शहरं
Join us  
Trending Stories
1
PM KP Sharma Oli Resign: अखेर नेपाळमध्ये सत्तांतर! पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी दिला राजीनामा; देश सोडून पळाले?
2
नेपाळमधील आंदोलनाला हिंसक वळण; राष्ट्रपती, गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्र्यांची घरे जमावाने जाळली
3
लाल किल्ल्यावरील कार्यक्रमातून का केली १ कोटींच्या कलशाची चोरी? समोर आलं भलतंच कारण!
4
आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार
5
नेपाळमधील आंदोलनाने भारत चिंतेत? शेजारी राष्ट्र आपल्यासाठी इतका महत्त्वाचा का?
6
नेपाळमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर, पंतप्रधानांचा राजीनामा, आंदोलकांनी संसद भवन पेटवले
7
कोण आहे बालेन शाह? ज्यांच्याकडे देशाचं नेतृत्व सोपवण्याची मागणी Gen Z आंदोलनकर्ते करतायेत
8
Video - स्वाभिमानापेक्षा पैसा मोठा नाही! पूरग्रस्त भागातील मुलाने जिंकलं मन, पाणी घेतलं अन्...
9
Gen-Z क्रांतीमुळे नेपाळमध्ये सत्तापालट? पंतप्रधान ओली दुबईला पळून जाण्याच्या प्रयत्नात, खाजगी विमान तयार
10
मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले
11
Video : नेपाळमधील आंदोलन आणखी पेटलं; मंत्र्यांची घरं जाळल्यानंतर लोकांचा सुरक्षा दलांवर हल्ला
12
रणबीर कपूर 'या' कंपनीचे १२.५ लाख शेअर्स खरेदी करणार, सलग दुसऱ्या दिवशी अपर सर्किट; गुंतवणूकदार मालामाल
13
iPhone 17: अ‍ॅपल आज मोठा धमाका करणार! पहिल्यांदाच आयफोनमध्ये 'हे' ४ फीचर्स मिळण्याची शक्यता
14
हिरो डॉग! मालकाला वाचवण्यासाठी जळते डायनामाइट तोंडात धरले अन्..; Video पाहून भावूक झाले लोक
15
एक व्यक्ती, ६ जिल्ह्यात एकाच वेळी केली ९ वर्षे नोकरी, सरकारला घातला कोट्यवधींचा गंडा 
16
ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला...
17
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
18
हेल्दी वाटणारा मिल्कशेक मेंदूसाठी ठरतोय 'विष'; आवडीने पिणाऱ्यांना धोक्याचा इशारा
19
डिफेन्स कंपनीचा शेअर ठरला 'मल्टीबॅगर', ६ महिन्यांत पैसे दुप्पट; ५ वर्षांत दिला २०००% परतावा
20
रशियन कच्च्या तेलावरील भारताच्या नफ्याला म्हटलं 'ब्लड मनी'; ट्रम्प यांच्या सहकाऱ्यानं पुन्हा गरळ ओकली

अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 07:25 IST

१० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे या आणि इतर मागण्यांसाठी राज्यातील ३६ हजार आरोग्य कर्मचारी १९ ऑगस्टपासून संपावर आहेत.

राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सलग बाविसाव्या दिवशीही कायम आहे. याचा थेट व गंभीर परिणाम आरोग्य सेवांवर होत असून, क्षयरोग निदान, पोषण पुनर्वसन केंद्र, तसेच नवजात शिशू काळजी या महत्त्वाच्या सेवा ठप्प झाल्या आहेत. राज्यात रुग्णसेवेची स्थिती गंभीर बनली असताना आरोग्य विभाग मात्र कागदी घोडे नाचवण्यात मग्न आहे. 

१० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांचे समायोजन करावे या आणि इतर मागण्यांसाठी राज्यातील ३६ हजार आरोग्य कर्मचारी १९ ऑगस्टपासून संपावर आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनासंदर्भात यापूर्वी काढण्यात आलेला ‘जीआर’ बदलण्यास सरकारने वेळकाढू धोरण अवलंबवल्याने संप चिघळत चालला आहे. संपाचे गंभीर परिणाम ग्रामीण भागात दिसू लागले आहेत. 

नंदुरबार, गडचिरोली, अमरावतीसारख्या आदिवासी जिल्ह्यांत नवजात बालकांचे प्राण धोक्यात आले आहेत. संप काळात आतापर्यंत ५० हून अधिक बालमृत्यू झाले असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. हे खरे असेल, तर या अपराधाचे उत्तरदायित्व केवळ संपकरी कर्मचाऱ्यांवर नव्हे, तर राज्याच्या आरोग्य विभागावरदेखील येते. 

