...असे ट्रम्प जगाला हवेत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 14:06 IST2025-10-14T14:05:19+5:302025-10-14T14:06:38+5:30
...तूर्त महत्त्वाचे हे की, त्यांना विक्षिप्त म्हणा, लहरी म्हणा की आणखी काही; शांततेसाठी जगाला सध्या डोनाल्ड ट्रम्प हवे आहेत.

...असे ट्रम्प जगाला हवेत!
शांततेचे नोबेल हुकले म्हणून काय झाले, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जगात युद्धे थांबविण्याचे प्रयत्न सोडून देण्याच्या मन:स्थितीत नाहीत. विक्रम-वेताळाच्या गोष्टीत डोक्याची शंभर शकले झाल्यानंतरही विक्रमादित्य आपला हट्ट सोडत नाही, तसे एकेक देश शेजाऱ्याशी युद्ध पुकारायचा थांबत नाही आणि असे युद्ध सुरू झाले की, जगाचे शांततादूत बनण्यासाठी ट्रम्प वेताळासारखे युद्धाच्या मानगुटीवर बसतातच. गेली दोन वर्षे भयंकर नरसंहार अनुभवलेल्या इस्रायल-हमास यांच्या युद्धबंदी प्रस्तावाची अंमलबजावणी स्वत: हजर राहून करून घेण्यासाठी ते सोमवारी पश्चिम आशियात पोहोचले. तेल अवीवला जाताना विमानात त्यांनी केवळ टॅरिफचे हत्यार वापरून आपण भारत-पाकिस्तान संघर्षासह जगातील आठ युद्धे थांबविल्याचा पुनरुच्चार केला आणि पाकिस्तान-अफगाणिस्तानातील ताज्या चकमकी हे आपले पुढचे लक्ष्य असेल, हेदेखील आवर्जून सांगितले. तुम्ही एकमेकांच्या विरोधात कितीही बेडक्या फुगवल्या, शड्डू ठाेकले, तुमच्याकडे अण्वस्त्रे असोत की आणखी काही, एकदा शंभर, दीडशे किंवा दोनशे टक्के टॅरिफ लावला की युद्ध थांबविण्याचा आपला सल्ला ऐकावाच लागतो, अशा शब्दांत त्यांनी भारत-पाकिस्तानसह बहुतेक देशांची हतबलता सांगून टाकली आहे. शांतता एकतर जिंकून घ्यायची असते किंवा विकत घ्यायची असते, या वास्तवाचीदेखील त्यांनी जगाला जाणीव करून दिली आहे.
जगाची लष्करी व आर्थिक महाशक्ती असलेल्या अमेरिकेला दोन्ही पद्धतीने शांतता प्रस्थापित करणे शक्य आहे. तथापि, ट्रम्प स्वत: यशस्वी व्यावसायिक किंवा व्यापारी असल्याने ते अद्याप लष्करी ताकदीकडे वळलेले नाहीत. आर्थिक नाड्या आवळल्या की भले भले शरण येतात, आपण म्हणू तसे ऐकतात, हे त्यांनी ओळखले आहे. अर्थात, त्यांनी कितीही दावा केला, दम दिला तरी रशिया-युक्रेन युद्ध अद्याप थांबलेले नाही. ट्रम्प यांच्या दमबाजीला किंमत द्यायला रशिया तयार नाही. असो. इस्रायल व हमास यांच्यातील गाझा पट्टीतील युद्ध थांबविण्याचे श्रेय मात्र ट्रम्प यांना द्यायला हवे. हमासच्या विरोधात इस्रायली जनतेच्या भावना तीव्र आहेत आणि गाझा पट्टीतील नरसंहारानंतर इस्रायलला माफ करण्यास हमासची सशस्त्र आघाडी तयार नाही, अशा पेचात ट्रम्प यांनी ही त्यांच्या अटी-शर्तीवर ही युद्धबंदी घडवून आणली हे महत्त्वाचे. दोन वर्षांपूर्वी, ७ ऑक्टोबर २०२३ ला हमासने इस्रायलवर हल्ला चढविला. जवळपास बाराशे इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला. २५१ जणांना जिवंत ताब्यात घेऊन ओलीस ठेवण्यात आले. त्यापैकी अनेक जण त्यावेळीच मारले गेले. इस्रायलने या हल्ल्याचा भयंकर बदला घेताना गाझा पट्टी बेचिराख करून टाकली. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार ६७ हजार पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झाला. हजारो जखमी झाले. हजारो बेघर झाले. महिला, मुले, वृद्धांचे अतोनात हाल झाले. उपासमारीने जीव गेलेल्यांची तर मोजदाद नाही. या नरसंहारातील बळींची संख्या सव्वा लाखांहून अधिक असल्याचे मानले जाते.
या गुन्ह्यासाठी इस्रायलविरोधात जगभर संताप व्यक्त झाला तरी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू कोणाचे ऐकायला तयार नव्हते. कारण, अमेरिका त्यांच्या पाठीशी होती. नोबेल शांतता पुरस्काराच्या उद्देशाने का होईना ट्रम्प यांनी शांततेचा आग्रह धरला. नेतन्याहू यांना अमेरिकेत बोलावून युद्धबंदीसाठी तंबी दिली. हमासला योग्य तो इशारा दिला. संघर्षविरामाची प्रक्रिया सुरू झाली. ट्रम्प यांच्या उपस्थितीत सोमवारी हमासने दोन जथ्यांमध्ये वीस इस्रायली ओलिसांना रेडक्राॅसच्या ताब्यात दिले. २८ ओलिसांचे मृतदेह हमासच्या ताब्यात आहेत. ७२ तासांत ते सोपविले गेले नाहीत तर आंतरराष्ट्रीय कृतीगट हस्तक्षेप करील. अन्नपाण्याविना तडफडून मरणाऱ्या पॅलेस्टिनी नागरिकांसाठी अमेरिकेच्या पुढाकाराने आता मदत पोहोचवली जात आहे.
यानंतर इस्रायलच्या ताब्यात असलेल्या पॅलेस्टिनी युद्धकैद्यांची सुटका केली जाईल. इस्रायली सैन्य टप्प्याटप्प्याने गाझा पट्टीतून माघार घेईल. हमासचा सहभाग नसलेले हंगामी सरकार गाझा पट्टीत स्थापन केले जाईल आणि युद्धाच्या जखमा भरून काढण्याचा प्रयत्न होईल. हे खरेच होईल का, ट्रम्प यांना जो रक्तपाताचा, युद्धांचा तिटकारा आला आहे तो असाच कायम राहील का, या प्रश्नांची उत्तरे मिळायला थोडा वेळ जाईल. तूर्त महत्त्वाचे हे की, त्यांना विक्षिप्त म्हणा, लहरी म्हणा की आणखी काही; शांततेसाठी जगाला सध्या डोनाल्ड ट्रम्प हवे आहेत.