डॉ. कुमार सप्तर्षी (ज्येष्ठ विचारवंत)खरं म्हणजे कोणताही माणूस पृथ्वीतलावर जन्मल्यानंतर मृत्यूपर्यंत प्रवासीच असतो. काहींना अधिक प्रवासाची आवड असते. ते ध्येयवादी असतात. जनसंपर्कातून त्यांना आपल्या ध्येयासाठी लोकांना अनुकूल करून घ्यायचे असते. अशा व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते पन्नालाल सुराणा ऊर्फ भाऊ! कमालीची ध्येयनिष्ठा असली की, भौतिक अथवा प्रापंचिक गोष्टींबद्दल मनात विलक्षण अलिप्तता निर्माण होते. त्यापैकी भाऊ एक होते.वयाच्या नवव्या वर्षी पन्नालाल स्वातंत्र्यलढ्याच्या अवतीभोवती फिरू लागले. वर्ष १९४२ ची ‘चले जाव’ चळवळ नऊ-दहा वर्षांच्या वयाच्या मुलांवर साहजिकच प्रभाव गाजवत होती.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात भाषिक राज्ये निर्माण झाली. त्यात महाराष्ट्रावर अन्याय झाला. महाराष्ट्र, गुजरात व कर्नाटकचा काही भाग असे मिळून द्विभाषिक राज्य निर्माण झाले. त्याचबरोबर मुंबई केंद्रशासित ठेवण्याचा प्रयत्न सुरू होता. मराठी माणसाला मुंबईसह स्वत:चे राज्य मिळावे, अशी समस्त मराठीजनांची धारणा होती. वर्ष १९५६ ते १९६० या काळात मराठी माणूस जात, पात, धर्म हे सारे विसरला होता.
भाषेचा प्रभाव धर्मापेक्षाही जास्त असतो. या चळवळीचे नेतृत्व एसेम जोशी (अण्णा) यांनी केले. साहजिकच पन्नालालजींवर अण्णांचा प्रचंड प्रभाव. तेव्हा जयप्रकाश नारायण समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. वर्ष १९५२ च्या लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीमधील अपयशानंतर समाजवादी चळवळीला घोर निराशेने व्यापून टाकले. त्यानंतर समाजवादी पक्षाचा राजीनामा देऊन जयप्रकाशजी आचार्य विनोबांकडे गेले. सर्वोदयी झाले. त्यांच्या भूदान पदयात्रेत सामील होण्यासाठी एसेम अण्णांनी पन्नालालजींना बिहारमध्ये पाठविले.
पन्नालालजींचे अनुभव संचित व भावविश्व वाढत होते. त्यांचा वीणा पुरंदरे या तरुणीशी प्रेमविवाह झाला. घर कट्टर. कुटुंबातील सर्वजण व्यापारी. त्यामुळे कुटुंब सोडावेच लागणार होते. पन्नालालजी सभा गाजविणारे वक्ते नव्हते; परंतु अत्यंत अभ्यासू व जिद्दी होते. त्यांनी शिबिरांमधून व्याख्याने देणे, कार्यकर्त्यांशी संपर्क ठेवणे, लेखन, समाजवादी चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये वाद असेल तर स्वत: पुढाकार घेऊन लवादाचे काम करणे ही आपली भूमिका निश्चित केली.
वर्गविहीन समाज, जातिअंत, म. गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संविधान या विषयांवर बोलण्यासाठी दूरस्थ खेड्यातील शिबिरांना भाऊ पोहोचायचे. युवक क्रांती दलाच्या बहुतेक शिबिरांत भाऊंची हमखास हजेरी असायची. एखाद्या वस्तूचे वेष्टन असलेला कागद, पाठकोट कागद किंवा पोस्टकार्ड वा आंतरदेशीय पत्र या माध्यमातून ते कार्यकर्त्यांना सतत पत्रे लिहीत.
