आजचा अग्रलेख: बदला, सूड.. अन् जनता !

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 09:39 IST2025-01-25T09:36:19+5:302025-01-25T09:39:58+5:30

Shiv Sena News: दोन शिवसेनेचे दोन मेळावे मुंबईत पार पडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, हे भाजप वगळून इतर कोणालाही माहिती नसताना दोन्ही शिवसेनेने शक्तिप्रदर्शन केले. उद्धव ठाकरे यांनी सूड घेण्याची भाषा केली, तर एकनाथ शिंदे यांनी उद्धवसेनेचा माज कसा उतरवला हे सांगितले. बदला घेणे, सूड घेणे किंवा माज उतरवणे, अशी भाषा माणसे कधी करतात?

Today's Editorial: Revenge, revenge.. and the people! | आजचा अग्रलेख: बदला, सूड.. अन् जनता !

आजचा अग्रलेख: बदला, सूड.. अन् जनता !

दोन शिवसेनेचे दोन मेळावे मुंबईत पार पडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार, हे भाजप वगळून इतर कोणालाही माहिती नसताना दोन्ही शिवसेनेने शक्तिप्रदर्शन केले. उद्धव ठाकरे यांनी सूड घेण्याची भाषा केली, तर एकनाथ शिंदे यांनी उद्धवसेनेचा माज कसा उतरवला हे सांगितले. बदला घेणे, सूड घेणे किंवा माज उतरवणे, अशी भाषा माणसे कधी करतात? काही व्यक्ती सूड घेण्याला न्याय मिळवण्याचा मार्ग मानतात. यातून समाधान मिळेल, असे त्यांना वाटते. एखाद्या व्यक्तीला स्वतःमध्ये कमीपणा वाटू लागला आणि इतरांचे यश पाहून असुरक्षितता वाटू लागली, तर ती व्यक्ती दुसऱ्याचा माज उतरवण्याची भाषा करू लागते. त्याअर्थाने या विधानांकडे बघायचे की नाही, याचा विचार विधान करणाऱ्यांनी आणि त्या विधानांवर श्रद्धा ठेवणारे नेते, कार्यकर्त्यांनी करायचा आहे. शिवसेनेच्या दोन्ही मेळाव्यांत एकमेकांवर यथेच्छ आरोप-अप्रत्यारोप झाले. एकमेकांची उणीदुणी काढून झाली. एकनाथ शिंदे यांनी आपण डीसीएम म्हणजे ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ आहोत, असे सांगितले. तुम्ही विविध पदांवर काम कराल, मात्र शिवसैनिकांशिवाय कोणतेही पद मोठे नाही. ज्या शिवसैनिकांनी तुम्हाला मोठे केले त्यांच्या पाठीशी उभे राहा, असेही शिंदे म्हणाले. याच मुद्द्यावर बोट ठेवत उद्धव ठाकरे यांनी ‘पालकमंत्रिपदासाठी रस्त्यावर टायर जाळणारे बाळासाहेबांचे शिवसैनिक असू शकत नाहीत’, अशी बोचरी टीका केली. शिंदे यांच्या मतानुसार जर शिवसैनिक या पदापेक्षा अन्य कोणते पद मोठे नसेल, तर सध्या पालकमंत्रिपद, बंगले यावरून जी भांडणे आणि टोकाची भूमिका घेणे सुरू आहे ते काय आहे? -  याचे उत्तर या मेळाव्यातून जनतेला मिळालेले नाही. उद्धव ठाकरे यांनीदेखील सूड घेण्याची भाषा केली. ‘आपण भ्रमात राहिलो, म्हणून आपली फसगत झाली’, असेही ते म्हणाले. आपण भ्रमात राहिलो याचा अर्थ ‘आपल्या लोकांना आर्थिक पाठबळ देऊन फोडणारे आपण ओळखू शकलो नाही, म्हणून फसगत झाली’, असा काढायचा का? या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन सूड कोणी कोणावर घ्यायचा...? याचे उत्तर त्या मेळाव्याला गेलेल्या नेते, कार्यकर्त्यांना मिळालेले नाही.

एकनाथ शिंदे ‘आपला हात देणाऱ्याचा आहे’, असे म्हणत होते. यांच्यासोबत गेलेले नेते ‘मातोश्रीवर इन्कमिंग आहे, आउटगोइंग नाही’, असे सांगत होते. तर, ‘ईडी आणि अटकेच्या भीतीपोटी हे लोक शिवसेना सोडून जाताना मातोश्रीवर रडले’, असा तर्क उद्धवसेना देते. या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्या लाखो लोकांनी दोन्ही शिवसेनेला मतदान केले, त्या सर्वसामान्य जनतेला, मतदारांना या दोन मेळाव्यांनी काय दिले? ज्या पद्धतीची भाषणे दोन्ही मेळाव्यांत झाली, तशी भाषणे निवडणूक काळात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि उन्माद निर्माण करतात. जेव्हा निवडणुका नसतात, तेव्हा आपले नेते आपल्या रोजच्या जगण्या-मरण्याचे प्रश्न किती पोटतिडकीने मांडतील, याकडे सर्वसामान्य जनता अतिशय आशेने बघत असते. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणात कितीही राजकीय टोलेबाजी असली, तरीही त्यांच्या भाषणाचा केंद्रबिंदू कायम सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणूस असायचा. त्या माणसाचे प्रश्न, त्यांना सातत्यानं येणाऱ्या अडचणी मांडत असताना, त्याच मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या स्वाभिमानाला बाळासाहेब कायम स्पर्श करायचे. म्हणून, बाळासाहेब आपल्या मनातले बोलत आहेत, ही भावना प्रत्येकाच्या मनात असायची. काल झालेल्या दोन्ही मेळाव्यांनी हीच भावना किती लोकांच्या मनात जागी केली, याचे उत्तर या दोन नेत्यांनी द्यायचे आहे.

वसंतदादा पाटील मुख्यमंत्री होते. सांगलीच्या विश्रामगृहावर त्यांची बैठक सुरू होती. काही शेतकरी त्यांना भेटायला आले. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या भेटीला नकार दिला. काही वेळाने दादांना ही गोष्ट कळली, तेव्हा ज्या झाडाखाली शेतकरी बसले होते, तेथे दादा गेले आणि त्यांच्याजवळ जमिनीवर बसले. एक छायाचित्रकार फोटो काढू लागला, तेव्हा दादा त्याला म्हणाले, हा फोटो उद्याच्या पेपरमध्ये छाप आणि त्याखाली लिही, ‘सरकार शेतकऱ्यांच्या पायाशी...’ ही भावना, सर्वसामान्यांविषयीची आपुलकी आजच्या राजकारण्यांमध्ये दिसते का? कालच्या दोन्ही मेळाव्यांमधून अशी कुठलीही भावना जनतेला जाणवली नाही. ती जाणीव व्हावी, यासाठी दोन्ही नेत्यांना शुभेच्छा.

Web Title: Today's Editorial: Revenge, revenge.. and the people!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.