द्विधा मन:स्थितीतील मतदारांची शोकांतिका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 05:02 AM2019-04-16T05:02:36+5:302019-04-16T05:03:17+5:30

- गुरुचरण दास २०१४ साली मी जेव्हा मोदींच्या बाजूने मतदान केले, तेव्हा मी माझे डावे मित्र गमावून बसलो. नोटाबंदी, ...

The tragedy of the mind-boggling voters | द्विधा मन:स्थितीतील मतदारांची शोकांतिका

द्विधा मन:स्थितीतील मतदारांची शोकांतिका

Next

- गुरुचरण दास

२०१४ साली मी जेव्हा मोदींच्या बाजूने मतदान केले, तेव्हा मी माझे डावे मित्र गमावून बसलो. नोटाबंदी, एककल्ली कारभार आणि लोकशाही संस्थांचे दुर्बलीकरण याबद्दल मी मोदींवर टीका करताच, मी माझे उजवे मित्र गमावले. माझ्यासाठी आता एकही मित्र उरला नाही, हे बघून आपण योग्य जागी पोचलो आहोत, असे मला वाटू लागले आहे.
पुन्हा निवडणुका आल्या आणि माझा भ्रमनिरास झाला. कारण ‘अच्छे दिन’ काही आले नव्हते, पण राष्ट्रवाद परत आला होता, तसेच ज्या देशावर मी प्रेम केले, तो बदलत आहे, असे मला दिसून आले. मोदी भक्तांनी आणि मोदी द्वेष्ट्यांनी मला घेरले होते, पण कुणाला मतदान करावे, हे मला कळत नव्हते. मला राहुल गांधीविषयी विश्वास वाटत नव्हता, तसेच घराणेशाही मला आवडत नव्हती. महागठबंधनाचे मला भय वाटत होते, कारण ‘मोदी हटाव’खेरीज त्यांच्यापाशी अजेंडा नव्हता. मी बुचकळ्यात पडलो होतो, पण मला एकच समाधान होते की, असे वाटणारा मी एकटाच नव्हतो.
पाच वर्षांपूर्वीदेखील मी असंतुष्ट होतो. कारण भाववाढ मोठ्या प्रमाणावर झाली होती, विकासदर घसरला होता. भ्रष्टाचाराने थैमान घातले होते आणि संपुआचे सरकार पंगू झाले होते. भारत विकासापासून दूर जातो आहे, असे मला वाटले. देशात तरुणांची संख्या जास्त होती व तीच मला संधी वाटत होती. त्या लोकांना जर रोजगार मिळाला, तर देशाचा जीडीपी वाढला असता. त्यामुळे त्यानंतर सत्तेवर येणाऱ्या नेत्यांसमोर रोजगार निर्मितीचे फार मोठे आव्हान होते. मोदी हेच आशेचा किरण आहेत, असे मला त्यावेळी वाटले!


पण त्यांच्याबाबत निर्णय घेणे सोपे नव्हते. ‘कारण हिंदू राष्ट्रवादाचे मला कधीच आकर्षण वाटले नव्हते. मोदींच्या हुकूमशाही प्रवृत्ती धर्मनिरपेक्षतेसाठी धोकादायक ठरतील, याची मला जाणीव होती. गुजरातच्या २००२ मधील कलंकाची मी फारशी चिंता बाळगली नाही, पण आपण रोजगार निर्मिती करू शकलो नाही, तर आपण एका पिढीचे नुकसान करू, असे वाटत होते. त्यापूर्वी १९५० ते १९९० या काळातील लायसन्स राजमुळे आपण दोन पिढ्या गमावल्या होत्या. अशा स्थितीत देशातील लोकशाहीची ताकद हुकूमशाही प्रवृत्तीचा मुकाबला करू शकेल आणि मोदींनी २००२च्या दंगलीपासून बोध घेतला असेल, असे मला वाटत होते.
पण आता पाच वर्षे उलटून गेल्यावर माझ्या पदरी निराशा आली आहे. कारण कबूल केलेले रोजगार कुठेच दिसत नव्हते आणि शेतकरी संकटात सापडले होते. परिवर्तन घडवून आणणारे नेते म्हणून मोदी ओळखले जातील, असे मला वाटले होते, पण माझी निराशा झाली, त्यांना मिळालेल्या बहुमताच्या जोरावर ते आवश्यक सुधारणा घडवून आणू शकले नाहीत, कृषी उत्पादनाचे वितरण करण्यात त्यांनी सुधारणा केल्या असत्या, तर शेतकऱ्यांच्या यातना कमी झाल्या असत्या. बँकांवरील संकटाचा उपयोग करून सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ते खासगीकरण करू शकले असते, पण आज मात्र त्या बँकांची वाटचाल एअर इंडियाच्या अवस्थेकडे सुरू आहे, अशी मला भीती वाटते आहे!

