पोलिसांना माणूस म्हणून सन्मानाने वागवा!
By Admin | Updated: January 1, 2015 03:17 IST2015-01-01T03:17:53+5:302015-01-01T03:17:53+5:30
पोलीस हा माणूस आहे, यंत्र नाही. पोलिसालाही माणसासारखे वागवू, सन्मान देऊ, मनोबल उंचावण्यासाठी चांगले नूतृत्व उभे करू, त्याच्यावरला कामाचा ताण कमी होईल, त्याचा पगार वाढेल, बढती मिळेल,

पोलिसांना माणूस म्हणून सन्मानाने वागवा!
पोलीस हा माणूस आहे, यंत्र नाही. पोलिसालाही माणसासारखे वागवू, सन्मान देऊ, मनोबल उंचावण्यासाठी चांगले नूतृत्व उभे करू, त्याच्यावरला कामाचा ताण कमी होईल, त्याचा पगार वाढेल, बढती मिळेल, त्याला हक्काचे घर असेल, कुटुंबासोबत तो काही आनंदाचे क्षण घालवेल याची काळजी घेऊ आणि सर्वात महत्वाचे म्हणजे चांगल्या कागगिरीनंतर त्याच्या पाठीवर न चुकता कौतुकाची थाप देऊ आणि पडत्या काळात त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू...नव्या वर्षात राज्य सरकारने विशेषत: गृहविभागाने हा संकल्प करायला हवा. सरकारने हा संकल्प पूर्ण केला तर नक्कीच राज्य पोलीस दलातल्या शिपायापासून अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येकजण जीव ओतून आपले कर्तव्य बजावेल. पोलीस दलाची कागिरीही उंचावेल आणि प्रतिमाही उजळून निघेल.
आपल्या इतकेच शिक्षण झालेला पण आपल्या पेक्षा तुलनेने खुपच कमी काम करणारा दुसरा शासकीय अधिकारी किती पगार घेतो, त्याचे आयुष्य किती सुखकर आहे अशी तुलना हे तरूण करतात. या तुलनेत आपल्या पाठीशी उभे राहाणारे, अन्याय दूर करणारे, ऐकून घेणारे कोणीच नाही या भावनेची भर पडते आहे. ही खूप गंभीर बाब आहे.
शहरात, राज्यात, देशात कायदा व सुव्यवस्था उत्तम असते तेथेच उद्योग वाढतात, प्रगती होते. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही पोलिसांवर आहे. महाराष्ट्र पोलीस दलात ९७ टक्क्यांहून अधिक मनुष्यबळ हे शिपायापासून पोलीस निरिक्षक पदावर कार्यरत आहे. राज्य पोलीस दलाचा हा कणा आहे, जो पोलीस दलाला ताठ मानेने उभे करतो. त्यांच्यामुळेच पोलीस दल धावू शकते, पाहू शकते, ऐकू शकते. आयपीएस अधिकारी फार तर आपले डोके चालवू शकतात. अनेकदा या आयपीएस अधिकाऱ्यांपेक्षा शिपाई, फौजदार किंवा निरिक्षक जास्त तल्लख असतात. रस्त्यावर उभे राहाणारे हेच. गुन्हा नोंदवून त्याचा तपास करणारे हेच. भूक तहान विसरून उन्हा पावसात धावपळ करून, कुटुंब वाऱ्यावर सोडून आरोपींचा माग काढणारे हेच. आरोपींची चौकशी करून न्यायालयासमोर पुराव्यांची मालिका ठेवणारे हेच. असे असूनही हा वर्ग आज उपेक्षित आहे. अनेक समस्या या वर्गाला भेडसावतात. निरिक्षकापर्यंतच्या पोलिसांच्या नेमक्या समस्या काय आहेत, हे जाणून त्या सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना गेल्या ६६ वर्षांमध्ये तरी झालेली नाही.
