एक वेळ जेवण, रात्री वडापाव!- तारुण्याची ‘उपासमार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 08:05 IST2025-02-14T08:04:52+5:302025-02-14T08:05:52+5:30

ग्रामीण भागातून शिक्षणाच्या ओढीने पुण्यात आलेल्या स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या राहण्या-जेवण्याचे प्रश्न गंभीर आहेत. पण, मुद्दा केवळ खाण्या-पिण्याचा नाही..

The primary challenge facing these children is arranging accommodation and food in Pune | एक वेळ जेवण, रात्री वडापाव!- तारुण्याची ‘उपासमार’

एक वेळ जेवण, रात्री वडापाव!- तारुण्याची ‘उपासमार’

प्रमोद मुजुमदार, विश्वस्त, राष्ट्र सेवा दल

मराठवाड्यातील लहान खेड्यातून पुण्यात पदवी शिक्षणासाठी आलेल्या ऐश्वर्या (नाव बदलले आहे) या  विद्यार्थिनीने ‘स्टुडंट्स हेल्पिंग हँड्स’कडे ‘फूड स्कॉलरशिप’साठी अर्ज केला होता. तिच्यासारख्या पुण्याबाहेरून शिक्षणासाठी आलेल्या चौदाशे मुला-मुलींनी किमान एक वेळच्या जेवणाची सोय व्हावी म्हणून अर्ज केले होते.  ऐश्वर्याची शैक्षणिक गुणवत्ता चांगली होती आणि घरची परिस्थिती पाहता तिला फूड स्कॉलरशिप देणे अतिशय आवश्यक होते. त्यामुळे तिला काही जुजबी प्रश्न विचारून तिची मुलाखत संपवली. थोड्या वेळाने कळले की ऐश्वर्या बाहेर जाऊन रडत बसली होती. आपल्याला काहीच प्रश्न विचारले नाहीत, म्हणजे आपल्याला फूड स्कॉलरशिप मिळणार नाही, असे तिला वाटले. किमान एक वेळच्या जेवणाची हमी तिला हवी होती. 

मराठवाडा, विदर्भ, उत्तर-पश्चिम महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणांहून शिक्षणासाठी पुण्यात येणाऱ्या मुलांचा ओघ सातत्याने वाढत आहे. ग्रामीण भागातील जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातील शैक्षणिक गुणवत्ता चांगली असलेल्या मुला-मुलींना पुणे, मुंबईत शिक्षणाला पाठविण्यासाठी पालक धडपडतात. स्पर्धेच्या जगात टिकण्याची आकांक्षा त्यामागे असते. महाराष्ट्राच्या अनेक भागात  दर्जेदार शिक्षण संस्था नसल्याने अभ्यासात गती असलेल्या या मुला-मुलींची मोठी कोंडी होते. परिणामी, कसेही करून मोठ्या शहरात शिक्षणासाठी जाण्याची धडपड ही मुले करत असतात. त्यातूनच हा स्थलांतरित विद्यार्थ्यांचा मोठा प्रवाह पुण्याकडे येत आहे. 

राष्ट्र सेवा दल आणि स्टुडंट्स हेल्पिंग हँड्सतर्फे करण्यात आलेल्या आरोग्य सर्वेक्षणात या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या परिस्थितीचे थोडेफार चित्र समोर आले आहे. या सर्वेक्षणात मुख्यतः मराठवाडा, विदर्भ आणि महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेल्या आर्थिक, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ६०० मुला-मुलींचा समावेश होता. ही सर्व मुले शिक्षणासाठी पुण्यात आलेली आहेत (स्पर्धा परीक्षांसाठी नाही). या आरोग्य सर्वेक्षणाबरोबरच सुमारे साडेपाचशे मुला-मुलींच्या फूड स्कॉलरशिपसाठी मुलाखती घेतल्या गेल्या. याशिवाय सुमारे १००० मुला-मुलींनी फूड स्कॉलरशिपसाठी अर्ज केलेला आहे.

पुण्यामध्ये राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था करणे हे अगदी प्राथमिक आव्हान या मुला-मुलींसमोर आहे. स्टुडंट्स हेल्पिंग हँड्स या संस्थेच्या गेल्या सात-आठ वर्षांच्या अभ्यासाप्रमाणे पुण्यात शिक्षणासाठी येणाऱ्या या मुला-मुलींमध्ये सुमारे ५५ ते ६० टक्के मुले  दुर्बल आर्थिक कुटुंबातील आहेत.  ६३ टक्के मुला-मुलींच्या कुटुंबाचे मुख्य उत्पन्नाचे साधन शेती आहे. ही बहुतांश कुटुंबे अल्पभूधारक आहेत किंवा अनेक मुला-मुलींचे पालक शेतमजुरीवर जातात. 
थोडा अधिक खर्च झाला तरी चालेल, पण आपल्या घरातील त्यातल्या त्यात होतकरू, हुशार मुला-मुलीला शिक्षणासाठी पुण्याला पाठविण्याकडे या कुटुंबांचा कल आहे. त्यासाठी प्रसंगी कर्ज काढण्याची तयारी देखील ही कुटुंबे दाखवतात. प्रचंड कष्ट घेण्याची तयारी या तरुण-तरुणींची असते. मिळेल त्या ठिकाणी राहण्याची सोय शोधणे आणि प्रसंगी अर्धपोटी राहून ही मुले धडपडत असतात.  

या सर्वेक्षणात मुलाखतीला आलेल्या एका धुळ्यातील मुलीने सांगितले की, आम्ही ११ मुली एका वन रूम किचन फ्लॅटमध्ये राहतो आणि दोघीजणीत एक जेवणाचा डबा घेतो.  ही मुले-मुली जेमतेम दोन वेळच्या डब्याची सोय करू शकतात. अनेक जण कुठल्यातरी स्वामी, महाराजांच्या मठातून मिळणाऱ्या प्रसादाच्या खिचडीवर एक वेळची भूक भागवतात. तर अनेक विद्यार्थी एकच वेळेस जेवतात. एका वेळेस वडापाव-चहा !  इतक्या कमी अन्नावर टिकून राहणारे हे विद्यार्थी अभ्यास कसा करू शकतील? त्यांची बौद्धिक क्षमता, मानसिक स्थैर्य कसे टिकून राहावे? असे अनेक प्रश्न या छोट्याशा सर्वेक्षणातून पुढे येतात. या प्रश्नांच्या अनुषंगाने पुढे आलेले वास्तव निश्चितच अस्वस्थ करणारे आहे. पण म्हणून हा प्रश्न केवळ या विद्यार्थ्यांच्या आहाराचा नाही ! मग कसला?- त्याबद्दल उद्या !                           (पूर्वार्ध)
    mujumdar.mujumdar@gmail.com

Web Title: The primary challenge facing these children is arranging accommodation and food in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.