आंदोलनाची शोकांतिका
By Admin | Updated: January 29, 2015 06:46 IST2015-01-29T00:49:18+5:302015-01-29T06:46:51+5:30
सत्ताकारण की समाजकारण, हा सनातन प्रश्न अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना पडतो. परंतु, खरोखरच राजकारण करताना किती तडजोडी कराव्या लागतात,

आंदोलनाची शोकांतिका
विजय बाविस्कर -
सत्ताकारण की समाजकारण, हा सनातन प्रश्न अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना पडतो. परंतु, खरोखरच राजकारण करताना किती तडजोडी कराव्या लागतात, हे आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेला समजले असेल. अन्यथा, कायदेशीरदृष्ट्या उसाला वाजवी व किफायतशीर किंमत (एफआरपी) देणे बंधनकारक असताना आंदोलनाचा इशारा देण्याची वेळ आली नसती. दोन-तीन वर्षांपासून कारखान्यांच्या धुराड्यांबरोबर रस्त्यांवर टायर पेटवून आंदोलन करणारे राजू शेट्टी इतके मवाळ झाले नसते. ते आणि त्यांच्याबरोबरच्या इतर शेतकरी संघटना ऊसाला तीन-साडेतीन हजार रुपये भाव देण्याची मागणी दोन-तीन वर्षांपासून करीत होते. आता किमान ‘एफआरपी’ द्या, असे त्यांना म्हणावे लागत आहे. मुख्यमंत्रीही साखर कारखानदारांना एफआरपी द्यायलाच लावू, असे आश्वासन देऊन समजूत काढत आहेत. ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’ असा खेळ चाललाय आणि त्यात ऊस उत्पादक भरडला जातोय. साखरेचे भाव पडल्याने कारखान्यांना एफआरपी देणे शक्य नाही, हेदेखील फारसे पटत नाही. राज्यातील ज्या २६ कारखान्यांनी एफआरपी दिली, त्यांना कसे परवडले? येथे कारखान्यातील गैरव्यवस्थापन आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा डोळ्याआड करून चालणार नाही.
टोल जावो... ‘घंटा’ वाजो
बेळगाव नाट्य संमेलनाचे बिगुल वाजत आहे. कर्नाटक शासनाकडून आकारला जाणारा अवाजवी टोलचा मुद्दा यानिमित्ताने पुढे आला आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या गाडीसाठी १५ ते २० हजार रुपयांपर्यंत कितीही टोल आकारला जातो. त्यामुळे मराठी नाटक कंपन्यांना कर्नाटकात दौरा काढणेच परवडत नाही. या आर्थिक मुद्द्यामुळे बेळगाव आणि सीमा भागात अनेक वर्षांपासून मराठी नाटक पोहोचलेले नाही. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी नाट्य संमेलनाच्या निमित्ताने या मुद्द्याकडे लक्ष वेधले आहे. आठ दिवसांचे संमेलन होईल. यानिमित्ताने सीमा भागातील मराठी बांधवांना नाट्य चळवळीची माहिती होईलच; पण त्याचबरोबर टोलबाबत काही ठोस निर्णय झाला, तर सीमा भागातील रसिकांची मराठी नाटकांची भूक भागेल. टोल जावो... ‘घंटा’ वाजो हीच सीमावासीयांची भावना आहे.
प्रतिसाद की प्रमाद?
पुणे बार असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘मिस्टर अॅँड मिसेस’ नाट्य प्रयोगाच्या वेळी अश्लील शेरेबाजीच्या कथित प्रकरणामुळे सांस्कृतिक क्षेत्रात उलट-सुलट चर्चा सुरू आहे. या नाटकातील कलावंत चिन्मय मांडलेकर आणि मधुरा वेलणकर यांनी फेसबुकवरून खंत मांडताना सुशिक्षितपणा आणि सुसंस्कृतता यांचा संबंध नसतो, असे म्हटले आहे. बार असोसिएशनने याचा इन्कार केला आहे. उत्सवी वातावरणात असा प्रकार झाला, असे गृहीत धरले, तरी कोणा एका कंपूमुळे समस्त पुणेकरांना वेठीस धरणे किंवा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणे कितपत योग्य आहे, याचा विचारही होण्याची गरज आहे. या प्रकाराचे कोणतेही समर्थन करता येणार नाहीच; पण शेरेबाजीचे आरोप हे स्थल-कालसापेक्ष असतात. ‘पब्लिसिटी स्टंट’साठी ते झाले असावेत, असा बार असोसिएशनने केलेला आरोपही दुर्लक्षित करण्यासारखा नाही. माध्यमांनी ज्या पद्धतीने या प्रकाराला ‘हवा’ दिली आणि अतिरंजित वृत्तांत दिले, त्यावरदेखील विचार व्हायला हवा. अशी ‘मीडिया ट्रायल’ एखाद्या संघटनेच्या आजवरच्या कामालाच बट्टा लावू शकते आणि प्रेक्षक-कलावंतांतील नात्यात दुरावा निर्माण करू शकते. मनोरंजनाच्या क्षेत्रात प्रेक्षकांचा प्रतिसाद, हाच कलाकारांचा प्राणवायू आहे. मात्र, अशा प्रकारच्या आरोप-प्रत्यारोपांनी प्रेक्षकांचा प्रतिसादही ‘सेन्सॉर’ होऊ नये आणि रसिकांच्या अतिउत्साही प्रतिसाद तथा प्रमादामुळे कलाकारांचे मनोधैर्य खच्ची होता कामा नये.