वर्ष तंत्रोदयाचे!
By Admin | Updated: January 1, 2015 02:58 IST2015-01-01T02:58:35+5:302015-01-01T02:58:35+5:30
नव्या पिढीला ज्ञानातून तंत्रज्ञान विकसित करण्याची सवय लावण्याचा आणि त्यासाठी पुरेशा संधी उपलब्ध करून देण्याचा एक बदल देशाला नवा उज्ज्वल चेहरामोहरा देऊ शकतो.

वर्ष तंत्रोदयाचे!
नव्या पिढीला ज्ञानातून तंत्रज्ञान विकसित करण्याची सवय लावण्याचा आणि त्यासाठी पुरेशा संधी उपलब्ध करून देण्याचा एक बदल देशाला नवा उज्ज्वल चेहरामोहरा देऊ शकतो. नव्या वर्षात असा बदल अपेक्षित अशासाठी आहे, की त्यातून रोजगार निर्माण करणारे प्रज्ञावान उद्योजक बनू शकतात. विज्ञान आणि गणितातील देशांतर्गत आणि जागतिक पातळीवरही अफाट वाढत्या संधींना गवसणी घालणेही त्यातून शक्य होईल.
हस्तिदंती मनोऱ्यात बसून माझा मार्ग एकला वा वायला, ही धारणा बदलून विज्ञान-तंत्रज्ञान आणि त्याचा वापर याला अनुकूल ठरणारे नेटवर्किंग बळकट करायला हवे. कल्पनांची भूमी ते संधींचा देश अशा परिवर्तनासाठी हा बदल नव्या वर्षात अपेक्षित आहे. आपल्या समस्या आणि आपल्याकडची परिस्थिती लक्षात घेऊन विज्ञानातील संशोधन होणे गरजेचे आहे. जिथं विज्ञानाविषयीचे कुतूहल अफाट आहे, त्या ग्रामीण भागातून ही गरज भागू शकते. म्हणून तिथे विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अधिक गुंतवणुकीचा बदल अपेक्षित आहे.
पली अर्थव्यवस्था बंदिस्त होती, तोवर कारखानदारीचा विकास आणि विस्तार सहज शक्य होता. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आपण तंत्रज्ञान आयात करू लागलो. हा दुधारी उपाय आहे. कारण आपण जेव्हा तंत्रज्ञान इतर देशातून आयात करतो, तेव्हा त्या आधारे आपण वस्तू-सेवांची निर्मिती करतो. पण त्याचीच दुसरी बाजू अशी, की ते तंत्रज्ञान आपल्याला देणाऱ्यांकडे त्याहून अधिक विकसित तंत्रज्ञान असते. त्याच्या आधारे गुणवृद्धी केलेला माल ते आपल्याकडे पाठवू शकतात. तेव्हा गुणवत्तेच्या कसावर आपला माल त्याची बरोबरी करू शकत नाही. खुल्या बाजारपेठेत हे होणे अपरिहार्य ठरते. या परिस्थितीत आपण गुणवत्तेच्या बळावर आपल्या वस्तूंचं नाणं खणखणीत असल्याचं वाजवून सांगायला हवं. हे घडायचं तर विज्ञानाच्या क्षेत्रात विपुल आणि दर्जेदार संशोधन व्हायला हवं. त्यातून विज्ञानातील संशोधन व त्याचा तंत्रज्ञानात वापर अशी साखळी विकसित व्हायला हवी. जगभरात आता ज्ञानाधारित अर्थव्यवस्था सिद्ध झाली आहे. जे देश ती नीट हाताळू शकतील त्यांनाच त्याचा जास्त लाभ होईल. अफाट लोकसंख्या हे आपलं बलस्थान होऊ शकते. त्यासाठी लोकसंख्येचे रूपांतर प्रज्ञावान मनुष्यबळात करणे गरजेचे आहे. हे साध्य होण्यासाठी एक महत्त्वाचा बदल अपेक्षित आहे. तो असा की संशोधन, उद्योजकता आणि भांडवलनिर्मिती या त्रिवेणीची एक नैसर्गिक साखळी आपल्याकडे तयार होणे गरजेचे आहे. कल्पनांची वानवा नाही, पण नवी कल्पना वा नवा शोध तंत्रज्ञानात रूपांतरित करून तिचा पर्याप्त वापर करणे ही एक सामूहिक सहभागातून सिद्ध होणारी फलश्रुती असते.
-डॉ. अनिल काकोडकर, अणुशास्त्रज्ञ