करण्यासाठी दाखल झाले आहेत. पाच हजार पोलीस कर्मचारी, ४०० पोलीस अधिकारी, २४०० होमगार्ड आणि ३०० एसआरपी गाडर््स यात्रेच्या बंदोबस्तात कार्यरत राहणार आहेत. जनसंपर्काच्या हायटेक यंत्रणेपासून प्रबोधनापर्यंत प्रत्येक बाबीत लोकसहभाग मिळविण्यात वीरेश प्रभू यशस्वी झाल्याचे दिसून येते. बार्शीच्या जीवनज्योत संघटनेचे अध्यक्ष अजित कुंकूलोळ त्यांच्या १५० कार्यकर्त्यांच्या संचासह पोलीस यंत्रणेला मदत करणार आहेत तर पोलीस निरीक्षक भुजंग तथा नाना कदम यांनी व तंटामुक्तीचे प्रणेते सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल माने हे प्रबोधन दिंडीद्वारे वैष्णवांचे मनोरंजनही करणार आहेत.