शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

भाजपसाठी आत्मचिंतनाची वेळ

By रवी टाले | Published: January 09, 2020 2:54 PM

अवघ्या काही दिवसांपूर्वी अजेय भासत असलेल्या पक्षावर ही वेळ का आली, यासंदर्भात आत्मचिंतन करण्याची वेळ ताज्या निवडणूक निकालांनी त्या पक्षाच्या नेतृत्वावर नक्कीच आणली आहे.

महाराष्ट्रातील सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल बुधवारी जाहीर झाले. त्यानुसार धुळे वगळता इतर पाच जिल्हा परिषदांमध्ये सत्तेने भारतीय जनता पक्षाला हुलकावणी दिली आहे. धुळ्यालगतच्या नंदुरबार जिल्हा परिषदेतही भाजपने चांगली लढत दिली; मात्र राज्यात नव्याने साकारलेल्या राजकीय समीकरणामुळे तिथे भाजपला सत्ता मिळणे अशक्यप्राय दिसते. अकोला व वाशिम या दोन जिल्हा परिषदांमध्ये भाजपची कधीच सत्ता नव्हती. त्यामुळे त्या दोन्ही जिल्हा परिषदांमधील पराभवाचे भाजप नेतृत्वास फार दु:ख होणारही नाही; मात्र नागपूर आणि पालघर जिल्हा परिषदेतील सत्ता गमवावी लागणे त्या पक्षासाठी धक्कादायक आहे. विशेषत: नागपूर जिल्हा परिषदेतील पराभव तर त्या पक्षाच्या जिव्हारी लागणाराच आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा आणि भाजपची मातृ संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूर जिल्ह्यातील पराभव पचनी पडण्यास भाजपला अनेक दिवस लागतील! गत काही दिवसांपासून भाजपला राज्यात जे एकामागोमाग एक धक्के बसत आहेत ते बघू जाता, अवघ्या आठ महिन्यांपूर्वी हा पक्ष अजेय भासत होता, असे एखाद्या नवागतास सांगितल्यास त्याचा विश्वासच बसणार नाही. मे महिन्यात पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने शिवसेनेच्या साथीने राज्यातील ४८ पैकी तब्बल ४१ जागा जिंकल्या होत्या. एकट्या भाजपने २५ जागा लढवून २३ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर आॅक्टोबरमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने एकूण २८८ पैकी शिवसेनेच्या साथीने १६१, तर स्वबळावर १०५ जागा जिंकल्या होत्या. निवडणूकपूर्व युती म्हणून स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही, मुख्यमंत्री पद व सत्तेच्या वाटणीवरून भाजप आणि शिवसेनेचे बिनसले आणि राज्याची सत्ता भाजपच्या हातातून निसटली. त्यानंतर भाजपला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. घर फिरले की घराचे वासेही फिरतात, अशी म्हण आहे. आज भाजपला त्याचाच प्रत्यय येत आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वी हा पक्ष राज्यात अजेय भासत होता. इतर पक्षांमधील नेत्यांची भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी एकच झुंबड उडाली होती. पक्षाची सूत्रे हाती असलेल्या मंडळीने पक्षांतर्गत विरोधकांची पुरती कोंडी करून टाकली होती आणि तरीही त्यांची हूं का चूं करण्याची प्राज्ञा होत नव्हती; मात्र राज्याची सत्ता हातून निसटली आणि भाजपचे नशिबच फिरले! राजकीय विरोधकांना तर स्फुरण चढलेच, पण कालपर्यंत जराही आवाज करण्याची हिंमत होत नसलेल्या पक्षांतर्गत विरोधकांनाही कंठ फुटला. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत केलेली आघाडी अनैतिक असून, ती सर्वसामान्य जनतेला अजिबात पटलेली नाही आणि त्यामुळे निवडणुकीत मतदार त्या तिन्ही पक्षांना धडा शिकवतील, असा विश्वास राज्यातील भाजप नेतृत्वाला वाटत होता. पाच जिल्हा परिषदांची निवडणूक ही भाजप नेतृत्वाच्या त्या विश्वासाची ‘लिटमस टेस्ट’ होती. जिल्हा परिषद निवडणुकी स्थानिक मुद्यांवर लढवल्या जातात, त्या निवडणुकांमध्ये स्थानिक समीकरणे वरचढ ठरतात, जिल्हा परिषदा हा कधीच भाजपचा गड नव्हता, इत्यादी कारणे आता पराभवासाठी समोर केली जातील. ती सगळी एकदाची मान्य केली तरी, अनैतिक युतीसाठी मतदार शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला धडा शिकवतील, ही भाजपची अपेक्षा किमान या निवडणुकीत तरी पूर्ण होऊ शकली नाही, ही वस्तुस्थिती शिल्लक उरतेच! विशेषत: भाजपचा गड असलेल्या नागपूर जिल्ह्यातील पराभव तर त्या पक्षासाठी फारच क्लेशदायक म्हणावा लागेल. ग्रामीण भागात प्रयत्नपूर्वक आपले वर्चस्व प्रस्थापित केलेल्या नितीन गडकरी यांच्या मूळ गावातच झालेला भाजप उमेदवाराचा पराभव तर खूपच धक्कादायक आहे. निवडणुकांना सामोरे गेलेल्या सहा जिल्हा परिषदांमध्ये शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने महाविकास आघाडी म्हणून निवडणुका लढवल्या नाहीत. काही ठिकाणी युती, तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात, अशा रितीने हे तिन्ही पक्ष निवडणुकांना सामोरे गेले. तरीदेखील त्यांना लक्षणीय यश मिळाले. ज्या जिल्हा परिषदांमध्ये कोणत्याही एका पक्षास बहुमत मिळाले नाही, तिथे आता हे तीन पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील, हे निश्चित आहे. भाजपसाठी ही स्थिती चिंताजनक आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वी अजेय भासत असलेल्या पक्षावर ही वेळ का आली, यासंदर्भात आत्मचिंतन करण्याची वेळ ताज्या निवडणूक निकालांनी त्या पक्षाच्या नेतृत्वावर नक्कीच आणली आहे. अर्थात अजूनही भाजप नेतृत्वास आत्मचिंतनाची गरज वाटत नाही. तसे नसते तर आकड्यांचा खेळ करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांमध्ये आमचाच पक्ष सर्वात मोठा कसा, हे सांगण्याच्या फंदात ते पडले नसते. विधानसभेतही भाजप सर्वात मोठा पक्ष आहे आणि तरीही विरोधी बाकांवर बसला आहे! अर्थात सत्ता महत्त्वाची न वाटता केवळ सर्वात मोठा पक्ष हे बिरुदच भाजप नेतृत्वास महत्त्वाचे वाटत असेल तर मग विषयच संपला!

- रवी टाले    ravi.tale@lokmat.com  

टॅग्स :ZP Electionजिल्हा परिषदAkolaअकोलाBJPभाजपा