श्रीमंत माने, संपादक, लोकमत, नागपूर
भारतात उन्हाळ्याची धग वाढता वाढता गेल्या मंगळवारी, २४ मार्चला ‘द ग्लोबल ॲसेसमेंट ऑफ मायग्रेटरी फ्रेशवाॅटर फिशेस रिपोर्ट २०२५’ नावाचा एक चिंताजनक अहवाल आला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अखत्यारितील ‘द कन्झर्वेशन ऑफ मायग्रेटरी स्पेसिज ऑफ वाइल्ड ॲनिमल्स’ म्हणजे ‘सीएमएस’ नावाच्या संस्थेने हा अहवाल जारी केला आहे आणि त्यात गोड्या पाण्यातून स्थलांतर करणाऱ्या मत्स्य प्रजातींविषयी गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
डाॅ. झेब होगन यांनी झॅक बेस, मिशेल थिमे व टवाॅन स्टाफर्स यांच्या मदतीने केलेल्या या अभ्यासाची व्याप्ती तशी फार नाही. प्रजननासाठी स्थलांतर करणाऱ्या एकूण ३४९ प्रजातींचा अभ्यास ‘सीएमएस’ने निश्चित केला असला तरी प्रत्यक्षात केवळ २४ प्रजातींचाच अभ्यास झाला. तब्बल ३२५ प्रजाती अजूनही अभ्यासाच्या कक्षेबाहेर आहेत. आशियातील नद्यांचे जाळे या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. २०५ प्रजाती आशियातील आहेत. पृथ्वीतलावरील सर्वाधिक जलसमृद्ध ॲमेझाॅन नदीखोऱ्यातील २४ प्रजातींसह एकूण दक्षिण अमेरिकेतील ५५, युराेपमधील ५०, उत्तर अमेरिकेतील ३२ आणि ओसेनियातील ६ प्रजाती यात आहेत.
ॲमेझाॅन, ला-प्लाटा-पराना-पराग्वे, युरोपमधील अनेक देशांमधील डॅन्युब, तसेच चीन, म्यानमार, लाओस, थायलंड, कंबोडिया व व्हिएतनामला जलसमृद्धी देणारा मेकाँग डेल्टा आणि गंगा-ब्रह्मपुत्रा-मेघना या हिमालयीन नद्यांचा टापू या पाच जलप्रदेशांबद्दल ‘सीएमएस’ने जगाला गंभीर इशारा दिला आहे. यापैकी पाचवा हिमालयीन नद्यांचा टापू आपल्यासाठी चिंतेचा. कारण, गंगा, ब्रह्मपुत्रा व मेघना याशिवाय असंख्य नद्यांबद्दलही चिंता आहेच. काही मोठ्या तर काही छोट्या. दोन देशांच्या सीमेवरील नद्यांचे पाणीवाटप, धरणे हा सतत वादाचा विषय. पाणीवाटपाचा विचार करता भारताचा संबंध बांगलादेश, भूतान, नेपाळ, चीन, पाकिस्तान, म्यानमार या देशांशी येतो आणि केवळ बांगलादेश-भारत सीमाभागात छोट्या-मोठ्या ५५ नद्या वाहतात यावरून या प्रश्नाची क्लिष्टता स्पष्ट व्हावी.
या जागतिक अहवालात ‘सीएमएस’ने गंगा-ब्रह्मपुत्रा-मेघना टापूचा प्राधान्याने विचार करून इशारा दिला आहे. आपल्या जलव्यवस्थापनात मासे दुर्लक्षित आहेत. त्यांचा केवळ खाद्य म्हणून विचार होतो. त्यांच्या अधिवासाची चर्चा होत नाही. कारण, विकासाचा, खरे तर विनाशाचा ध्यास घेतलेल्या माणसांना जलविद्युत किंवा अन्नसुरक्षेशिवाय दुसरे काही सूचत नाही. त्यातून पाण्यासाठी धरणे, बंधारे बांधून नद्यांचे प्रवाह अडवताना फिश पासेस किंवा फिश लॅडर्स यांसारखे उपाय केले नाहीत. धरणाच्या वरच्या बाजूचा प्रवाह खंडित होतो, तर खाली नद्या कोरड्या पडतात. त्याचा सर्वाधिक फटका स्थलांतरित मत्स्यप्रजातींना बसतो. पण, हा विषय कधी चर्चेलाही येत नाही. फारतर नद्यांचे खंडित प्रवाह आणि उघडे नदीपात्र याबद्दल अधूनमधून चिंता व्यक्त होते. पण, प्रवाह म्हणजे जैवविविधता नव्हे. पाण्याबरोबर गाळ वाहतो. त्यात पोषणद्रव्ये असतात. त्यावर वनस्पती तसेच सूक्ष्मजीवांपासून ते महाकाय प्राण्यांचे पोषण होते. नद्यांच्या प्रवाहासोबत जणू एक समृद्ध जीवसमूह प्रवाहित होतो. त्यात खंड हे जीवसृष्टीपुढे मोठे संकट आहे.