बार्शीला वीणाताई सुराणा यांचे रुग्णालय होते, म्हणून भाऊंना बार्शीचे म्हणायचे! पण ते बार्शीत कमी असत. रात्री एका गावाहून दुसऱ्या गावाला रातराणी (रात्रीची एसटी बस)मधून प्रवास करीत. रात्री आठ-नऊ वाजता एसटीमध्ये जाऊन बसायचे. माकडटोपी, स्वेटर घालायचे आणि डोळे मिटून घ्यायचे. जाणाऱ्या, येणाऱ्यांच्या लाथा लागल्या तरी त्यांची झोपमोड होत नसे. मध्यरात्री वा पहाटे दुसऱ्या गावी एसटी स्टँडवर उतरले, की लगेच पत्रलेखन चालू होई. खांद्याला लटकावलेल्या शबनममध्ये लिखाणाचे कागद आणि एखादे पुस्तक हा त्यांचा रात्रीचा संसार!
भाऊ ओळखत नाहीत, असा एकही कार्यकर्ता महाराष्ट्रात नसेल. भाऊ आपल्या साथींच्या अपप्रवृत्तींच्या विरोधात सौम्य सत्याग्रह देखील करीत. म्हणजे त्याच्यासमोर ठाण मांडून उपोषण करीत. भूकंपग्रस्तांसाठी ‘आपले घर’ ही संस्था स्थापन करण्यात आली. समाजवादी साथींचा तिथला कारभार पसंत नसल्यामुळे भाऊंनी तिथेही आमरण उपोषण सुरू केले. आयुष्याच्या शेवटच्या पर्वात मात्र त्यांनी त्या संस्थेचे सर्वतोपरी संगोपन केले. आज तिथे ३५० मुले निवास करतात. कोणाकडूनही पैसे घेतले जात नाहीत. भाऊ दारोदार फिरून धान्य मिळवीत. डॉ. वीणा सुराणा यांच्या निधनानंतर भाऊंनी स्वत:ला विधायक कामात विसर्जित करण्याचा संकल्प केला. बार्शी गाव सुटली. ‘आपले घर’ हेच भाऊंचे घर झाले.
नव्या अनामिक प्रवासाला प्रारंभ करताना आपल्या शरीराचा एक कणही बरोबर घेऊन जाता येत नाही, हे कळल्यामुळे त्यांनी सोलापूरच्या मेडिकल कॉलेजला देहदान केले. निर्लोभता, निर्मोहता या तात्त्विक भूमिकेतून त्यांची साधी राहणी होती. व्ही. पी. सिंग पंतप्रधान असतानाच्या काळात त्यांना राज्यपाल होण्याबाबत विचारणा करण्यात आली. त्यांनी ती ऑफर नाकारली. राज्यपालांचे निष्क्रिय जीवन त्यांना जगायचे नव्हते. तेव्हा ते औरंगाबादच्या ‘दैनिक मराठवाडा’ या वृत्तपत्राचे संपादक होते.
रा. स्व. संघाला त्यांच्या प्रचारकांचा फार अभिमान असतो. ज्ञानयोग आणि कर्मयोग यांची सांगड घालणारे पन्नालालजी हे समाजवादी चळवळीचे ज्येष्ठ व श्रेष्ठ प्रचारक होते, असे मी मानतो. कारण ज्ञानी असून निष्ठावंत असणे हे महत्त्वाचे. ज्ञानांध राहून केवळ आदेशवादी असणे हे कनिष्ठ दर्जाचेच होय.
अखंड प्रवासी पन्नालालजींना, त्यांच्या आगामी अज्ञात प्रवासाला विनम्र अभिवादन! satyagrahivichar@gmail.com
Web Summary : Pannalal Surana, a socialist leader, dedicated his life to social service, traveling tirelessly and advocating for the marginalized. He prioritized principles over power, choosing activism over a governorship, and leaving a legacy of selfless service.
Web Summary : समाजवादी नेता पन्नालाल सुराणा ने अपना जीवन समाज सेवा के लिए समर्पित कर दिया, अथक यात्रा की और वंचितों की वकालत की। उन्होंने सत्ता से ऊपर सिद्धांतों को प्राथमिकता दी, राज्यपाल पद पर सक्रियता को चुना, और निस्वार्थ सेवा की विरासत छोड़ी।