नुसते मनुष्यबळ वाढवून भागणार नाही. नव्याने येणारे मनुष्यबळ प्रशिक्षित आहे का, त्यांच्यात गुणवत्ता आहे का? गुणवत्ता वाढविण्यासाठी राज्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रालाच मुळात गुणवत्ता आहे का हे सरकारने तपासले पाहिजे. या केंद्रांमध्ये प्रशिक्षण देणारे मुळात रोल मॉडेल असायला हवेत. पोलीस दलात उत्तमोत्तम मनुष्यबळ सहभागी व्हावे याची जाणीव त्याला हवी. मात्र पोलीस दलात आपल्या कारनाम्यांनी जे बदनाम आहेत, ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत अशा अधिकाऱ्यांच्या खांद्यावर केंद्राची जबाबदारी आहे. त्यांच्या हातून चांगले मनुष्यबळ कसे तयार होणार. बरे, केंद्रात शिकवणाऱ्यांचीच ३० टक्के पदे रिक्त आहेत. एका वर्गात अडीजशे ते तीनशे प्रशिक्षणार्थी पोलीस कोंबले जातात. शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत प्रशिक्षक कसे पोचणार. त्याच्यातले कलागुण कसे ओळखणार हा प्रश्नच आहे. इंग्लंच्या पोलीस कमिशनर हा तेथील सर्वात जास्त पगार घेणारा सरकारी नोकर आहे. आपल्या इथे आयएएस अधिकारी वेतश्रेणीत पुढे आहेत. पोलीस महासंचालक, आयुक्तापासून शिपायापर्यंतचे मनुष्यबळ हे तमाम शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त काम करतात. हे काम जोखमीचे आणि कामाचे स्वरूप तणावपूर्ण असते. एक दिवस..फक्त एक दिवस एसी केबीनमध्ये बसणाऱ्या, पाचच्या ठोक्याला समोर पडलेले काम बाजुला ठेवून कचेरीबाहेर पडणाऱ्या चाकोरीबद्ध शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शहरातले ट्राफीक कंट्रोल करावे. दोन तासही हे अधिकारी कर्मचारी हे कर्तव्य पार पाडू शकत नाहीत. आमच्या काळात तलाठी आणि पोलीस शिपायाच्या पगारातला फरक पाचशे रूपयांचा होता. आज तो दहा पटींच्या घरात आहे. तहसीलदार आणि पोलीस निरिक्षक यांचा दर्जा समान होता. आज तहसीलदार अधिकारांसह प्रत्येकबाबतीत निरिक्षकाच्या खुप पुढे आहेत. मग पगारात दुजाभाव का? सरकारने हे लक्षात घ्यायला हवे की पोलीस दलात शिपाई म्हणून भरती होणारे बहुतांश तरूण ग्रॅज्युएट, डबल ग्रॅज्युएट आहेत. ते सुशिक्षित आणि जागरूकही आहेत. सरकारने याची तातडीने दखल घेणे गरजेचे आहे. नव्या वर्षात सरकारने पोलिसांना सन्मानाने वागवले पाहिजे. तरच पोलीस दलाचे मनोबल उंचावेल.
एसीएस होम आयपीएस का नाही? : पोलिसांचा विषय हाताळणारे, निर्णय घेणारे गृहविभागाचे अप्प मुख्य सचिव हे पद आयएएस अधिकाऱ्याऐवजी आयपीएस अधिकाऱ्याकडे का दिले जात नाही? पोलीस महासंचालकांइतका अनुभव असलेला, गुणी, स्वच्छ प्रतिमेचा अधिकारी ही जबाबदारी प्रभावीपणे हाताळू शकतो. मुळात ज्याने आपले अख्खे आयुष्य पोलिसांसोबत घालविलेले आहे त्यालाच पोलिसांचे प्रश्न, समस्या, अडचणी समजू शकतात, त्याचे गांभीर्य समजू शकते.
-अरविंद इनामदार
माजी पोलीस महासंचालक