आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 09:37 IST2025-09-02T09:36:48+5:302025-09-02T09:37:42+5:30
डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेमुर्वतखोर धोरणांमुळे एक मात्र झाले. जगाच्या फेरमांडणीला सुरुवात झाली. ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकवटू लागले आहेत.

आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
बराक ओबामांच्या देशात डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष होणे हा बदललेल्या जगाचा पुरावा. जागतिकीकरणाने जगाचे रूपांतर ‘ग्लोबल व्हिलेज’मध्ये केले असे वाटत असतानाच, संकुचिततेच्या पायावर उभा राहिलेला प्रखर राष्ट्रवाद वाढत गेला. डोनाल्ड ट्रम्प हा या आक्रमक राष्ट्रवादाचा चेहरा! ‘अमेरिका फर्स्ट’ असे म्हणताना त्यांना अमेरिकेशिवाय अन्य कोणाचाही विचार करायचा नाही. ट्रम्प यांच्या स्वार्थांध आणि संकुचित भूमिकेमुळे जगाला धोक्याच्या वळणावर उभे केले आहे. शिवाय, इतरत्रही फार वेगळे चित्र नाही. अनेक महत्त्वाच्या देशांमध्ये ट्रम्प यांच्याच स्थानिक आवृत्त्या दिसतात! डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेमुर्वतखोर धोरणांमुळे एक मात्र झाले. जगाच्या फेरमांडणीला सुरुवात झाली. ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकवटू लागले आहेत.
चीनच्या तियेनजिन शहरात जे घडते आहे, त्यातून बदलणाऱ्या समीकरणांची खात्री पटावी. शांघाय सहकार्य संघटनेची शिखर परिषद तिथे सुरू आहे. जगातील निम्मी लोकसंख्या या संघटनेमध्ये आहे. भारत, चीन आणि रशिया एकत्र आले तर जगाचे प्राक्तन बदलू शकते. भारतावर तब्बल ५० टक्के व्यापार शुल्क लावण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला. हे संकट टाळण्यासाठी भारताने प्रयत्नही केले. मात्र, अमेरिकेच्या दबावाखाली न जाता पर्याय शोधण्याचा निर्णय भारताने आता घेतला आहे. जपान, चीन, रशिया यांच्याशी भारताचा संवाद सुरू आहे. त्यामुळे ट्रम्प चांगलेच भडकलेले आहेत. रशियाकडून तेल खरेदी करणे भारताने बंद करावे, अशी ट्रम्प यांची इच्छा.
रशियाची अर्थव्यवस्था अडचणीत यावी असे अमेरिकेला वाटते. मात्र, भारत आणि रशिया एकत्र असतील तर ते शक्य नाही. एकमेकांचे स्पर्धक असलेले भारत आणि चीनही आता एकत्र येत आहेत. सात वर्षांनंतर प्रथमच नरेंद्र मोदी चीनमध्ये गेले. ‘चिंडिया’च्या सामर्थ्याचा ट्रम्प यांना अंदाज आहे. ‘शांघाय सहकार्य संघटना’ स्थापन झाली २००१ मध्ये. तेव्हा तिचा हेतू मर्यादित होता. आता मात्र भारत, चीन, रशिया, पाकिस्तान, इराण, मलेशिया, इंडोनेशियासह अनेक महत्त्वाचे देश या संघटनेमध्ये आहेत. एकूणच जगाच्या राजकारणात नव्या समीकरणांचा काळ सुरू आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारयुद्ध, पाश्चात्त्य देशांनी रशियावर लादलेल्या निर्बंधांचा परिणाम आणि युरोपियन युनियनमधील अंतर्गत तणाव या नव्या समीकरणांमध्ये भारताचे स्थान अधिक महत्त्वाचे. भारत आणि चीन यांचे संबंध फार बरे नाहीत.
रशिया आणि चीन यांच्याही संबंधांमध्ये कटुता आहे. मात्र, अमेरिकेच्या एकाधिकारशाहीला विरोध करायचा असेल तर बहुध्रुवीय जग निर्माण करावे लागेल. त्यासाठी या तिन्ही देशांना एकत्र यावे लागेल. चीनची आर्थिक शक्ती मोठी आहे. रशियाकडे ऊर्जा आणि लष्करी सामर्थ्य आहे. वेगाने विकसित होऊ शकणारी भारत ही नवी अर्थव्यवस्था आहे. हे तिन्ही देश एकत्र आल्यास जगाच्या अर्थकारणाला नवा चेहरा मिळू शकतो. ‘ब्रिक्स’मध्ये हे तिघे एकत्र आहेतच. आता व्यापार, पायाभूत सुविधा आणि संरक्षण या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढले तर सामर्थ्यशाली गट तयार होऊ शकतो. तिकडे, ‘युरोपियन युनियन’ हा खरे म्हणजे अमेरिकेचा परंपरागत मित्र. मात्र, ट्रम्प यांचे ‘अमेरिका फर्स्ट’ सुरू झाले आणि युरोप-अमेरिकेत दुरावा वाढू लागला.
कधी व्यापार करार, कधी नाटो, कधी हवामान बदलाचा मुद्दा यामुळे युरोप आणि अमेरिकेचे संबंध आता पूर्वीचे उरलेले नाहीत. ‘लंडनचे महापौर दहशतवादाला आसरा देत आहेत’ अशा प्रकारचे विधान ट्रम्प यांनी केले. अशा वेगवेगळ्या विधानांमुळे युरोपातील नेते अमेरिकेपासून दूर जाऊ लागले आहेत. नरेंद्र मोदींनी याच कालावधीत इंग्लंडला भेट देणेही तेवढेच महत्त्वाचे. पूर्वी चीनला एकटे पाडण्याची भाषा केली जात होती. अमेरिका तुलनेने उदार आणि खुली होती. आता मात्र ट्रम्प यांच्यामुळे अमेरिकाच एकाकी पडेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. तरीही चीन वा रशियावर अवास्तव विश्वास ठेवून चालणार नाही. अमेरिकेचे महत्त्व नाकारूनही चालणार नाही. तंत्रज्ञान आणि संरक्षण या क्षेत्रातील अमेरिकेची ताकद आजही मोठी आहे. बराक ओबामा हा उदार अमेरिकेचा चेहरा होता. ओबामांनंतर ट्रम्प आल्याने समीकरणे बदललेली आहेत. नवी जागतिक समीकरणे ही भारतासाठी संधी आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणाचे भान त्यासाठी आवश्यक आहे. आपल्या मुत्सद्देगिरीचा कस लागणार आहे!