मानव उत्थानार्थ भगवान महावीरांचे अकारत्रयी तत्त्व

By Admin | Updated: April 1, 2015 22:53 IST2015-04-01T22:53:27+5:302015-04-01T22:53:27+5:30

भगवान महावीरांनी, जैन दर्शनात जी तत्त्वं सांगितली आहेत, त्यात नित्य-अनित्य, द्वैत-अद्वैत, ईश्वर, कर्तृत्व आदिंचा सापेक्ष विचार करून समन्वयात्मक तत्त्वे समोर

The unproductive element of Lord Mahavira, for human uplift | मानव उत्थानार्थ भगवान महावीरांचे अकारत्रयी तत्त्व

मानव उत्थानार्थ भगवान महावीरांचे अकारत्रयी तत्त्व

भगवान महावीरांनी, जैन दर्शनात जी तत्त्वं सांगितली आहेत, त्यात नित्य-अनित्य, द्वैत-अद्वैत, ईश्वर, कर्तृत्व आदिंचा सापेक्ष विचार करून समन्वयात्मक तत्त्वे समोर ठेवली आहेत. त्यापैकी अहिंसा अनेकांत व अपरिग्रह सर्व श्रेष्ठ अकारत्रयी आहे. अहिंसेमुळे व्यक्तिगत आचरणातील हिंसाचार दूर होतो. अनेकांतामुळे वैचारिक हिंसाचार नष्ट होतो, तर अपरिग्रहामुळे सामाजिक राष्ट्रीय हिंसाचार दूर होतो. त्यामुळे या तत्त्वाची खऱ्या अर्थाने समाजाला व राष्ट्राला गरज आहे.
१) अहिंसा :
अहिंसेची व्यापकता फार मोठी आहे. राग, द्वेष इत्यादी विकारभावांची उत्पत्ती न होणे म्हणजे अहिंसा होय. वर्तमान काळात जगात अराजकता पसरत आहे. दहशतवाद फोफावत आहे. याचे मुख्य कारण अहिंसा, अनेकांत व अपरिग्रह याचा विचार न होता सर्वत्र हिंसक कृतीचा वापर होतो आहे. ही चिंतेची बाब आहे. अहिंसा सार्वभौमिक व सावर्जनिक शाश्वत तत्त्व आहे. विश्वातील तत्त्ववेत्त्यांनी अहिंसेच्या बळावर आपला देश स्वतंत्र केला. विश्वशांती, पर्यावरणाचे संवर्धन नैतिक मूल्यांची जाणीव, राष्ट्रीय एकात्मता विश्व बंधुत्वाची भावना अहिंसेतून निर्माण होते. त्यामुळे अहिंसेला सागर परब्रह्म सद्गुण शांतीचा मार्ग असल्याचे सर्व थोर पुरुषांनी म्हटले आहे.
भारतीय परंपरा समृद्ध आहे. प्रत्येक संप्रदायात मुख्यत्वे करून अहिंसेचे समर्थन केले आहे. महाभारत अनुशासन पर्वात अहिंसेबाबत वर्णन आहे.
अहिंसा परमो धर्मस्तथा हिंसा परंतप: ।
अहिंसा परमं सत्यं यतो धर्म प्रवर्तने ।।
अहिंसा परमधर्म आहे. तप आहे. सत्य आहे. गुणांची गंगोत्री आहे. थोडक्यात सर्वांनाच आपला प्राण प्रिय आहे. त्यामुळे कोणत्याही जिवाची हिंसा करू नये.
बौद्ध परंपरेत अहिंसेला मोक्ष प्राप्तीचा उपाय सांगितला आहे. विनयपिटकामध्ये भिक्षुंना जीव हिंसेपासून परावृत्त होण्यास सांगितले आहे. त्यांनी झाडे तोडू नये, जमीन खोदू नये इत्यादी कथन केले आहे. ही कार्ये दोषपूर्ण असून प्रायश्चित सांगितले आहे.
