अडीच माणसांचे सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 03:09 AM2017-10-06T03:09:28+5:302017-10-06T03:09:51+5:30

सरकारने देशाच्या केलेल्या प्रगतीचे विरोधकांच्या मनात शल्य आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. हे टीकाकार कोण आहेत?

Two-man government | अडीच माणसांचे सरकार

अडीच माणसांचे सरकार

सरकारने देशाच्या केलेल्या प्रगतीचे विरोधकांच्या मनात शल्य आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केली. हे टीकाकार कोण आहेत? डॉ. मनमोहनसिंग, पी. चिदंबरम् आणि राहुल गांधी. झालेच तर भाजपचे माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, भाजपचेच माजी मंत्री अरुण शौरी आणि आता खुद्द रा.स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत. ही सारीच माणसे मोदींविषयीचे शल्य मनात घेऊन आहेत आणि त्यामुळे मोदींना जे दिसते ते या बिचाºयांना दिसत नाही हा त्यांच्या वक्तव्याचा अर्थ आहे. देशाच्या आर्थिक विकासाचा दर खालावून ५.७ टक्क्यावर आला आहे, हे मनमोहनसिंगांनी सांगितले नाही की मोहन भागवतांनी म्हटले नाही. तो स्टेट बँकेच्या अहवालाच्या आधारे रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेला आकडा आहे. या दोन्ही बँका मोदींचे ज्येष्ठ प्रचारक अरुण जेटली यांच्या नियंत्रणात आहेत. चलनबदलाचा सरकारचा निर्णय देशाला रस्त्यावर आणणारा आणि त्याला पार कॅशलेस करणारा ठरला. शिवाय त्यातून काळा म्हणतात तो पैसा जराही बाहेर आला नाही हे सगळ्या बँकांसह अर्थ मंत्रालयानेही जाहीर केले. या प्रकाराने सरकारलाच २६ हजार कोटींचा फटका बसला हे चिदंबरम किंवा अरुण शौरींनी सांगितले नाही, ते मोदींच्याच सरकारने सांगितले आहे. रोजगारात वाढ झाली नाही, ४०० हून अधिक कंपन्या दिवाळखोरीत निघाल्या आणि तेवढ्याच आणखी त्यांची दिवाळखोरी जाहीर करायला सिद्ध आहेत हे सरकारच्याच आर्थिक अन्वेषण विभागाने सांगितले आहे. ते राहुल गांधींनी वा यशवंत सिन्हांनी सांगितले नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवून सरकारने जनतेची लूट केली हे लोक म्हणतात, विरोधी पक्ष सांगत नाहीत. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती २०० टक्क्यांनी वाढल्या हे सामान्य ग्राहक अनुभवतात, ते विरोधकांना म्हणावे लागत नाही. मोदींनी त्यांच्या समर्थनार्थ त्यांचीही एक मोठी आकडेवारी दिली आहे. मात्र मनमोहनसिंग ते मोहन भागवत हेही काही कमी आकडेबहाद्दर नाहीत. मग मोदी म्हणतात ते शल्य कुणाच्या मनात आहे? अलीकडे त्यांच्या प्रशंसकांची संख्या कमी झाली आहे. सोशल मीडियावरील त्यांच्या आरत्या संपल्या आहेत. राहुल गांधींना दिल्या जाणाºया शिव्या थांबल्या आहेत आणि एक जेटली सोडले तर दुसरे कोणी मोदींचे समर्थन करताना दिसत नाहीत. त्यांनी ज्यांना बढती दिली ते नाहीत, ज्यांना खाली ढकलले ते नाहीत आणि दूर ठेवले तेही नाहीत. झालेच तर अडवाणी रिकामे आहेत, मुरली मनोहरांना काही काम नाही. त्यांनी तरी मोदींची पाठराखण करायची. पण तेही ती करताना दिसत नाहीत. परिणामी मोदी आणि जेटली यांनाच सरकारचे समर्थन करावे लागत आहे. अरुण शौरींनी त्याचमुळे हे अडीच माणसांचे सरकार असल्याचे परवा म्हटले. शौरी सभ्य आहेत त्यामुळे त्यांचा निर्देश असलेली दोन सगळी माणसे साºयांना समजली. मात्र तो अर्धा कोण, हे त्यांनी सांगायचे त्यांच्या अंगभूत सुसंस्कृतपणामुळे टाळले. सारांश, मी एकटा बोलतो, जेटली बोलतात आणि बाकीचे नुसतीच टीका करतात. ती करणाºयांत आमचीही माणसे असतात आणि आमच्यातले अनेकजण हे सारे ऐकून गप्प राहतात हे मोदींचे खरे शल्य आहे. वास्तव हे की सरकार एकट्या मोदींचे आहे. जेटली हे त्यांचे तुणतुणे आहे आणि तो अर्धा अजून अज्ञात आहे. त्यामुळे मिळेल त्या व्यासपीठावरून मोदी सारी उणीव स्वत:च भरून काढताना दिसत आहेत. भाजप व संघ यातील मोदीभक्तांना त्यामुळे आमची विनंती ही की, पुन्हा एकवार त्यांचे ढोल वाजवा, ते खोटे असले तरी चालतील. त्यांनी देशाला भूल घातली नाही तरी चालेल मात्र त्यामुळे मोदींचे शल्य दूर होईल हे नक्की.

Web Title: Two-man government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.