बचतीचा कंटाळा
By Admin | Updated: September 22, 2015 21:46 IST2015-09-22T21:46:38+5:302015-09-22T21:46:38+5:30
राज्यभरात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागात पाण्याची टंचाई प्रकर्षाने जाणवू लागली होती. पाण्याअभावी उन्हात करपणारी पिकं बघत हताश झालेला ग्रामीण भागातील शेतकरी आणि 'एक दिवसाआड पाणी

बचतीचा कंटाळा
राज्यभरात पावसाने ओढ दिल्याने अनेक भागात पाण्याची टंचाई प्रकर्षाने जाणवू लागली होती. पाण्याअभावी उन्हात करपणारी पिकं बघत हताश झालेला ग्रामीण भागातील शेतकरी आणि 'एक दिवसाआड पाणी' यासारख्या घोषणेमुळे चिंतेने ग्रासलेला शहरी नागरिक या दोघांच्याही डोळ््यांत पावसाच्या अभावाने 'पाणी' येऊ लागले. मग पाण्याचे, पावसाचे महत्त्व किती, ते साठवणे, जपून वापरणे किती गरजेचे याच्या चर्चांचाच 'पाऊस' सुरू झाला. मग रेनवॉटर हार्वेस्टिंगची गरज, जलसंधारणाची कामे, पाणी अडवा पाणी जिरवाची आवश्यकता, पाण्याच्या बेसुमार वापरावर निर्बंध, पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी कारवाई हे सारे आवश्यक सोपस्कारही सुरू झाले. उशीरा का होईना सध्या सुरू असलेल्या पावसाने राज्याला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. ग्रामीण भागात बराचसा हंगाम वाया गेला, हातची पिकं गेली तरी आहे त्यात चांगलं करू अशी उमेद मनाशी बाळगून बळीराजा पुन्हा एकदा शेतात राबताना दिसू लागला आहे. पावसाचा असाच जोर आणखी काही दिवस कायम राहिला तर हे पाण्याचे संकट टळेलही. पण आपण परत पुढे काय करणार? पाण्याच्या बाबतीत खरोखर संवेदनशील होऊन आपण पाण्याचे जतन करणार का हा खरा प्रश्न आहे. कारण 'नेमेचि येतो पावसाळा' हे व्रत निसर्गाने काहीही झाले तरी न चुकता पाळावे अशी आपली साऱ्यांचीच अपेक्षा असते. परंतु पाणीसंचयाचा विषय निघाला की मात्र 'नेमेचि येतो बचतीचा कंटाळा' असे म्हणत हात झटकून मोकळे होतो आणि पुढचे वर्षभर पाण्याची बेसुमार उधळपट्टी करायला मोकळे होतो. मग पुन्हा पाण्याचा वापर जपून करायला हवा ही जाणीव प्रकर्षाने होते, पुन्हा पावसाने ओढ दिली की मगच. गेल्या वर्षी देखील अशीच पाणीटंचाई निर्माण झाली होती, धरणसाठ्यातील पाणी कमी झाले होते, एक दिवसाआड पाण्याची घोषणाही झाली होती. वर्षभराच्या पाणी नियोजनाच्या व संपूर्ण वर्षभर पाणी जपून वापरण्याच्या चर्चाही झाल्या. तेव्हाही निसर्ग मदतीला धावून आला. एकदा का पाऊस आला की पुन्हा साऱ्या तथाकथित नियोजनावर पुन्हा एकदा 'पाणी फिरते' कारण पुढच्या वर्षभराची चिंता मिटलेली असते. निसर्गाने गेल्या वर्षी आपल्याला सावरले. कदाचित याही वर्षी सावरेल. पण म्हणून आपण किती काळ पुन्हा तसेच निष्काळजी राहणार आहोत? पाणीबचत ही टंचाई सुरू झाल्यानंतर सुरू करण्याची बाब नसून ती सातत्यपूर्ण रितीने करण्याची गोष्ट आहे, ही बाब प्रशासनापासून व्यक्तिगत स्तरापर्यत रुजवणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणीबचत व पाण्याचा संचय हा स्वभावधर्म बनायला हवा. तेव्हा यंदाच्या वर्षी जरी पाणीटंचाई दूर झाली तरीही त्यानंतर पुन्हा नेहमीसारखे निश्चिंत न होता निसर्गाची अनमोल देण असलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा संचय करण्याचा निश्चय साऱ्यांनी मिळून करायला हवा.