त्रिकुटाचे तेच ते वर्चस्व!

By Admin | Updated: August 2, 2015 21:45 IST2015-08-02T21:45:39+5:302015-08-02T21:45:39+5:30

नितीन गडकरी यांनी पवारसाहेबांचे जाहीर आभार मानले. भाजपा-मंत्र्यांच्या कारभाराबद्दल राष्ट्रवादीची फारशी मते जाहीर होत नाहीत. स्व. श्री. धीरूभाई अंबानींबद्दलचा

Trikuta dominates the same! | त्रिकुटाचे तेच ते वर्चस्व!

त्रिकुटाचे तेच ते वर्चस्व!

 डॉ. गिरीश जाखोटिया
(नामवंत अर्थतज्ज्ञ)
नितीन गडकरी यांनी पवारसाहेबांचे जाहीर आभार मानले. भाजपा-मंत्र्यांच्या कारभाराबद्दल राष्ट्रवादीची फारशी मते जाहीर होत नाहीत. स्व. श्री. धीरूभाई अंबानींबद्दलचा एक धडा अभ्यासक्रमात टाकण्याचा विचार गुजरात सरकार करते आहे. अदानी-अंबानी समूहाच्या वेगवान घोडदौडीच्या बातम्या आपण रोज पाहतो-वाचतो आहोच. भाजपा - भाकि संघ - भाम संघ इ.मधील सत्तानुकूल समन्वय साधण्याची जबाबदारी रा. स्व. संघाचे ज्येष्ठ सदस्य पार पाडताहेत. इकडे छगन भुजबळांची चौकशी चालू आहे. या सर्व घटनांचा एकत्रित अन्वयार्थ काढण्याचा प्रयत्न केला की ‘त्रिकुटाचे तेच ते वर्चस्व’ निदर्शनास येते. भारताचा एकूणच सांस्कृतिक-राजकीय-आर्थिक इतिहास हा या त्रिकुटाच्या वर्चस्वाचा आहे. लोकशाही असो वा हुकूमशाही, हे त्रिकूट नेहमीच एकत्रितपणे काम करीत आले आहे. (अपवादात्मक अशा चांगल्या कालखंडाचा परामर्श इथे घेता येणे अवघड आहे.)
राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराची चिरफाड करीतच भाजपा सत्तेत आली. ‘प्रॅक्टिकल राजकारणा’नुसार शिवसेनेला धाकात ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचा उपयोग भाजपा करीत असल्याचे सकृतदर्शनी दिसते. अर्थात, गरजांची देवाण-घेवाण ही होतेच. संघाचा नेहमीच उपमर्द करणाऱ्या पुढाऱ्यांना अस्पृश्य न मानता सत्ताकारण करावे लागते, या कठीण राजकीय चालीचे, विश्लेषण संघाचा सामान्य स्वयंसेवक करीत बसत नाही. ‘हिंदूराष्ट्र’ उभे करण्यासाठी प्रत्येक गोष्ट क्षम्य असते, अशी त्याची वैचारिक बैठक पक्की केलेली असतेच. भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई करतोच आहोत, हा जनतेच्या समाधानासाठीचा ‘अजेंडा’ राबविताना ‘भुजबळ चौकशी’ (कायद्यानुसार!) जोरात चालू ठेवावी लागते. उद्योग-जगतामध्ये राजकारण्यांचा उपयोग हा नेहमीच ‘रिटर्न आॅन इन्व्हेस्टमेंट’ (फडक) नुसार चालतो. थकलेल्या काँगे्रसच्या घोड्याला बाजूला सारून भाजपाचा उत्साही घोडा कसा रेसमध्ये धावेल व जिंकेल हे साध्य करण्यासाठीची मग व्यूहात्मक रचना आखली जाते. इथे पण ‘हिंदुत्वा’साठीच्या तडजोडींची भलामण केली जाते आणि स्वयंसेवकांना ‘हिंदू राष्ट्रा’साठी हे स्वीकारावे लागतेच. उद्योगपतींसाठी प्रत्येक गोष्ट ही ‘गुंतवणूक’ असते. अशी गुंतवणूक या त्रिकुटाला एकत्रित ठेवणाऱ्या बाबा-बापू-आचार्यांसाठीसुद्धा अत्यावश्यक असते.