स्थलांतरित माशांचे विश्व खरेच अद्भुत आहे. प्रवाहाच्या उलटा पोहत जाणाऱ्या म्हणजे समुद्रापगामी अशा साल्मन तसेच स्टर्जन, शेड या प्रजाती ॲनाड्रोमस वर्गात मोडतात. यापैकी साल्मनमुळे मासे प्रवाहाच्या विरोधातच पोहतात, असा गैरसमज निर्माण झाला. या प्रजाती खाऱ्या पाण्यात राहतात आणि अंडी घालण्यासाठी गोड्या पाण्यात म्हणजे नद्यांच्या उगमाच्या दिशेने शेकडो किलोमीटरचा प्रवास करतात. पोटाड्रोमस वर्गातील मासे संपूर्ण आयुष्य गोड्या पाण्यात घालवितात आणि त्यादरम्यान नदीचा उगम आणि नदीमुख असा प्रवास करीत असतात.
भारतीयांचा अधिक संबंध कॅटाड्रोमस म्हणजे गोड्या पाण्यातून प्रजननासाठी समुद्रात जाणाऱ्या माशांशी येतो. त्यापैकी चवदार, भरपूर तेल असणारा हिल्सा अधिक लोकप्रिय. हा हिल्सा गंगा नदीच्या मुखापासून म्हणजे बंगालच्या उपसागरातून थेट वाराणसी, प्रयागराज, कानपूर किंवा बिहारमधील गंगेच्या उपनद्यांच्या मार्गाने हिमालयाच्या पायथ्यापर्यंत पोहोचल्याच्या नोंदी आहेत. आता मात्र ते पूर्वीच्या प्रमाणात दिसत नाहीत. महसीर हा आणखी असाच खवय्यांना प्रिय. हे नाव त्याचे डोके मोठे असल्याने पडले. मोठे खवले व मिशा असल्याने मराठीत तो खवल्या, खडवी, खडची, मस्ता, मस्तर म्हणून ओळखला जातो.
याच कॅटाड्रोमस वर्गातील डोराडो कॅटफिश जलचर पृष्ठवंशीय प्राण्यांमधील चमत्कार वाटावा, असा प्रवास करतो. स्पॅनिश भाषेत डोराडो म्हणजे सोनेरी. या डोराडोची लारव्ही अँडिज पर्वतरांगांमधील नद्यांच्या उगमापासून प्रवाहित होते. हजारो किलोमीटर अंतरावरील अटलांटिक महासागराच्या ॲमेझाॅन नदीमुखाजवळ तो अंडी घालतो आणि प्रजननानंतर परत उगमाकडे जातो. हा प्रवास असतो तब्बल ११ हजार ६०० किलोमीटरचा. त्यातच त्याचे अख्खे आयुष्य जाते. एकूण संकट पाहता हा चमत्कार आणखी किती दिवस टिकेल हा प्रश्नच आहे.shrimant.mane@lokmat.com
Web Summary : A UN report warns of the dire state of migratory fish species due to damming and habitat destruction, particularly in Himalayan rivers. Fish are neglected in water management, impacting biodiversity. The report highlights the need for conservation efforts.
Web Summary : एक संयुक्त राष्ट्र रिपोर्ट बांधों और निवास स्थान के विनाश के कारण प्रवासी मछली प्रजातियों की गंभीर स्थिति के बारे में चेतावनी देती है, विशेष रूप से हिमालयी नदियों में। जल प्रबंधन में मछलियों की उपेक्षा की जाती है, जिससे जैव विविधता प्रभावित होती है। रिपोर्ट संरक्षण प्रयासों की आवश्यकता पर प्रकाश डालती है।