हे सर्व असले, तरी आपले अर्थकारण सुस्थितीत आहे, याचे मला समाधान आहे. आर्थिक तूट कमी झाली आहे. चलनवाढ विक्रमी दोन टक्के ते तीन टक्के इतकी खाली आली आहे आणि पायाभूत सोईमध्ये सुधारणा दिसत आहे. लोकांना डिजिटायझेशनकडे नेण्याच्या मोदींच्या हव्यासापायी भ्रष्टाचारात घट झाली आहे. त्यांनी घडवून आणलेल्या सुधारणांमुळे विशेषत: दिवाळखोरीचा कायदा, वस्तू सेवा कर आणि प्रत्यक्ष लाभ हस्तांतरित करणे भविष्यात लाभ होणार आहे. नोटाबंदी हे संकटच होते, पण वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीत त्रुटी असूनही तो गेमचेंजर ठरला आहे. दिवाळखोरीच्या कायद्यामुळे मालमत्तेचा उपयोग उत्पादकतेसाठी होईल. कोट्यवधी लोकांजवळ बँकखाती झाली आहेत आणि मोबाइल बँकिंगमध्ये वाढ होत आहे. सरकारची सबसिडी रोखीने हस्तांतरित होत आहे. नागरिक आणि शासन यांच्यातील आर्थिक व्यवहार आॅनलाइन पद्धतीने होऊ लागले आहेत. त्यामुळे जागतिक बँकेच्या ‘काम करण्यातील सुलभताविषयक क्रमवारीत भारताने ३० क्रमांकाने आगेकूच केली आहे! भारत चांगल्या प्रकारे काम करू लागला आहे. यांचे श्रेय मोदींना द्यावेच लागेल.
एवढे यश संपादन करूनही मी मोदींच्या बहुमताच्या राजकारणामुळे असमाधानी आहे. हिंदू राष्ट्रवादाचा त्यांचा आग्रह मला खटकतो. मोदींमुळे देशात विभाजनवादी प्रवृत्तीत वाढ झाली आहे आणि अल्पसंख्यांकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. लोकशाही संस्था दुबळ्या झाल्या आहेत. त्यामुळेच मला त्यांच्या जीडीपीबद्दल व रोजगारात वाढ झाल्याच्या दाव्याबद्दल विश्वास वाटत नाही.
अशा स्थितीत मी कुणाला मतदान करावे? सध्या तरी मोदी हेच लोकप्रिय नेते दिसतात. विरोधक एकत्र येऊन प्रभावी प्रशासन देतील, असे वाटत नाही. धर्मनिरपेक्ष मोदींना मी अधिक पसंती दिली असती किंवा अधिक अनुभवी राहुल गांधींची मी निवड केली असती, पण या दोन्ही अशक्य गोष्टी आहेत. एक मध्यममार्गी म्हणून मी अधिक वास्तववादी आहे आणि म्हणूनच पूर्वग्रहदूषित नाही, पण म्हणूनच मी कुणाला मत द्यावे, या विवंचनेत सापडलो आहे.
(माजी सीईओ, प्रॉक्टर अँड गँबल कंपनी)

Web Title: The tragedy of the mind-boggling voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.