तात्त्विक की दांभिक
By Admin | Updated: August 4, 2015 00:08 IST2015-08-04T00:08:56+5:302015-08-04T00:08:56+5:30
अगदी अखेरच्या क्षणी याकूब मेमन यांस फासावर लटकविण्याचा निर्णय जाहीर करुन सर्वोच्च न्यायालयाने न्यायिक तत्त्वच्युती केल्याचा ठपका ठेऊन

तात्त्विक की दांभिक
अगदी अखेरच्या क्षणी याकूब मेमन यांस फासावर लटकविण्याचा निर्णय जाहीर करुन सर्वोच्च न्यायालयाने न्यायिक तत्त्वच्युती केल्याचा ठपका ठेऊन ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या संशोधन विभागाच्या उप निबंधकपदाचा राजीनामा दिला, त्या डॉ.अनुप सुरेन्द्रनाथ यांची या संदर्भातली भूमिका खरोखरीची तात्त्विक की दांभिक असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सेवेत असताना त्यांनी न्यायालयाच्या निर्णयावरच अत्यंत जहाल आणि टोकाची प्रतिक्रिया व्यक्त केल्याने त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या विचारात हे न्यायालय असताना, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देतानाचे जे पत्र सादर केले आहे, त्या पत्रात मात्र त्यांनी कुठेही आपल्या मनातील तथाकथित रास्त भावनांना वाट मोकळी करुन दिलेली नाही. डॉ.अनुप मूलत: दिल्ली विधी विश्वविद्यालयातले एक प्रपाठक. वर्षभरापूर्वी ते प्रतिनियुक्तीवर सर्वोच्च न्यायालयाच्या संशोधन विभागात दाखल झाले. हा विभाग देहदंडाच्या शिक्षेबाबतच्या संशोधनासाठी अस्तित्वात आलेला. याकूब मेमन यास फार आधीच सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेसंदर्भात अगदी अखेरच्या क्षणापर्यंत कायदेशीर लढाई लढली गेली. तरीही त्यास झालेली शिक्षा आणि या शिक्षेची अंमलबजावणी हा चर्चेचा विषय ठरला व त्यावर यापुढेही चर्चा होत राहील. पण प्रतिनियुक्तीवर का होईना, सर्वोच्च न्यायालयाच्या सेवेत असलेल्या एका व्यक्तीला अशा जाहीर चर्चेत सहभागी होण्याची आणि सहभागी होऊन न्यायालयीन प्रक्रिया व तिच्या परिणामी जाहीर झालेला निवाडा यावर शाब्दिक तसेच कृतीशील प्रतिक्रिया व्यक्त करण्याचा अधिकार असू शकतो का, असा प्रश्न निर्माण झाला. एरवी या प्रश्नाचे उत्तर नाही, असेच येते. पण जे सर्वोच्च न्यायालय नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणाची वारंवार ग्वाही देत असते, तेच न्यायालय डॉ.अनुप यांच्याविरुद्ध कारवाई सुरु करुन त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करु शकते का, असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे. याच याकूब प्रकरणी देशातील अनेक मान्यवरांनी न्यायालयाच्या संभाव्य बेअदबीची तमा न बाळगता, आपली मते रोखठोक शब्दात व्यक्त केली आहेत. डॉ.सुरेन्द्रनाथ हेही त्यातीलच एक म्हणायचे. पण त्यांनी एक चलाखी केली. न्यायालयीन निर्णय आणि प्रक्रिया याविषयीच्या त्यांच्या मनातील अत्यंत जळकट भावना त्यांनी फेसबुक आणि ट्विटरसारख्या माध्यमातून व्यक्त केल्या. वृत्तपत्रांचे मथळे पदरात पाडून घेतले. पदाचा राजीनामाही दिला, नाही असे नाही. पण तो देताना सोबत जे पत्र जोडले, त्यात मात्र वेगळाच मजकूर भरला. वर्षभराच्या सर्वोच्च न्यायालयीन सेवेत आपणास खूप काही शिकायला मिळाले वगैरेसारखा मजकूर त्यांनी त्यात लिहिला. त्यामुळेच डॉ.सुरेन्द्रनाथ खऱ्या अर्थाने तात्त्विक की दांभिक असा प्रश्न निर्माण होणे स्वाभाविक आहे.