शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

जगावे की मरावे? मानवी अस्तित्वच पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 09:46 IST

देशाची अर्थव्यवस्था आजही कृषिआधारित आहे आणि देशातील शेतीवर, निसर्गावर अवलंबून आहे.

मानवी प्रगती आणि समृद्धी याला केवळ तंत्रज्ञानाचा विकास कारणीभूत नसतो. पर्यावरण आणि या पर्यावरणाला माणूस कशा पद्धतीने जपतो, पर्यावरणाची समृद्धी कशा पद्धतीने करतो, यावर खरा विकास अवलंबून असतो. मानवी समुदायाची गोष्ट पाहिली म्हणजे याची खात्रीच पटते! विकासाची व्याख्या बदलत असताना, आज मानवी हस्तक्षेपाने निसर्गाची जी वाताहत सुरू आहे, त्यावरून, येणारा काळ सर्वांसाठी संकटाचा असणार आहे! अवकाळी पाऊस, वाढणारे उष्ण दिवस, बदलते तापमान याचीच तर साक्ष देत आहेत. यंदाच्या उन्हाळ्यातही सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. देशाची अर्थव्यवस्था आजही कृषिआधारित आहे आणि देशातील शेतीवर, निसर्गावर अवलंबून आहे. बदलत्या हवामानाचा मोठा फटका शेतीला बसत आहे. कमी किंवा जास्त पाऊस, उष्णतेचे जास्त दिवस यासाठी जे घटक कारणीभूत ठरतात, त्यामध्ये एल-निनो आणि ला-निना हे आहेत. भारतातील सर्व शेतकऱ्यांना खरे तर याची जाणीव असायला हवी. ‘एल निनो’ म्हणजे स्पॅनिश भाषेत लहान मुलगा.

दक्षिण अमेरिकेतील एका मच्छीमाराने समुद्राच्या वरच्या थराचे तापमान कमी-जास्त होत असल्याचे प्रथम पाहिले. ही घटना सोळाव्या शतकामधील. डिसेंबरमध्ये ‘एल-निनो’चा प्रभाव सर्वाधिक असतो. ‘ला निना’ म्हणजे स्पॅनिश भाषेत लहान मुलगी. ‘एल-निनो’च्या अगदी उलट परिणाम ‘ला-निना’मुळे होतो. पाऊस जास्त पडण्यास ‘ला-निना’ कारण ठरतो. प्रशांत महासागरातील पाण्याचे तापमान कमी किंवा जास्त झाले, तर वाऱ्याची दिशा बदलते. एरव्ही आशिया खंडाकडे वाहणारे वारे दक्षिण अमेरिकेकडे वाहतात आणि हवामानाचा पूर्ण पॅटर्नच बदलतो. याचा परिणाम आपल्याकडे भारतात पाऊस कमी होण्यावर होतो. याउलट ‘ला-निना’मध्ये अधिकाधिक वारे आशिया खंडाकडे वाहतात. एल-निनोच्या टप्प्यानंतर सर्वसाधारणपणे ‘एनसो’चा (एल-निनो सदर्न ऑसिलेशन) टप्पा येतो आणि बहुतांश वेळा एल-निनोनंतर ला-निनाची स्थिती येते. या तांत्रिक बाबी सांगण्याचे कारण म्हणजे देशात सध्या एल-निनो उतरणीच्या मार्गावर आहे आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला याचा प्रभाव संपण्याची शक्यता आहे.

अर्थात यामुळे दोन गोष्टी घडत आहेत. एक म्हणजे उन्हाळ्यात एल-निनोचा प्रभाव अद्याप असल्यामुळे उष्णतेच्या लाटांची संख्या वाढणार आहे आणि दुसरी म्हणजे जूनपर्यंत एल-निनोचा प्रभाव कमी होणार असल्याने येणारा पावसाळा सुखद असणार आहे. पावसाच्या दृष्टीने आणखी अचूक अंदाज एप्रिल महिन्याच्या मध्यातच समजेल. त्यामुळे तूर्तास उन्हाळा सर्वांसाठी कठीण राहणार आहे, हे अधिक महत्त्वाचे. उन्हाळ्यात सर्वसामान्यांनी काय काळजी घ्यावी याबाबतचे मार्गदर्शन तज्ज्ञ मंडळी करीत असतात. पण, हा उन्हाळा आणखी एका कारणासाठी वेगळा आहे. त्याचे कारण म्हणजे पुढील दोन महिने देशभरात होणार असलेल्या मध्यावधी निवडणुका आणि त्यासाठीचा जोरदार प्रचार. उमेदवारांसोबतच कार्यकर्तेही या काळात घरोघरी प्रचार करणार. हवामानाच्या अंदाजानुसार मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान राहणार आहे. रात्रीचेही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. प्रचाराच्या रणधुमाळीत हवामानाच्या या अंदाजाची दखल किती जणांनी घेतली असेल? एखाद्या सभेच्या ठिकाणी हवामानाचा हा अंदाज पाहून कुठला उमेदवार लोकांच्या बसण्याची आणि आवश्यक त्या इतर सुविधांची सोय करील? एखादा अपघात झाल्यानंतरच जाग येऊ नये, ही अपेक्षा.

प्रचाराबरोबरच मतदानही ऐन उन्हाळ्यात होत आहे. त्यामुळे मतदान केंद्रांसह सर्व ठिकाणी उन्हाळ्याची दखल घेऊन आवश्यक त्या सुविधा जागोजागी उभारण्याची गरज आहे. आपल्या दैनंदिन आयुष्याशी निगडित इतक्या मोठ्या घटकाबद्दल अनेकांना फारशी माहिती नसते, त्याबद्दल ते जागरूकही नसतात... पर्यावरण, ई-कचऱ्याचे संकलन, तापमानबदल, बेकायदा वृक्षतोड, टेकड्यांची होणारी कत्तल, पर्यावरणाचा विनाश करून होणाऱ्या विकासाच्या व्याख्या यांसारखे मुद्देही निवडणुकीत दिसत नाहीत. लोकशाहीत लोक जेवढे जागरूक, तेवढी तिथली प्रशासन व्यवस्था सुनियोजित आणि कार्यक्षम. एल-निनो आणि ला-निनाबाबत जागरूक राहून त्यानुसार शेतकरी पीक घेत असतील, अशी स्थिती नाही. हवामानाबरोबरच पर्यावरणाच्या बाबतीत अधिक साक्षर होणे अपरिहार्य आहे. मानवी अस्तित्वच पणाला लागले आहे. जगावे की मरावे, असा हा सवाल आहे. पण, निवडणुकीच्या रणधुमाळीत रमलेल्यांना त्याचे भान तरी आहे का?

टॅग्स :Temperatureतापमान