दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 07:15 IST2025-12-22T07:15:02+5:302025-12-22T07:15:16+5:30
बारा वर्षांपासून काेमात असलेल्या मुलाच्या वेदना पाहणे असह्य झाल्याने त्याला दयामरण देण्याची मागणी त्याच्या पालकांनी न्यायालयाकडे केली आहे. त्यानिमित्त.

दीर्घकालीन कोमातील रुग्ण आणि दयामरणाचे वास्तव
- डॉ. अविनाश भोंडवे, आयएमएचे माजी राज्याध्यक्ष, आरोग्य विश्लेषक
एखाद्या अपघातामुळे किंवा आजारामुळे एखादी व्यक्ती कोमात गेली, असे आपण नेहमी ऐकतो. हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात, पूर्ण बेशुद्धावस्थेत, असंख्य नळ्या शरीराला लावलेल्या अवस्थेत अनिश्चित काळ ती पडून असते. जीवन-मरणाच्या सीमारेषेवरील या व्यक्तीला तिचे नातेवाईक साश्रुपूर्ण नजरेने उपचार करीत राहतात. कधी कधी दिवस उलटतात, महिने उलटतात, वर्षेही उलटून जातात, पण या व्यक्तीला शुद्ध येत नाही.
एखाद्या वनस्पतीसारखे हे जिणे रुग्णाच्या प्रियजनांना बघवत नाही. असे लोळागोळा होऊन जगण्यापेक्षा, मरणच आले तरी बेहेत्तर, अशा विचारांनी डॉक्टरांना त्या रुग्णाचे जीवन संपविण्यासाठी विचारणा केली जाते. पण डॉक्टरही हतबल असतात. कारण आपल्या देशातील कायदा, रुग्णाला मरण देण्याबाबत नकारात्मक आहे. कोमात रुग्ण पूर्ण बेशुद्ध असतो. त्याला सभोवतालची जाणीव नसते. त्याचे डोळे मिटलेले असतात आणि तो कोणत्याही बाह्य घटनेला प्रतिसाद देत नाही.
कोमा म्हणजे आजार नसतो, तर एखादा आजार किंवा आघातांमुळे उद्भवणारी गुंतागुंत असते. कोमामधला रुग्ण सतत बेशुद्ध असतो. त्याला बाह्य जगाची जाणीव नसते, तो संवाद साधू शकत नाही. काही रुग्णांना पूर्णपणे यंत्रांवर अवलंबून राहावे लागते, उदाहरणार्थ- श्वासोच्छ्वासासाठी व्हेंटिलेटर, आहारासाठी नाकातून नळी वगैरे. रुग्णामध्ये क्वचित काही प्रतिक्षिप्त क्रिया (रिफ्लेक्सेस) दिसू शकतात, परंतु ते प्रतिसाद जाणीवपूर्वक नसतात. अशी दीर्घकालीन अवस्था ‘वनस्पती स्थिती’ (पर्सिस्टंट व्हेजिटेटिव्ह स्टेटस) म्हणून ओळखली जाते, यात रुग्ण डोळेही उघडतो, त्याचे झोपेचे आणि जागे होण्याचे चक्र सुरु असते, पण त्यात सज्ञानता नसते.
दयामरण (युथेनेसिया) म्हणजे असह्य वेदना सहन करणाऱ्या सज्ञान रुग्णाला, डॉक्टरांकडून वैद्यकीय प्रक्रियेद्वारा मृत्यू देणे. अशी मृत्यूची विनंती रुग्णाच्या नातेवाईकांकडून किंवा काही सामाजिक संस्थांकडून केली जाते. परंतु भारतात, सक्रिय दयामरण म्हणजे रुग्णाचे प्राण घेण्यासाठी केलेली कोणतीही कृती हा गुन्हा आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने २०१८ मध्ये दिलेल्या एका ऐतिहासिक निर्णयात ‘लिव्हिंग विल’ (जिवंत इच्छापत्र) आणि निष्क्रिय दयामरण (जीवरक्षक उपचार काढून घेणे) या गोष्टी काही कठोर अटींखाली मान्य केल्या आहेत. यानुसार जर रुग्ण दीर्घकालीन वनस्पती स्थितीत असेल आणि त्याने आधी ‘लिव्हिंग विल’ केले असेल, तर कुटुंबीय आणि डॉक्टरांची समिती न्यायालयाच्या परवानगीने जीवरक्षक उपचार बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते.
मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील नर्स अरुणा शानबाग ४२ वर्षे वनस्पती स्थितीत होत्या. त्यांच्या मैत्रिणीने त्यांच्यासाठी केलेली दयामरणाची विनंती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती, परंतु त्यानंतर २०१८मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ‘कॉमन केज’ म्हणून ओळखल्या गेलेल्या या निर्णयात लिव्हिंग विलला कायदेशीर मान्यता दिली .
आपल्या प्रिय व्यक्तीला मृत्यू यावा, अशी विनंती नातेवाईक करतात, कारण त्याला शांत मरण यावे असे त्यांना वाटते. याशिवाय दीर्घकालीन कोमाचा उपचार खूप खर्चीक असतो. हा भावनिक आणि शारीरिक ताण मोठा असतो. जेव्हा रुग्ण पूर्ण बरा होण्याची कोणतीही शक्यता डॉक्टर दाखवत नाहीत, तेव्हा नातेवाइकांना हा रुग्णाचा उपचार नसून त्याचा छळ चालू आहे असे वाटू लागते. कोमा ही केवळ रुग्णाचीच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाची, समाजाची आणि आपल्या नैतिक मूल्यांची परीक्षा घेते. मृत्यूचा हक्क हा एक गहन प्रश्न आहे. भारताने याबाबतीत कायदेशीर पावले उचलली आहेत, पण समाजमन तयार करणे, संवेदनशीलता राखणे आणि जबाबदारीने चर्चा करणे हे खरे आव्हान आहे. जीवनाचा गौरव करणारा, पण वेदनांचे मूल्यमापन करणारा समतोल साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे.