वर्ल्डकप न जिंकण्यात बेअब्रू मुळीच नाही
By Admin | Updated: March 29, 2015 23:06 IST2015-03-29T23:06:38+5:302015-03-29T23:06:38+5:30
भारत हा क्रिकेटवेडा देश आहे व हा खेळ हाच आपला एकमेव धर्मनिरपेक्ष धर्म आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. कोट्यवधी चाहत्यांच्या क्रिकेट जणू नसानसांत भिनलेले आहे.

वर्ल्डकप न जिंकण्यात बेअब्रू मुळीच नाही
विजय दर्डा ,
(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन),lokmatedit@gmail.com -
भारत हा क्रिकेटवेडा देश आहे व हा खेळ हाच आपला एकमेव धर्मनिरपेक्ष धर्म आहे, हे वेगळे सांगायची गरज नाही. कोट्यवधी चाहत्यांच्या क्रिकेट जणू नसानसांत भिनलेले आहे. भारतीय संघ जगभरात कुठेही खेळत असला तरी त्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण आणि हिंदी व इंग्रजीतून धावते समालोचन देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचत असल्याने अगदी सामान्य लोकांनाही या खेळाचे बारीकसारीक तपशील लगेच कळत असतात. हा खेळ मूळचा ब्रिटिशांचा असला तरी आता जणू तो भारतीयांची स्थावर मालमत्ता झाला आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यात विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यांत सिडनी येथे आॅस्ट्रेलियाकडून भारतीय संघाच्या पराभवाने देशावर काहीशी दु:खाची छाया पसरणे स्वाभाविक होते. या दु:खात कट्टर चाहत्यांच्या मनोभंगाचा भाग नक्की होताच. पण ‘वुई वॉण्ट गिव्ह इट बॅक’ या जाहिरातबाजीने अवाजवीपणे उंचावलेल्या अपेक्षांचा वाटाही मोठा होता. पण केवळ मनोवेधक जाहिरातींची मोहीम चालवून विश्वचषक आपल्याकडे कायम ठेवता येत नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. अशा जाहिरातींनी टीव्ही प्रक्षेपणास मोठा आणि हमखास प्रेक्षकवर्ग मिळतो. विश्वचषक जिंकला तरी तो फक्त चार वर्षे विजेत्या संघाकडे असतो. त्यानंतर तो कोणाला परत देण्याचा प्रश्न नसतो, तर पुन्हा प्रयत्नपूर्वक जिंकून घेण्याचा प्रश्न असतो हे वास्तव लक्षात घ्यायला हवे. यावेळी विश्वचषक पुन्हा जिंकून घेण्यात आपण अपयशी ठरलो. त्यामुळे हे अपयश नक्कीच असले, तरी त्यात अब्रू जाण्यासारखे काहीच नाही.
या वेळच्या स्पर्धेत सलग सात सामने जिंकून धोनीचा संघ लौकिकास जागला. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वीपासून सुमारे चार महिने भारतीय संघ आॅस्ट्रेलियात होता. विश्वचषक स्पर्धेआधीच्या दौऱ्यात सपाटून मार खाल्लेला भारतीय संघ विश्वचषकासाठी नेटाने खेळला. असे असले तरी भारताच्या पराभवाचे विश्लेषण जरूर व्हायला हवे, असे कर्णधार धोनी म्हणाला. माध्यमांनी विश्लेषण करावे व त्यातून जो काही निष्कर्ष निघेल त्याच्या नेमके विरुद्ध लिहावे, असा चिमटाही त्याने काढला. यातून त्याची विनोदबुद्धी व क्रिकेट आणि प्रसिद्धीमाध्यमांची सखोल जाण दिसून येते. आॅस्ट्रेलिया दौऱ्यात एकही सामना जिंकू न शकलेला भारतीय संघ उपान्त्य फेरी गाठेल, अशी कोणी अपेक्षाही केली नसेल. रवि शास्त्री यांनी तर हा दौरा म्हणजे निव्वळ वेळेचा अपव्यय असल्याची टीकाही केली होती.
