लेख: कृपा करा, आमच्या देशात येऊ नका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 09:49 IST2025-09-06T09:46:33+5:302025-09-06T09:49:22+5:30

पर्यटकांच्या लोंढ्यांनी अनेक शहरांमध्ये उच्छाद मांडला आहे. पर्यटनज्वराने ग्रासलेल्या युरोपात तर पर्यटकांच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरू लागले आहेत!

The protesters and residents pushing back on tourism in Barcelona | लेख: कृपा करा, आमच्या देशात येऊ नका!

लेख: कृपा करा, आमच्या देशात येऊ नका!

उज्ज्वला बर्वे
माध्यम अभ्यासक

पर्यटन व्यवसाय अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो, पर्यटकांना संस्मरणीय आनंद मिळतो हे खरे, पण  पर्यटन हे दुधारी शस्त्र आहे, हे आता सगळ्यांच्या लक्षात आले आहे. त्याचे फटके ज्यांना बसतात, त्यांनी प्रमाणाबाहेर चाललेल्या पर्यटनाच्या विरोधात आवाज उठवायला सुरुवात केली आहे. 

स्पेनमधल्या बार्सिलोना शहरात ‘नेबरहूड असेंब्ली फॉर सस्टेनेबल टुरिझम’ (शाश्वत पर्यटनासाठी परिसर संघटना) ही संस्था स्थापन झाली आहे. या संस्थेचे सदस्य सनदशीर मार्गाने त्यांच्या मागण्या मांडत आहेतच, पण कधी कधी पर्यटकांच्या सायकलींच्या चाकांतली हवा काढून टाकणे, पर्यटक वाहनांना थांबवणे, असे प्रकारही ते करतात. ‘पर्यटकांनो, परत जा!’ किंवा ‘आमचं शहर म्हणजे बीच रिझॉर्ट नाही’ असे फलक घेऊन ते पर्यटकांनी गजबजलेल्या रस्त्यांवर आक्रमक निदर्शने करतात. इटलीमधल्या व्हेनिस शहरात तर अशी निदर्शने ही नित्याची गोष्ट झाली आहे. ५० हजार लोकांच्या वस्तीसाठी योग्य असलेल्या या शहरात वर्षभरात दोन कोटी लोक राहून जातात. 

पाण्यात वसलेल्या या शहरातील जमीन इतक्या लोकांच्या वजनाने खाली जाते, असे म्हणतात. शेकड्याने पर्यटक आणणारी महाकाय जहाजे आणि इतर लहान-मोठ्या बोटींमुळे जुन्या इमारतींच्या पाण्यात असलेल्या पायांना धोका निर्माण झाला आहे.
नेदरलँड्समधल्या आमस्टरडॅम या शहराच्या मध्यवर्ती भागात पर्यटकांची एवढी गर्दी होते की, फोटोंमधून प्रसिद्ध झालेली ‘आय लव्ह आमस्टरडॅम’ ही मोठी पाटी प्रशासनाने आता काढून टाकली आहे. पर्यटकांनी आपल्या देशात आल्यावर कसे वागावे, हे सांगणारे व्हिडीओ प्रसृत केले आहेत. त्याच्या जोडीला शहराच्या बाहेर वेगवेगळी पर्यटनस्थळे तयार करून पर्यटकांना तिकडे वळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

तिकडे युरोपातच पर्यटनज्वराने शहरांना ग्रासले आहे, असे नाही. जपानमध्ये वाढत्या पर्यटनामुळे स्थानिक लोक अस्वस्थ होऊ लागले आहेत. भारतातही गोव्यापासून सिमलापर्यंत सर्वत्र पर्यटन व्यवसायाच्या फायद्यांबरोबरच त्याचे तोटे लोकांना जाणवू लागले आहेत.  त्याविरोधात स्थानिक नागरिक एकत्र यायला लागले आहेत. पर्यटकांच्या बाजूने विचार केला तरीही पर्यटनातून त्यांना जो सांस्कृतिक अनुभव, निवांतपणा, प्रसन्नता हवी असते ती गर्दीच्या पर्यटकांच्या लोंढ्यात त्यांना मिळते का, हा प्रश्न निर्माण झालाच आहे.

माद्रिद, आमस्टरडॅम, पॅरीस, लंडन ही लोकप्रिय पर्यटनस्थळे असली तरी ती त्या-त्या देशांची राजधानीची शहरे आहेत. तिथे पर्यटनाखेरीज अनेक महत्त्वाची कामे चालतात. साहजिकच स्थानिक रहिवाशांची संख्या मोठी आहे. त्यांना राहण्यासाठी परवडतील अशी घरे पूर्वी मिळत असत. पण, अलीकडे एअर बीएनबीसारख्या - स्थानिक लोकांची घरे राहण्याकरिता उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांची संख्या प्रचंड वाढली आहे. भाडेकरूंकडून एका महिन्याला जेवढे भाडे मिळू शकते त्यापेक्षा कितीतरी जास्त भाडे पर्यटकांना तात्पुरत्या स्वरुपात घर भाड्याने दिल्यामुळे मिळायला लागले. परिणामी स्थानिकांना भाड्याची घरे मिळेनाशी किंवा परवडेनाशी झाली आहेत.

पूर्वी पर्यटक हॉटेलांमध्ये राहात असल्याने  शहराच्या मध्यवर्ती भागात त्यांचा वावर असे. पण, आता शहराच्या कोणत्याही भागांतील कोणतेही घर पर्यटकांसाठी खुले झाल्याने सर्वत्र पर्यटक दिसतात. ते मजा करण्याच्या, ऐश करण्याच्या मनःस्थितीत असतात, वेळीअवेळी येणे-जाणे, मोठ्या आवाजात बोलणे त्यांना गैर वाटत नाही. पण, तिथल्या रहिवाशांना त्याचा उपद्रव होऊ लागला आहे. या पर्यटकांना स्थानिक जीवनमान बघण्याची मजा घेता येते. पण, शहरवासीयांच्या मनात मात्र आपली घरे, दुकाने हे पर्यटकांसाठी फक्त रीलचे विषय आहेत. आपल्या संस्कृतीचे वस्तूकरण होत आहे, अशी भावना बळावायला लागली आहे.

बार्सिलोना, लिस्बन, अगदी आपले सिमला, मनाली या शहरात येणाऱ्या लोंढ्यांमुळे दररोज किती कचरा निर्माण होतो, किती पाणी वापरले जाऊन पाण्याचा तुटवडा निर्माण होतो, याचा अंदाज बांधणे अवघड नाही. बेजबाबदार पर्यटकांनी हिमालयाच्या डोंगररांगांवर निर्माण केलेले कचऱ्याचे, प्लास्टिकचे ढिगारे पर्यटनाविषयी अनेक प्रश्न निर्माण करतात. अनेक ठिकाणचे नैसर्गिक अधिवास पर्यटकांच्या लोंढ्यांमुळे धोक्यात आले आहेत.

यावर वेगवेगळे देश आपापल्या पद्धतीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत. भुतान या देशाने पर्यटकांवर मोठे शुल्क लावायला त्यांनी सुरुवात केली आहे. अनेक युरोपीय शहरांना जास्त पैसे खर्च करून कमी त्रास देणारे पर्यटक हवे आहेत.  नव्या हॉटेलांना परवानगी नाकारली जात आहे. एअरबीएनबीसारख्या योजनांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण पर्यटनापासून मिळणाऱ्या आनंदापासून अनेकांना वंचित ठेवणारे हे मार्ग शाश्वत न ठरण्याची शक्यता जास्त आहे. त्याऐवजी पर्यटनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे.

पर्यटकांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणला पाहिजे. आपल्याला प्रवास का करायचा आहे, हा प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे. कुटुंबाबरोबर, मित्रांबरोबर निवांत वेळ घालवायचा असेल तर कमी गर्दीच्या ठिकाणांचा विचार करायला काय हरकत आहे?  ‘आम्ही इतक्या देशांना जाऊन आलो’ याबद्दलची शेखी मिरवणाऱ्या पर्यटनाला काहीही अर्थ नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.

चांगले पाहुणे यजमानांच्या सोयीने त्यांच्याकडे जातात. यजमानांच्या घरात कचरा करत नाहीत, दंगामस्ती करत नाहीत, त्यांचे घर आपल्यामुळे खराब होणार नाही, याची काळजी घेतात, त्यांच्या घरच्या चालीरीतींचा सन्मान करतात. पर्यटकांनी असे पाहुणे व्हायला हवे आहे. सगळी जबाबदारी पर्यटकांवर टाकून चालणार नाही, हेही खरेच. सरकार आणि प्रशासनाच्या स्तरावरही मार्ग शोधावे लागतील.  अशी चहूबाजूंनी मोर्चेबांधणी झाली तरच पर्यटन, पर्यटन व्यवसाय आणि पर्यटनातील आनंद टिकू शकेल.

Web Title: The protesters and residents pushing back on tourism in Barcelona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.