प्रसूती विभागातील चित्र तर अजूनच धक्कादायक आहे. महाराष्ट्रात दरवर्षी १८ लाख प्रसूती होतात, त्यापैकी ७० टक्क्यांहून अधिक ग्रामीण व अर्धशहरी भागात होतात. इथे नर्सेस मुख्यत्वे कंत्राटी असतात. संपामुळे अनेक रुग्णालये रिकामी पडली असून, महिलांना महागडे खासगी पर्याय स्वीकारण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. सामान्य कुटुंबाला एका प्रसूतीसाठी ३० ते ५० हजार रुपये मोजावे लागत आहेत. 

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने साथीचे आजार जोर धरत आहेत. मलेरिया, डेंग्यू, सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत; पण पुरेसे डॉक्टर-नर्सेस नसल्याने रुग्णालयांमध्ये दीर्घ प्रतीक्षा, गोंधळ आणि वादविवादाचे प्रसंग घडत आहेत. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या शहरांतसुद्धा सरकारी रुग्णालयांतील अत्यावश्यक शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या गेल्या आहेत. 

एकीकडे खासगी रुग्णालयांचा खर्च परवडत नाही, तर दुसरीकडे सरकारी रुग्णालयांचे दरवाजे बंद आहेत. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील दोन हजारहून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रे मुख्यत्वे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर चालतात. आज या केंद्रांवर कुलूप लागल्याने शेतकरी, मजूर, आदिवासी व दुर्गम भागातील जनतेचे उपचाराविना हाल होत आहेत. 

या संपामुळे केवळ रुग्ण नव्हे तर उरलेले शासकीय आरोग्यसेवेतील इतर कायमस्वरूपी कर्मचारीदेखील प्रचंड तणावाखाली काम करत आहेत. एका डॉक्टरकडे दररोज सरासरी १५० रुग्ण येत आहेत, जे जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलेल्या ३० रुग्णांच्या मर्यादेपेक्षा पाचपट अधिक आहेत. या ओझ्याखाली सेवा गुणवत्तेत घसरण अटळ आहे. 

क्षयरोगाचे निदान आणि उपचार वेळेवर झाले तरच रुग्ण बरा होतो. राज्यात दरमहा सरासरी १८ हजार क्षयरुग्णांची नोंद होत असते. मात्र, संपामुळे ऑगस्ट महिन्यात केवळ ९,४९० रुग्णसंख्या नोंदली गेली. हीच स्थिती लसीकरण मोहिमेचीदेखील आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात दरमहा चार लसीकरण सत्रे आयोजित केली जातात. मात्र, संपकाळात ते देखील थांबले आहे. अजून एक कटू सत्य इथे अधोरेखित करणे भाग आहे. 

महाराष्ट्राचे सकल राज्य उत्पन्न (जीएसडीपी) देशातील सर्वोच्चांपैकी एक असून, ते तब्बल ४० लाख कोटींवर पोहोचले आहे; परंतु त्यातील आरोग्य क्षेत्रावरील खर्च केवळ ०.७ ते ०.८ टक्क्यांदरम्यान आहे. विकसित देशांत ही टक्केवारी ८ ते ९ इतकी असते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार, राज्यांनी किमान ५ टक्के जीडीपी आरोग्यावर खर्च करणे अपेक्षित आहे. 

केरळसारखे राज्य आरोग्यावर आपल्यापेक्षा दुप्पट खर्च करते आणि तेथे प्रति १०,००० लोकसंख्येमागे ३.५ सरकारी डॉक्टर उपलब्ध आहेत. महाराष्ट्रात हा आकडा केवळ १.५ आहे. एवढ्या मोठ्या आर्थिक बळावरही जर आरोग्य सेवेसाठी तुटपुंजे बजेट राखले जात असेल, तर ते जनतेच्या जिवाशी खेळण्यासारखेच आहे. 

आरोग्यसेवेवरील अपुरे बजेट, वेळकाढूपणा आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक म्हटली पाहिजे. रुग्णसेवा ही अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने या सेवेतील कर्मचाऱ्यांना संपावर जाण्याचा अधिकार नसल्याचे सरकारचे म्हणणे आहे. पण इथेच तर खरी गोम आहे. संपावर गेलेले कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर सेवेत आहेत. आम्हाला कायमस्वरूपी सामावून घ्या, हीच तर त्यांची मागणी आहे.

 

टॅग्स :StrikeसंपMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारHealthआरोग्य