बाजीची ‘हिरकणी’, सेनापतीची ‘चंदा’, शिलेदारची ‘तारा’
By सचिन जवळकोटे | Updated: March 7, 2026 06:22 IST2026-03-07T06:22:10+5:302026-03-07T06:22:28+5:30
अधिकचे वाघ तिकडून उचलून सह्याद्रीत आणल्याने ‘विदर्भातला बॅलन्स’ राखला जाईल; पण त्यामुळे इकडल्या माणसांची पाचावर धारण बसलीय..

बाजीची ‘हिरकणी’, सेनापतीची ‘चंदा’, शिलेदारची ‘तारा’
-सचिन जवळकोटे, कार्यकारी संपादक, लोकमत, कोल्हापूर
गेल्या महिनाभरापासून ‘रिल्स’मधून ‘ती’ भलतीच गाजते आहे. तिचं मान वळवून बघणं काय, डोळ्यात डोळे घालून भेदकपणे पाहणं काय; सारंच अंगावर शहारे आणणारं. तिचं नाव ‘हिरकणी’. ‘पेंच’मधली वाघीण ती. शेकडो मैलांचा प्रवास करत तिला ‘सह्याद्री’च्या जंगलात सोडण्यात आलं. त्यानंतर कडेकपारी ओलांडत अवघ्या चार दिवसांत ती कोकणात पोहोचली. थेट चिपळुणात. गेल्या चार महिन्यांत तीन वाघिणी इथं सोडण्यात आल्या. चंद्रपूरची ‘चंदा’ चांदोलीत रमली आहे. याच ‘ताडोबा’तली ‘तारा’ तर चक्क पाण्यातून पोहत कोयना बॅकवॉटरच्या जंगलात गुडूप झाली. चांदोली व्याघ्र प्रकल्पात मूळचे तीन नर वाघ. सेनापती, बाजी अन् शिलेदार. त्यांचे पूर्वज इथलेच. त्यामुळं त्यांना ‘मूळपुरुष’ म्हणायला हरकत नसावी. त्यांना जोडीदारीण हवी म्हणून टप्प्याटप्प्यानं चंदा, तारा अन् हिरकणीला इथं सोडण्यात आलं.
तब्बल अठ्ठावीस वाघांना कवेत घेण्याची क्षमता आहे म्हणतात इथल्या जंगलात. इथं एकूण आठ वाघ अवतरणार आहेत, त्यातल्या तिघी आल्या. बाकीच्या पाच जणांची प्रतीक्षा आहे. आता सोशल मीडियावर या तीन जोड्यांचाच धुमाकूळ सुरू. ‘चंदा’ अन् ‘सेनापती’ एकाच झाडाच्या बुंध्यावर खरवडून एकमेकांना आपल्या अस्तित्वाचा कसा संदेश देताहेत इथपासून ‘हिरकणी’ अन् ‘बाजी’ एकमेकांना कधी कुठं भेटणार, यावरच्या प्रेमळ चर्चांनी पोस्टवर पोस्ट रंगू लागल्या आहेत. आता हे सारं कमी पडलं की काय म्हणून कर्नाटकातला आणखी एक नर वाघ ‘तारा’च्या शोधात तिच्या हद्दीत घुटमळू लागला आहे. त्याचं नाव मोठ्या कौतुकानं ठेवलंय ‘शिलेदार’. गेल्या महिन्यात ‘व्हॅलेंटाइन’ काळात या ‘टायगर अफेअर’ला एवढा ऊत आला की प्रेम करावं तर यांच्यासारखंच असं तरुणाईला वाटू लागलं. भविष्यात यांना होणाऱ्या पिलांची नावंही आतापासूनच ठरू लागली आहेत.
एकीकडे शहरातल्या उत्साही मंडळींच्या स्क्रीनवर या वाघांच्या व्हिडीओला लाखोंचे व्ह्यूज मिळत आहेत, याचवेळी दुसरीकडे मात्र सह्याद्री घाटातल्या वाडी-वस्त्यांवरच्या बाया-बापड्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले आहेत. गेली दोन-अडीच दशकं ‘बिबट्यानं छळलं होतं’, आता भविष्यात ‘वाघही सोडणार नाही’, या जाणिवेनं अनेकांची झोप उडाली आहे. याला कारण स्थानिक गावकऱ्यांची परंपरागत मानसिकता.
गेल्या शतकात ‘दाजीपूर’च्या जंगलात कैक वाघ होते, असे दाखले इतिहासात मिळतात. कोल्हापूरच्या छत्रपती शहाजी महाराज संग्रहालयात आजही सहा वाघांचे पेंढारे याला साक्षी आहेत. छत्रपती शाहू महाराजांच्या संस्थानात चित्ते पाळण्याचीही अनोखी परंपरा होती. वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाची त्याकाळी लोकांना सवय होती. अलीकडच्या सात-आठ दशकात सह्याद्री रांगांमधले बहुतांश वाघ नामशेष झाले. तशात वाडी-वस्त्यांची संख्या वाढली. ‘वारणा-कोयना’ धरणामुळं पूर्वी शेकडो गावं विस्थापित झाली. डोंगर उतरून नाइलाजानं खाली आली. त्यानंतर पुन्हा व्याघ्र प्रकल्प ‘कोअर-बफर झोन’च्या नावाखाली हीच गावं माण-खटाव-खानापूरसारख्या दुष्काळी भागांत स्थलांतरित करण्यात आली. वर्षभरात केवळ तीन-चार महिने सूर्यदर्शनाची सवय असलेली मंडळी उघड्यावरच्या काहिलीनं होरपळून निघाली.
जंगलातल्या कैक वस्त्या अजूनही बिलकुल हलल्या नाहीत. बफर झोनजवळच टिकून राहिल्या. ‘बिबट्यांशी संघर्ष कसा करायचा’, हे त्यांनी शिकून घेतलं, मात्र ‘वाघांची सोबत’ ही मानसिकताच सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग अन् रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश दुर्गम वाडी-वस्त्यांची अद्याप झाली नाही. आरडाओरडा केल्यास बिबट्या पळून जातो, वाघ मात्र उलट अधिक चवताळून हल्ला करतो, एवढंच ठाऊक असलेल्या डोंगरी मंडळींना प्रशिक्षण अन् समुपदेशनाची नितांत गरज आहे. गेल्या वर्षभरात चंद्रपूर परिसरात पन्नासहून अधिक लोकांना ठार करणाऱ्या वाघांची महती राजकीय नेत्यांना चांगलीच ठाऊक आहे; म्हणूनच इथल्या लोकप्रतिनिधींनीही ‘आमचा सह्याद्री म्हणजे डम्पिंग ग्राउंड आहे की काय? किमान आम्हाला विचारून तरी वाघांच्या टोळ्या आणायला हव्या होत्या’, अशी नाराजी व्यक्त केली आहे.
हे अधिकचे वाघ तिकडून उचलून आणल्याने ‘विदर्भातला बॅलन्स’ राखला जाईल, दक्षिण महाराष्ट्रातलं पर्यटनही वाढेल, निसर्गचक्र संतुलित राहील; या इम्पोर्टेड वाघांना ‘जंगल टुरिझम’चा लळा लागलाही असेल, पण सह्याद्रीतल्या लोकांना कुठे वाघांची सवय आहे?
sachin.javalkote@lokmat.com