शिवाय विश्वचषक स्पर्धेतील पहिले सलग सात सामने भारतीय संघाने जिंकण्यात एक प्रकारे भ्रामकताही होती. यामुळे संघाच्या अजिंक्यतेविषयी एक प्रकारे भ्रमाचा भोपळा तयार झाला. खरे तर या सात सामन्यांपैकी ज्यात भारतीय संघाची कणखर मानसिकता आणि क्रिकेटच्या कौशल्यांचा खरा कस लागला असे दोनच सामने होते- एक पाकिस्तानविरुद्धचा व दुसरा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा. हे दोन मुख्य अडसर पार केल्यावर प्राथमिक फेरीतील इतर सामने व अगदी बांगलादेशाविरुद्धचा उप उपान्त्यफेरीचा सामनाही सहजगत्या जिंकलेले होते. कोणत्याही संघाच्या वाट्याला वाईट खेळाचा एखादा दिवस येतोच. तसा आपल्या संघासाठी गेला गुरुवार हा सिडनीतील वाईट दिवस होता. काही आकडेवारी पाहा. भारताच्या शामी, यादव आणि शर्मा या वेगवान गोलंदाजांच्या त्रिकुटाने २९ षटकांत २१५ धावा दिल्या. यात भर म्हणून शेवटच्या सहा षटकांत ७० धावा आॅस्ट्रेलियाने कुटल्या व एकट्या जॉन्सनने तर शेवटच्या नऊ चेंडूंवर तब्बल २७ धावा फटकावल्या. पण एवढ्यावरून भारतीय संघाच्या एकूण कामगिरीला कमीपणा येण्याचे काही कारण नाही. या गोलंदाजांच्या त्रिकुटाने सुरुवातीच्या षटकांत बळी घेतले म्हणून तर आपण या स्पर्धेतील बहुतांश सामने जिंकू शकलो, हेही विसरून चालणार नाही. बरं, फलंदाजीविषयी बोलायचे तर सिडनीत आपल्यापुढे आॅस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेले ३२८ धावांचे लक्ष्य सहजसाध्य नक्कीच नव्हते. आॅस्ट्रेलियासारख्या मातब्बर संघासमोर हे लक्ष्य गाठण्यासाठी आपल्या वरच्या फळीतील किमान एका तरी फलंदाजाने त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी करणे अगत्याचे होते. पण आपल्या संघातील शिखर, रोहित व विराट हे तिन्ही आघाडीचे फलंदाज कोणतीही छाप न टाकताच बाद झाले. पण हे क्रिकेट आहे. आधीच्या सामन्यात दणकेबाज द्विशतक ठोकणारा न्यूझीलंडचा मोर्टिन गुप्तिल अंतिम सामन्यात लवकर बाद झाला. पण म्हणून त्याच्या पत्नीच्या किंवा मैत्रिणीच्या घरावर दगडफेक करण्याची भाषा कोणी करेल का, किंवा त्याने लोटांगण घातले असे कोणी म्हणेल का? शेवटी क्रिकेटमध्ये सर्वोत्तमतेला काही स्थान आहे की नाही? प्रत्येक संघ दुसऱ्या संघाशी खेळताना केव्हा ना केव्हा जिंकलेला व हारलेलाही असतो. पण अनुष्का सामना पाहायला गेली म्हणून विराटचे चित्त विचलित झाले, अशी टीकेची झोड उठवणाऱ्यांना क्रिकेटच्या या तर्कशास्त्राशी काही घेणे देणे नसते. विश्वचषक स्पर्धा सुरू होण्याच्या एक आठवडा आधी धोनीला झिवा ही मुलगी झाली. एक पिता म्हणून कधी एकदा जाऊन त्या लाडलीला कवेत घेतो, अशी मानसिक कुचंबणा धोनीचीही नक्कीच झाली असणार. पण धोनीने चित्त विचलित होऊ न देता संघाच्या हिताला प्राधान्य दिले. त्यामुळे अनुष्काला टीकेचे लक्ष्य केले जाणे अथवा सिडनीमधील पराभवानंतर भारताची लाज गेल्याची आवई उठविणे या प्रसिद्धीमाध्यमांतून प्रतिबिंबित झालेल्या प्रतिक्रिया या, त्यामागचा हेतू काहीही असला तरी, समाजातील क्षुल्लक विसंगती म्हणून दुर्लक्षित करण्यासारख्या नाहीत. खरे तर ही याहून व्यापक व याहून खोलवर रुजलेल्या अपप्रवृत्तींची लक्षणे आहेत. कोणाला तरी निष्कारण बळीचा बकरा करण्याचा आणि खलनायक बनविण्याचा हा निर्लज्ज प्रकार आहे.
काही खेळाडूंनी सतत सर्वोत्तम कामगिरी केल्याच्या जोरावर आपला संघ आघाडीच्या संघांमध्ये गणला जाऊ लागला. एक संघ म्हणून संघामध्ये जराही एकसंधता राहू नये यासाठी क्रिकेटच्या व्यवस्थापकांनी काहीही करायचे शिल्लक ठेवलेले नाही. तेथील हवामान व खेळपट्ट्यांशी जुळवून घेणे सोपे जावे, हा विश्वचषकाच्या आधी तीन महिन्यांचा आॅस्ट्रेलियाचा दौरा ठेवण्याचा हेतू होता हे मान्य केले तरी पूर्ण दमछाक झालेला संघ स्पर्धेत उतरविण्यामागचे तर्कशास्त्र अनाकलनीयच म्हणावे लागेल. पण खेळाडूंचा पार चोळामोळा करा, भपकेबाज जाहिरातबाजी करा, अपयश आले की खेळाडूंच्या मैत्रिणींवर तोफ डागा आणि देशाची मान शरमेने खाली गेल्याची बोंब मारा हे सर्व एका सूत्रात बांधलेले ‘कॉम्बो पॅक’ आहे. अशा वातावरणातून खरंच जगज्जेता संघ मिळू शकेल का? वास्तवात, आपण आपल्याला भाग्यवान मानले पाहिजे कारण अशा निराशाजनक परिस्थितीतही आपल्या आयुष्यात स्फूर्ती देण्यासाठी हे क्रिकेटवीर, जगातील अव्वल स्थान पटकाविलेली बॅडमिंटनपटू शायना नेहवाल, टेनिसपटू सानिया मिर्झा यांच्यासारखे ‘आयकॉन’ समाजात आहेत.
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
उपान्त्य सामन्यातील भारतीय संघाचा पराभव ही केवळ भारतीयांचीच निराशा नव्हती. न्यूझीलंडमध्येही त्याची नाराजी उमटली. भारत-न्यूझीलंड अशा अंतिम सामन्याची अपेक्षा बाळगलेल्या टिम स्टेवर्ट या मित्राने आॅकलंडहून फोन करून सांत्वन केले. क्रिकेटमधील न्यूझीलंड आणि आॅस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिस्पर्धा भारत-पाकिस्तान यांच्यातील ‘ठसन’हून कट्टरतेच्या दृष्टीने जराही कमी नाही, हेही लक्षात घ्यायला हवे.