गुलशनाबादेतील ‘कंटक’वन
By Admin | Updated: October 15, 2016 00:04 IST2016-10-15T00:04:57+5:302016-10-15T00:04:57+5:30
महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मूक मोर्चांना जसे कोपर्डी येथील अत्यंत दुर्दैवी घटना हे तात्कालीक निमित्त ठरले तसेच नाशिक जिल्ह्यातील अशांततेलाही तळेगाव अंजनेरी

गुलशनाबादेतील ‘कंटक’वन
महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या मूक मोर्चांना जसे कोपर्डी येथील अत्यंत दुर्दैवी घटना हे तात्कालीक निमित्त ठरले तसेच नाशिक जिल्ह्यातील अशांततेलाही तळेगाव अंजनेरी येथील तशाच प्रकारच्या घृणास्पद घटनेचे निमित्त घडले. परंतु दुर्दैवाने ही तुलना येथेच संपते, कारण तद्नंतर नाशकात जे घडले, त्याच्याशी तळेगाव प्रकरणाचाही संबंध उरला नाही. संबंध होता तो केवळ टोळीबाजांचा व समाजकंटकांचा.
नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील तळेगावमधील अवघ्या पाच वर्षीय अजाण बालिकेवर जो शारीरिक अत्याचार झाला त्यातून लोकभावना संतप्त होणे कुणीही समजून घेऊ शकते आणि म्हणूनच गेल्या शनिवारी सायंकाळी घडलेल्या या दुर्दैवी प्रकारानंतर रविवारीही त्या घटनेची संपूर्ण शहरात गडद छाया पसरून राहाणे स्वाभाविक होते. पण त्यानंतर सलग तीन दिवस नाशिक शहर व जिल्ह्याच्याही काही भागात जे काही सुरू झाले आणि होत राहिले त्याचा तळेगावच्या घटनेशी दुरान्वयानेही संबंध नव्हता. या अशांततेशी व जाणीवपूर्वक निर्माण केल्या गेलेल्या भीतीच्या वातावरणाशी संबंध असेलच तर तो शहरातील विविध समाजकंटकांच्या टोळ्यांमधील संघर्ष आणि वर्चस्ववाद यांचा. शिवाय येत्या काही दिवसांत होऊ घातलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीशीही या सर्व प्रकाराचा संबंध जोडता येऊ शकणारा आहे.
सलग चार ते पाच दिवस नाशिक शहर व काही प्रमाणात जिल्ह्याला ज्यांनी वेठीस धरले ते कोणत्याही विशिष्ट पक्षाचे, संघटनेचे, समाजाचे, पंथाचे, धर्माचे वा वर्गाचे लोक नव्हते. साऱ्यांचाच त्यात थोड्याफार प्रमाणात सहभाग होता. पण, त्यातील गंभीर बाब म्हणजे रस्त्यावर उतरणारी आणि जनसामान्यांना भयभीत करणारी ही सारी मंडळी निर्नायकी होती. त्यामुळे त्यांच्यावर कोणाचीच मात्रा चालत नव्हती. ही अशी निर्नायकीच अनिर्बंधतेला निमंत्रण देणारी असते. त्यातून विवेक हरवल्याखेरीज राहात नाही व असे जेव्हा होते, तेव्हा सर्वार्थाने नुकसानच घडून येते, जे नाशकात झाले.
कोणे एकेकाळी नाशिकला जातीय दंगलींची एक पार्श्वभूमी होती. परंतु सुदैवाने गेल्या दोन अडीच दशकांपासून एक सुंदर शांत शहर असाच नावलौकिक नाशिकने प्राप्त केला. या लौकिकास बट्टा लावण्याचे काम करणाऱ्या समाजकंटकांच्या विभिन्न टोळ्या अलीकडच्या काळात जोमाने कार्य करू लागल्या होत्या. यातील काही टोळीबाजांना माजी मंत्री छगन भुजबळ यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष आधार लाभल्याचे आजही बोलले जाते. ते सत्यही असेल पण पूर्ण सत्य नव्हे. कारण भुजबळच नव्हे तर साधे नगरसेवकही आता अशा टोळ्यांचे तारणहार बनू लागले आहेत व त्यात त्यांना शरम वाटेनाशी झाली आहे. अर्थात अशा प्रवृत्तींचा जन्मच मुळात राजकीय व्यवस्थेत म्हणजे राजकीय पक्षात होत असतो आणि त्याला कोणताही पक्ष अपवाद राहिलेला नाशकात दिसून येत नाही व तीच खरी चिंतेची बाब आहे.
लक्षणीय म्हणजे गुंडापुंडांना आश्रय देणारे पक्ष म्हणून अन्य सर्वच राजकीय पक्षांना एका पारड्यात टाकून स्वत:च्या साधनशुचितेचा टेंभा मिरवणाऱ्या भारतीय जनता पार्टीचेही या संदर्भातील सोवळे सुटून पडले. महापालिकेतील दोन जागांसाठीच्या गेल्या पोटनिवडणुकीप्रसंगी पवन पवार नामक एका अत्यंत कुख्यात गुंडाला या पक्षाने आपल्या कडेवर घेतले. पण यच्चयावत सर्व माध्यमांनी त्या संदर्भात टीका करूनही त्याला कडेवरून उतरविले गेले नाही. कारण तो या पक्षाने उघड्या डोळ्यांनी घेतलेला निर्णय होता. ज्याला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद असल्याचे उघडपणे बोलले गेले. याच पवारला नाशकातील अशांततेप्रकरणी अटक केली गेल्याचे पाहाता भाजपाच्या श्रीमुखात बसून गेली आहे. तेव्हा राजकीय व्यवस्थांच्या टोळीभरण-पोषणाचा जो मुद्दा या निमित्ताने पुढे येऊन गेला आहे, तो अधिक महत्त्वाचा ठरावा.
- किरण अग्रवाल