आजचा अग्रलेख: भागवतांचा सुविचार संग्रह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 10:12 IST2025-11-11T10:11:04+5:302025-11-11T10:12:54+5:30
Mohan Bhagwat: देशाच्या सर्वच प्रमुख घटनात्मक पदांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक विराजमान असण्याच्या काळात सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांनी संघाला कोणताही एक राजकीय पक्ष प्रिय किंवा अप्रिय असण्याचे कारण नाही, असे सांगून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.

आजचा अग्रलेख: भागवतांचा सुविचार संग्रह
देशाच्या सर्वच प्रमुख घटनात्मक पदांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक विराजमान असण्याच्या काळात सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांनी संघाला कोणताही एक राजकीय पक्ष प्रिय किंवा अप्रिय असण्याचे कारण नाही, असे सांगून नव्या चर्चेला तोंड फोडले आहे. काँग्रेसने राम मंदिर उभारणीला मदत केली असती, तर संघाने काँग्रेसलाही मदत केली असती, असे ते म्हणाले आहेत. संघाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशाच्या विविध भागांत सरसंघचालक व्याख्याने देत आहेत, प्रश्नोत्तरे करीत आहेत. त्यापैकी एक समारंभ रविवारी कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये झाला. तिथे बोलताना संघाच्या राजकीय भूमिकेसोबत त्यांनी संघाचे स्वरूप, संघावर होणाऱ्या मुस्लीम-ख्रिश्चनद्वेषाच्या आरोपांबद्दलही मते मांडली. धार्मिक विद्वेषाचे देशातील सध्याचे वातावरण पाहता संघावर बंदी घालण्याची भाषा ज्या कर्नाटकमधून झाली तिथेच सरसंघचालक बोलल्याने या विधानांना वेगळे महत्त्व आहे.
कर्नाटकमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार असल्यामुळे राम मंदिर उभारणीच्या अनुषंगाने डाॅ. भागवत यांच्या राजकीय दृष्टिकोनालाही वेगळा संदर्भ आहे. याशिवाय त्यांनी स्पष्ट केले की, पुढच्या दोन दशकांत संघकार्याची दिशा काय असेल, तर हिंदू समाज एकजूट, संघटित, गुणसंपन्न करणे आणि त्या माध्यमातून समृद्ध व सशक्त भारत उभा करणे. अल्पसंख्याक समाजापर्यंत पोहोचण्यासाठी मुस्लीम धर्मीयांसाठी काही शैक्षणिक उपक्रम राबविणार का, या प्रश्नावर सरसंघचालक म्हणाले, ‘असे उपक्रम राबविणे हे काही संघाचे काम नाही. संघ केवळ शाखा चालवितो आणि त्या शाखांमध्ये माणूस घडवितो. शाखेत घडलेले असे स्वयंसेवक नंतर बाहेर जे काही करतात त्याच्याशी संघाचा संबंध असतोही आणि नसतोही. म्हणजे, चांगले काम केले तर संघ मदत करतो. परंतु, स्वयंसेवकांच्या सगळ्याच कामांची जबाबदारी संघ घेत नाही. आम्ही व्यक्तींसाठी काहीच करीत नाही, तर त्यांनी स्वत:साठी काहीतरी करावे, यासाठी प्रयत्न करतो. कारण, खुद्द परमेश्वरदेखील जे स्वत:साठी काही करतात, प्रयत्न करतात त्यांनाच मदत करतो! मुळात हिंदूंमधील ब्राह्मण किंवा अन्य जातीचा माणूस म्हणून अथवा मुस्लीम, ख्रिश्चन अशा अन्य धर्माच्या लोकांना संघ स्वीकारत नाही. ती वेगळी ओळख दूर ठेवून भारतमातेचे सुपुत्र म्हणून ते संघात आले, तर त्यांचे स्वागत केले जाते.’- थोडक्यात, धार्मिक, सामाजिक व राजकीय सुविचारांचा संग्रह होईल, इतकी सारी विधाने सरसंघचालकांनी केली आहेत. साहजिकच संघ नेमका काय आहे, हे शोधणाऱ्यांना या विधानांबद्दल उत्सुकता वाटावी. तथापि, या साऱ्याच्या मदतीने या संघटनेची व्याख्या करता येईलच असे काही नाही. कारण, ते सारे सुविचार आहेत. ही संदिग्ध विधाने संभ्रम वाढविणारी, काही प्रश्न पुन्हा उपस्थित करणारी आहेत.
संघाची अधिकृतपणे नोंदणी नाही, कारण संघ १९२५ साली म्हणजे ब्रिटिशांच्या राजवटीत स्थापन झाला हे कारण सरसंघचालकांनी दिले आहे. हाच नियम अन्य संघटनांनाही लावता येईल. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी संघावर बंदी घातली. भारतीय राज्यघटनेच्या चाैकटीतील संघटनेची योग्य घटना आणि राष्ट्रध्वजासह विविध राष्ट्रीय प्रतिकांचा सन्मान या अटींवर ती उठविण्यात आली. मुस्लीमद्वेष हा संघावरील चिरंतन आरोप आहे. त्यासाठी संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींच्या ‘बंच ऑफ थाॅट्स’ या मार्गदर्शक ग्रंथाकडे बोट दाखविले जाते. हा ग्रंथ गुरुजींच्या भाषणांचे संकलन आहे आणि त्यातील सगळ्याच गोष्टी वर्तमानाला लागू होत नाहीत, असे स्वत: डाॅ. भागवत काही वर्षांपूर्वी म्हणाले हे खरे. परंतु, तो पूर्ण ग्रंथ नाकारण्यात आलेला नाही. हिंदू समाजाची एकी व बळकटीकरण हा संघाचा हेतू मुस्लीमद्वेषाइतकाच चिरंतन आहे. तथापि, हिंदूंच्या एकजुटीचा अर्थ गैरहिंदूंचा द्वेष होत नाही. तरीदेखील धर्म व जातींची वैयक्तिक ओळख दूर ठेवून भारतमातेचा सुपुत्र म्हणून संघात येण्याची सवलत सरसंघचालकांनी देण्याचे स्वागत करायला हवे. तसे झाले, तर संघ अधिक व्यापक होईल हे नक्की. तथापि, एखादी अल्पसंख्याक व्यक्ती भारतमातेचा खरा सुपुत्र किंवा देशभक्त आहे की नाही हे कोण ठरविणार, हा प्रश्न आहेच. धर्माच्या आधारावर केवळ देशभक्तीची प्रमाणपत्रेच नव्हे, तर नागरिकता देण्याच्या काळात हा प्रश्न अधिक ठळक बनतो.