तात्या कोठेंचा दरबार विसावला...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2016 02:36 IST2016-01-22T02:36:50+5:302016-01-22T02:36:50+5:30
सकाळी ७ पासूनच घरासमोर माणसांची गर्दी. कोणाच्या हातात कागदाचे भेंडोळे तर कोणाच्या डोळ्यांत काम व्हावे ही लागलेली ओढ

तात्या कोठेंचा दरबार विसावला...
सकाळी ७ पासूनच घरासमोर माणसांची गर्दी. कोणाच्या हातात कागदाचे भेंडोळे तर कोणाच्या डोळ्यांत काम व्हावे ही लागलेली ओढ ! सकाळी आठ-साडेआठपर्यंतच ही गर्दी २००-३०० लोकांपर्यंत पोहोचायची आणि पूजा-अर्चा आटोपून तात्या दिवाणखान्यात दाखल व्हायचे... तिथेच भरायचा तात्यांचा दरबार ! तब्बल ३५ वर्षांपासून सोलापूरकरांच्या अंगवळणी पडलेला तात्यांचा दरबार आता विसावला आहे.
विष्णुपंत तथा तात्या कोठे यांचे निधन झाले आणि सोलापूरकरांना या विसावलेल्या दरबाराची मनाला चटका लावणारी जाणीव झाली. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणावर ज्यांनी-ज्यांनी राज्य केले त्यांच्या आपापल्या गावात आणि मतदारसंघात त्यांचा व्याप सांभाळणारी ‘कारभारी’ मंडळी राज्याला नवी नाहीत. विष्णुपंत कोठे यांनीही सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘कारभाऱ्या’ची भूमिका मोठ्या खुबीने आयुष्यभर यशस्वीपणे वठविली. पण ते केवळ राजकारणापुरते ‘कारभारी’ न राहता स्वत: शिंदे आणि सोलापूरकरांचे लाडके तात्या कधी बनले हे कळलेही नाही. राजकारण्यांच्या संपर्क कार्यालयाची संकल्पना ८०च्या दशकापासून यशस्वीच नाही तर लोकप्रिय करून दाखविण्याची किमया तात्यांनी केली. गावात नेता नाही म्हणून कोणाचे काम अडले असे त्यांनी या कार्यालयाच्या माध्यमातून कधीच घडू दिले नाही. बहुभाषिक सोलापुरातील पद्मशाली समाजातील गिरणी कामगाराचा हा मुलगा आपली कारकीर्द जुन्या मिल चाळीतील दोन खोल्यांच्या घरापासून सुरू करतो काय आणि पाहता पाहता जिल्ह्याच्या राजकारणात आपली मांड पक्की करतो काय ! विष्णुपंत कोठे यांचा प्रवास अनेकांना अचंबित करणारा असाच. सुशीलकुमार शिंदे १९७४ साली करमाळा मतदारसंघातून विधानसभेत दाखल झाले. त्यानंतर १९७८साली उत्तर सोलापूर मतदारसंघात त्यांचे आगमन झाले. १९८० पासून त्यांच्या संपर्कात आलेल्या कोठे यांनी त्यांच्या स्थानिक राजकारणाची संपूर्ण सूत्रे आपल्या हाती घेतली. सर्व जाती-धर्मांची व गटा-तटांची मोट बांधून शिंदेंचे राजकारण बळकट करण्याचे काम केले. मोठ्या नेत्यांचा शिलेदार म्हणून काम करणाऱ्या माणसांचे विश्व राजकारणापुरतेच मर्यादित राहते हा दंडक त्यांनी फोल ठरविला. शिंदेंचे सोलापूर जिल्ह्यातील राजकारण सांभाळत असताना खुद्द शिंदेंशी मैत्री पक्की राखत त्यांनी सर्वच क्षेत्रात जिवाभावाच्या मित्रांचा गोतावळा तयार केला. त्यात अगदी स्व. निर्मलकुमार फडकुलेंपासून ते थेट रामदास फुटाणे, फ. मुं. शिंदेंसारख्या साहित्यिकांबरोबरच बाबूराव मैंदर्गीकर यांच्यासारख्या प्रकाशकाचाही समावेश होता. आपल्या दरबारात येणाऱ्यांचे काम मार्गी लागणे हे त्यांचे पहिले ध्येय असायचे आणि नंतर ती व्यक्ती कोण हा विचार असायचा. सोलापूरच्या साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीला पडद्यामागे राहून भक्कम बळ देण्याचे काम त्यांनी केले. स्व. निर्मलकुमार फडकुले यांना अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले नाही, ही खंत सोलापूरकरांना नेहमीच वाटायची. फडकुलेंच्या निधनानंतर त्यांच्या नावाचे प्रतिष्ठान स्थापन करून विविध उपक्रम आणि आलिशान फडकुले सभागृहाच्या माध्यमातून आगळी आदरांजली वाहण्याचे काम तात्यांनी केले. राजकारणात कोणीही कायमचा मित्र नसतो अथवा शत्रूही नसतो, या पारंपरिक नियमाशी बंड करण्याचा त्यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला. मागील पाच वर्षे शिंदे व कोठे परिवाराची पुढची पिढी राजकारणात गतीने सक्रिय झाली. प्रणिती शिंदे यांच्या विरोधातच तात्यांचे चिरंजीव महेश कोठे विधानसभा निवडणूक लढले ! असे घडत असले तरी तात्यांचा जीव मात्र शिंदेंच्या मैत्रीपाशात अडकून राहिला. सोलापूरच्या राजकारणावर दीर्घकाळ हुकूमत राखलेल्या तात्यांनी आपला दरबार विश्वास, जिव्हाळा आणि निष्ठेने जपला होता. आज तो दरबार विसावला आहे. तो दरबार फुलवित ठेवण्याची जबाबदारी आता त्यांचे चिरंजीव महेश आणि नातू डॉ. सूरज व देवेंद्र यांच्यावर आली आहे.
- राजा माने