देवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शंभर वर्षांच्या गौरवपूर्ण वाटचालीचे आपण साक्षीदार होत आहोत, तेव्हा मनात एकच भावना जागृत होते ती म्हणजे- राष्ट्राभिमान! हा अभिमान केवळ संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या संघर्ष, समर्पणाच्या यशोगाथेचा नाही, तर तो आपल्या प्रत्येक स्वयंसेवकाच्या आत्म्याच्या गहन अनुभूतीचाही आहे.
संघ शाखेतील प्रार्थना ‘नमस्ते सदा वत्सले मातृभूमी’ ही केवळ शब्दांची रचना नाही, तर ती एक साद घालणारी हाक आहे. ही हाक आपल्या हृदयात राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित करते, जीवनाला दिशा देते आणि आपले अस्तित्व मातृभूमीच्या सेवेसाठीच, याचे स्मरणही करून देते. ‘महान्मंगले पुण्यभूमे त्वदर्थे, पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते’ या ओळींमध्ये संघाच्या शतकोत्तर वाटचालीचे बीज रोवलेले आहे. संघाच्या पुढील शंभर वर्षांची आणि त्यानंतरच्या प्रत्येक शतकाची दिशा याच प्रार्थनेतूनच उमटेल. कारण, संघ केवळ एक संघटना नाही तर तो एक विचारप्रवाह आहे, राष्ट्रसेवेचा, राष्ट्रनिर्माणाचा. आजही, जेव्हा मी शाखेत उभा राहतो, तेव्हा मी शिशू गणात गिरविलेले धडे आणि आज राज्याचा मुख्यमंत्री म्हणून काम करत राहताना माझ्या चित्तात फारसा फरक पडत नाही.
प. पू. हेडगेवारजी यांच्यानंतर प. पू. गोळवलकर गुरुजी यांनी संघकार्याची व्याप्ती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवली. त्यांनी समाजातील सर्व घटकांना एकत्र केले. ग्रामीण भागातील शेतकरी, शहरी मध्यमवर्ग, विद्यार्थी, महिला, सर्व जाती-जमातींना एकसूत्रात आणण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रउभारणीच्या सूत्रात त्यांना बांधले आणि कार्यास गती दिली. आज जेव्हा मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून कार्यरत असतो, तेव्हा गुरुजींच्या शिकवणीचा प्रत्यय येतो. ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार कायम गाठीशी बाळगणे. आज केवळ देशातच नव्हे, तर जगभर करोडो संघ स्वयंसेवक कार्यरत आहेत. एका बाजूला आपले संपूर्ण आयुष्य संघकार्याला वाहिलेले स्वयंसेवक आहेत, तर दुसर्या बाजूला आपल्या संसारिक जबाबदार्या सांभाळत राष्ट्रकार्यात वाटा उचलणारे सामान्य स्वयंसेवकही आहेत. ही दोन्ही चाके संघाच्या शंभर वर्षांच्या वाटचालीत महत्त्वाची आहेत. एक चाक वैचारिक शक्ती देते, दुसरे व्यावहारिक गती. आणीबाणीचा काळात स्वयंसेवकांनी संविधान वाचविण्यासाठी लाठ्या-काठ्या खाल्ल्या, तुरुंगवास सोसला, घरादारावर तुळशीपत्र ठेवून केवळ राष्ट्रासाठी या लढ्यात उडी टाकली. संघाचे अनेक स्वयंसेवक, ज्यात माझे वडील स्व. गंगाधरराव फडणवीस यांचाही समावेश होता, तुरुंगात गेले. ते दिवस कठीण होते - कुटुंबे विखुरली, नोकऱ्या गमावल्या, पण स्वयंसेवकांनी हार मानली नाही. त्यांनी तुरुंगातूनच लोकशाहीचे धडे दिले आणि अखेर आणीबाणी संपवण्यात मोलाची भूमिका निभावली. आज जेव्हा मी राजकीय जीवनात असतो, तेव्हा त्या काळातील शिकवण कायम आठवते - धैर्य आणि संयम.
संघ जात-पात मानत नाही. हे त्याचे मूलभूत तत्त्व आहे. डॉ. हेडगेवारजींनी सुरुवातीपासूनच सर्वांना एकत्र आणण्यावर भर दिला. आजही शाखेत दलित, आदिवासी, मुस्लीम, ख्रिश्चन अशा सर्वांचा सहभाग आहे. अनेक शाखांमध्ये विविध जातींमधील स्वयंसेवक एकत्र खेळतात, चर्चा करतात. हा केवळ सिद्धांत नाही, तर प्रत्यक्ष प्रमाण आहे. संघ हा लोकांचा आहे, तो राजकीय पक्षाचा नाही. त्यामुळे संघावर टीका करणारे एकतर संघाला ओळखत नाहीत किंवा ओळखून केवळ राजकीय लाभासाठी टीका करतात. संघ टीकाकारांचे हे दोनच गट आहेत. काही माध्यमे, राजकीय नेते संघावर टीका करताना संघकार्य समजावून घेत नाहीत. त्यांच्या टीकेत केवळ अज्ञान किंवा द्वेष आहे. संघाने कधीच हिंसा शिकवली नाही; त्याने फक्त शिस्त आणि सेवा शिकवली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक म्हणून या शंभर वर्षांच्या वाटचालीचा मला अभिमान आहे. मी भाग्यवान आहे की, प. पू. बाळासाहेब देवरस, प. पू. रज्जूभैया, प. पू. सुदर्शनजी आणि विद्यमान सरसंघचालक प. पू. डॉ. मोहनजी या चारही सरसंघचालकांचा सहवास मला लाभला. त्यांच्या भाषणांमधून बरेच काही शिकण्याची प्रेरणा मला मिळाली आणि आजही मिळते. मुंबईतील विकास प्रकल्प, ग्रामीण महाराष्ट्रातील योजना या सर्वांमागे ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार आहे, तोच भाव आहे. मी जे करू शकलो किंवा करतो आहे, त्यात संघ संस्कारांचा मोलाचा वाटा आहे. शतकोत्तर संघाची वाटचालसुद्धा तितकीच उज्ज्वल असेल, कारण संघ हा करोडो स्वयंसेवकांच्या हातात आहे, त्यांच्या आचरणात आहे.
Web Summary : CM Fadnavis highlights RSS's focus on discipline, service, and instilling nationalism. He emphasizes the Sangh's inclusive nature, transcending caste and promoting national unity through its teachings and activities, shaping his governance.
Web Summary : मुख्यमंत्री फडणवीस ने आरएसएस के अनुशासन, सेवा और राष्ट्रवाद पर ज़ोर दिया। उन्होंने संघ की समावेशी प्रकृति, जाति से ऊपर उठकर शिक्षाओं और गतिविधियों के माध्यम से राष्ट्रीय एकता को बढ़ावा देने पर प्रकाश डाला, जिसने उनके शासन को आकार दिया।