त्रिकुटामध्ये समावेश नेहमीच असणाऱ्या तीन वेगवेगळ्या सत्तांचे प्रतिनिधी एकमेकांना चुचकारतच बहुजनांवर राज्य करीत असतात. सांस्कृतिक-धार्मिक सत्ता, आर्थिक-उद्योजकीय सत्ता आणि राजकीय सत्ता असे तीन भाग या त्रिकुटाच्या वर्चस्वाचे होते, आहेत नि असतील. या तिन्ही भागांमधील समन्वय जमेल तसा साधून महाराष्ट्रातील सत्तेत बरीच वर्षे राष्ट्रवादी पक्ष राहिला. घोटाळ्यांच्या अतिरेकामुळे (अपचनामुळे!) ही सत्ता हातून निसटली. परंतु हिंदुत्ववाद्यांच्या सांस्कृतिक विचारांकडे डोळेझाक करून राष्ट्रवादी पक्ष वेळ निभावतो आहे. योग्य संधी मिळेपर्यंत रणांगणातून बाहेर पडण्याचा व शस्त्रांना धार लावण्याचा कार्यक्रम राष्ट्रवादी पक्ष राबवितो आहे. भारतीय जातिव्यवस्थेचा संदर्भ पाहता या त्रिकूटाचे तीन भाग असेही दृष्टोत्पत्तीस येतात. वैचारिक अथवा ब्राह्मण्यग्रस्त नेतृत्व, क्षत्रियांचे राजकीय नेतृत्व आणि वैश्यांचे उद्योजकीय-आर्थिक नेतृत्व. या तीनही वर्गांनी एकमेकांच्या साथीने आपापली सत्ता राखली आहे. अधूनमधून हे एकमेकांच्या सत्ताक्षेत्रात घुसतात तेव्हा संघर्ष निर्माण होतो. या तिन्ही वर्गांना बहुजन समाज (वा ‘रयत’) आपापल्या सत्तेसाठी वापरायचा असतो. गेल्या तीस वर्षांत मात्र एकूणच अस्थिरता व आव्हाने वाढल्याने हे तीनही सत्ताधीश एकमेकांच्या क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करताहेत. ‘आचार्य’ खासदार बनताहेत, उद्योगपतीही खासदार-आमदार बनताहेत, राजकारणी ‘उद्योगपती’ बनताहेत, सांस्कृतिक ठेकेदारही उद्योगपती बनताहेत. आपापली सत्ता राखण्यासाठी आता ‘समान अर्थार्जना’ला पर्याय राहिलेला नाही. बहुजन समाजातील ज्या व्यक्तींना हे त्रिकूट कळले त्या व्यक्तींनी आपली विचारधारा व व्यक्तित्व सोयीने लवचीक करीत स्वत:चा कार्यभाग नेहमीच साधला. या समाजातील हे नवे पंडित, उद्योजक आणि राजकारणी आता आपले एक ‘उप-त्रिकूट’ बनवून ‘मुख्य-त्रिकुटा’च्या रचनांमध्ये कार्यरत झाले आहेत. राष्ट्रवादी व काँग्रेसने ही दोन्ही त्रिकुटे बराच काळ वापरली. त्यांच्याच क्लृप्त्यांचा वापर करीत भाजपाने तूर्तास या दोन्ही त्रिकुटांचा ताबा घेतला आहे.
अशा या ‘त्रिकुटी रचने’मध्ये प्रसंगानुसार काही जणांचा बळी जाणे अभिप्रेतच असते. डोक्यापर्यंत पाणी चढले की माकडीणसुद्धा आपल्या पिल्लाला पायाखाली घालते. इथे पुन्हा जातींची उतरंड, अर्थसत्तेची मर्यादा, पुढच्या सत्ताकारणात बाजी पलटल्यास आपला गड राखण्याची तजवीज आणि येन-केन-प्रकारेन ‘त्रिकुटा’मधील प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग हा अव्याहतपणे टिकविण्याची पराकाष्ठा इ. घटक काम करीत असतात. या साऱ्या रचनेमध्ये मग एक चायवाला ‘प्रधानमंत्री’ होतो आणि मग रचनेच्या नियंत्रणातील रस्सीखेच ही आत-बाहेर चालू होते. रचना ‘त्रिकुटा’चीच असते, खेळाडू किंवा भूमिका बदलतात. देश घडविण्याच्या वल्गना ऐकत बहुजन समाज मात्र पुढल्या पर्यायाची आशेने वाट पाहत आला दिवस रेटत राहतो! ‘त्रिकूट-माहात्म्य’ असे कालातीत असते!

Web Title: Trikuta dominates the same!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.