शीख संप्रदायात ‘गुरुग्रंथ साहब’ मध्ये अहिंसेस पोषक तत्त्वांचा समावेश केला आहे.
जो रक्त लागे, कपडे जमा होय पलीत
जो रक्त पीव, मांसा लीन क्यों निर्मल चित्त।।
रक्त लागल्याने वस्त्र मलीन होते, तर मांस भक्षणाने मन मलीन होणार नाही कां!
इस्लाम परंपरेत चार ग्रंंथ महत्त्वाचे आहे.
१. कुराण, २. सुन्ना, ३. इज्ज, ४. किअस यामध्ये ईश्वराने जगण्याचा सर्वांना अधिकार दिला आहे. प्रत्येकाने दयाभाव, समताभाव बाळगावा इत्यादि गोष्टींचा विचार सांगितला आहे.
एकंदरीत सर्वच संप्रदायात शांती व सुखाकरिता अहिंसेला प्रधान साधन मानले आहे.
२. अपरिग्रह :
परिग्रहाचे परिमाण करण्याची अतिशय महत्त्वाची शिकवण भगवान महावीरांनी दिली आहे. व्यक्ती व समाज यांच्यात सामंजस्य शिकविण्याचा तो एक रामबाण उपाय आहे. आपल्या गरजा अमर्यादित आहेत. गरजांची पूर्तीसाठी व्यक्ती सतत धडपडत असते व शेवटी दु:खी होते. समाधान व्यक्तीचे ऐश्वर्य आहे.
वर्तमानात परिग्रह वृत्ती वाढत आहे. धनाच्या लोभाने मनुष्य चांगले वाईट विसरतो. गृहस्थाने अर्थार्जन करणे निंदा नाही, परंतु ते न्याय्य मार्गाने मिळविले पाहिजे. तसेच त्यावरसुद्धा अर्थार्जनाची मर्यादा असावी. परिग्रह लहान तर सुख महान ही अनुभूती होते. आपला समाज, राष्ट्र सुखी व्हावे असे वाटत असेल तर परिग्रह परिमाण स्वीकारावे.
३. अनेकांत :
भगवान महावीराच्या सर्वोच्च तीर्थात अनेकांत तत्त्व महत्त्वाचे आहे. अनेक धर्मात्मक वस्तंूचे स्वरूप गौण व मुख्य स्वरूपाने विविध पैलूंतून समजण्याचा विचार अनेकांत विचार होय. त्यामुळे पारस्परीक सामंजस्य निर्माण करण्याकरिता अनमोल चिंतामणी रत्नच होय. अनेकांत हा शब्द अनेक व अंत या दोन शब्दांनी बनला आहे. अन्त म्हणजे धर्म. अनेकांत म्हणजे अनेक धर्म, वस्तू अनेक धर्मात्मक असते. एकान्त दृष्टी, मानसिक हिंसा असून ती जगातील साऱ्या दु:खाचे माहेर आहे. संघर्षाचे मूळ संकुचित मनोवृत्ती, एकान्त विचारसरणीत आहे. अनेकांत ही वैचारिक अहिंसा आहे. अनेकांत दृष्टीचा स्वीकार लोक कल्याणकारी आहे.
भगवान महावीरांच्या अहिंसा अपरिग्रह व अनेकांत या जीवनाचा उपरोक्त अकारत्रयीचा सर्वांनी स्वीकार केल्यास सर्वत्र सामंजस्याची भावना निर्माण होऊन सुख शांती नांदेल. अहिंसा, अपरिग्रह व अनेकांत या तीन आयुधाच्या बळावर समस्यांची उकल करण्याचा प्रयत्न केला तरच भगवान महावीरांच्या प्रेरक स्मृतीची खरी जपवणूक केल्याचे व खऱ्या अर्थाने महावीर जयंती साजरी केल्याचे समाधान मिळेल.

Web Title: The unproductive element of Lord Mahavira, for human uplift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.