शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

प्रेक्षकांच्या जिभेला रक्त लावून खेचून नेते ते खरे नाटक! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 05:37 IST

महाभारताच्या नाट्यरूपांतराचा अचंबित करणारा आंतरराष्ट्रीय आविष्कार घडवणारे ख्यातनाम दिग्दर्शक सर पीटर ब्रुक नुकतेच निवर्तले. त्यांच्या जीवनधारणांचा शोध.

सर पीटर ब्रुक, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दिग्दर्शक

मला कधीही बांधलेल्या नाट्यगृहांचे आणि बंदिस्त रंगमंचांचे आकर्षण वाटले नाही.... का? या प्रश्नाचे उत्तर मला प्रयत्न करूनही गवसले नाही हे खरे आहे, पण मुळातच दिशांच्या मीतीने बांधून घालता येतो तो नाट्यानुभवच नव्हे, असे मी मानतो. मला रिकाम्या जागांचे अनिवार आकर्षण आहे. ही जागा कुठेही असू शकते. जंगलात, वाळवंटात, बंद पडलेल्या कारखान्याच्या आवारात, डोंगरांच्या पायाशी... कुठेही! त्या रिकाम्या चौकटीत कथा, शब्द, संवाद, संगीत, प्रकाश आणि अभिनयाच्या बळावर नाट्यानुभवाची निर्मिती करणे, या आव्हानाने मला सदैव धडपडत राहण्याची प्रेरणा दिली.

या रिकाम्या जागेत भरता येऊ शकतील, अशा ताकदीच्या कथा मला मिळाल्या त्याही देशोदेशीच्या लोककथा आणि मिथकांमध्ये. लोककथांचा जनक कुणी एक नसतो. मिथके तर शतकानुशतकांच्या बदलत्या लोकजाणिवांमधून घडत जातात. त्यातली गुंतागुंत जितकी गडद, तितक्याच त्यात रिकाम्या जागांच्या शक्यता अधिक! याचा पुरेपूर अनुभव मला  ‘महाभारता’ने दिला. या अजोड कथेचा ध्यास घेऊन मी भारतात कुठेकुठे फिरलो, भटकलो, त्याचा हिशेब करणे कठीण! त्यात मी गोरा माणूस. लोक मला म्हणत, हा तर वसाहतवादाचा अतिरेकी स्वार्थ झाला. वसाहतींना लुटायचे आणि अखेरीस सारे लुटून झाले की त्यांचे सांस्कृतिक संचितही तुमच्यासारख्या कलाकारांनी लुटून न्यायचे! 

मला हे कधीच पटले नाही. मी म्हणतो, महाभारत हे एकट्या भारताचे कसे? ते जगाचे आहे. अवघ्या विश्वाचे अस्तित्व पुसून त्याची एक  ‘रिकामी जागा’ करण्याची क्षमता महाभारतात आहे. त्याने मला वेडावले हे तर खरेच, पण माणूस जिवंत असेपर्यंत दरेक पिढीतल्या कलाकारांना या कहाणीची भूल पडतच राहील. का? कारण त्या कथेत दडलेल्या अक्षरश: अगणित शक्यता! नाट्य हे या शक्यतांमधूनच आकाराला येते. मी दिग्दर्शक म्हणून माझ्या प्रेक्षकांसमोर जे काही  ‘दृश्य’ उभे करतो, त्यामागचे  ‘अदृश्य’ बघता यावे, कळावे म्हणून प्रेक्षकांच्या जिभेला रक्त लावते आणि खेचून घेऊन जाते ते खरे नाट्य! रंगमंचावर वावरणारे एखादे पात्र म्हणते, ‘आणि...’- त्यानंतरच्या नि:शब्द निर्वातात खरे नाट्य उभे करता आले पाहिजे.  

रिकाम्या जागांचा ध्यास घ्या. त्या जागांमध्ये एक विलक्षण सुगंध असतो, झपाटून टाकणारी ऊर्जा असते आणि मुख्य म्हणजे तुम्हाला जे हवे ते निर्माण करता येण्याची बेबंद शक्यता! रंगमंचावर नट जो कुणी असतो, ते पात्र म्हणजे तो नट नव्हे; हे प्रेक्षक जाणतातच. खरेतर रंगमंचावर तीन अस्तित्वे असतात. तो नट किंवा नटी, ते पात्र आणि ते दोघे जिथे एकत्र येऊन भेटतात; ती जागा. ती अदृश्य असते. त्या अदृश्याला दृश्यरूप देण्याची ताकद बाळगतो, तो खरा नट आणि असे करण्याची शक्यता निर्माण करतो, तो खरा नाट्यानुभव! ही जादू घडायची असेल, तर नट अतिताणात असता कामा नये, तसाच तो अतिसैलसरही असता कामा नये. त्याच्यासमोरचा प्रेक्षक मठ्ठ, मूर्ख असता कामा नये, तसा तो भस्सकन हसणारा छचोर किंवा डोक्यावर आठी असलेला अतिचिकित्सकही असता कामा नये. या दोन्ही बाजू जेव्हा हे जादुई संतुलन साधतात; तेव्हा जे काही उभे राहते, तेच  ‘नाट्य’! 

संस्कृती असो, धर्म असो, विचारसरण्या असोत, लैंगिक सुखाचे अनुभव असोत की शारीरिक नशेची साधने, मी या साऱ्या विश्वात सतत बुडालेला राहिलो. हे सारे अनुभवले, भोगले आणि वेळ आली तेव्हा सोसलेही.  आता म्हातारा झालो आहे, तर त्या अधिकाराने एवढे जरूर सांगेन, की या सर्व अनुभवांची चव घ्यावी. परीक्षा घ्यावी. प्रश्न विचारण्याचा भोचकपणा जरूर करावा, पण निष्कर्ष काढायची घाई करू नये; एवढेच माझ्या आयुष्याने मला शिकवले आहे. कारण, निष्कर्ष असा काही नसतोच.

 (सर पीटर ब्रुक यांनी विविध निमित्ताने दिलेल्या मुलाखतींच्या आधाराने केलेले संकलन)