केवळ गृहराज्य झारखंडमध्येच नव्हे, तर उभ्या देशात ‘गुरुजी’ म्हणून ख्यात असलेल्या शिबू सोरेन यांनी सोमवारी अखेरचा श्वास घेतला. झारखंडसाठी ते केवळ एक नेता नव्हते, तर संपूर्ण प्रदेशाच्या अस्मितेचे, संघर्षाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक होते. त्यांच्या इहलोकाच्या प्रवासाची अखेर ही एका राजकीय नेत्याच्या मृत्यूपेक्षा अधिक काही तरी आहे. तो झारखंडच्या युगपुरुषाच्या निघून जाण्याचा क्षण आहे. देश पारतंत्र्यात असताना, झारखंडमधील धनबाद जिल्ह्यातील नेमरा या छोट्याशा गावात जन्म झालेल्या शिबू सोरेन यांनी त्यांच्या बालपणापासूनच भोवतालच्या आदिवासी समाजातील अन्याय, शोषण आणि असमानतेचे चित्र पाहिले होते.पेशाने शिक्षक असलेल्या वडिलांची हत्या झाल्यानंतर त्यांचे अभ्यासातून लक्ष उडाले. त्यांनी शिक्षण सोडून दिले आणि अभिजन वर्गाच्या विरोधात धनकटनी आंदोलन सुरू केले. त्या आंदोलनात धनुष्यबाण हाती घेतलेले आदिवासी युवक अभिजन वर्गातील लोकांच्या धानाच्या शेताभोवती कडे करत आणि धानाचे पीक कापून नेत. त्या आंदोलनातूनच सामाजिक अन्यायाविरोधात लढण्याची दिशा शिबू सोरेन यांना गवसली. त्यातूनच पुढे झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) या संघटनेचा उगम झाला. झामुमोच्या झेंड्याखाली त्यांनी केलेला संघर्षच पुढे झारखंड राज्यनिर्मितीच्या लढ्यात परावर्तित झाला.
झारखंड हा नैसर्गिक साधनसंपत्तीने अत्यंत समृद्ध असा प्रदेश; पण राजकीय नेते आणि नोकरशहांना खुश ठेवत, खनन कंपन्यांनी दशकानुदशके प्रदेशाचे आणि भूमिपुत्र आदिवासींचे शोषण केले. शिबू सोरेन यांनी खनन कंपन्यांच्या शोषणाविरोधात आदिवासींना संघटित केले, शोषित जमातींना त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी खंबीरपणे उभे राहायला शिकवले. त्यांच्या नेतृत्वाखालील चळवळींनी आधी तत्कालीन अखंड बिहार आणि मग स्वतंत्र झारखंडमध्ये खळबळ माजवली. ‘भूमी आपली, हक्कही आपलाच’ हे त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात बिंबवले. त्या बळावर त्यांनी झारखंडी जनतेच्या, विशेषतः आदिवासी समुदायाच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले. त्यामुळेच त्यांना तीन वेळा झारखंडचे मुख्यमंत्रिपद भूषवता आले. केंद्र सरकारमध्येही त्यांनी कोळसा खात्याचा मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली; परंतु त्यांची कारकीर्द वादग्रस्त ठरली. त्यांचेच खासगी सचिव शशिनाथ झा यांच्या १९९४ मधील हत्या प्रकरणात त्यांना सत्र न्यायालयाने दोषी ठरवून शिक्षाही ठोठावली होती. पुढे उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांची मुक्तता केली, हा भाग वेगळा! त्याशिवाय गाजलेल्या ‘कॅश फॉर व्होट्स’ प्रकरणातही त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाले होते. या सर्व वादळांतूनही ते पुन्हा उभे होत गेले. त्यांच्या समर्थकांसाठी ते नेहमीच एक अजोड प्रेरणास्थान राहिले.
स्वतंत्र झारखंड राज्यासाठीचा त्यांचा लढा राजकारणापुरताच मर्यादित नव्हता. त्यांनी भूमकाल आंदोलन, संथाली हक्कांची लढाई, आदिवासी सांस्कृतिक ओळखीचा आग्रह, यामधून झारखंडी जनतेच्या हक्कांचा आवाज बुलंद केला. झारखंड हा केवळ एक भूभाग नसून, एक संस्कृती, एक जीवनपद्धती आहे, हे त्यांनी ठसवले. आज झारखंडमधील लाखो आदिवासींच्या घरात शिबू सोरेन हे नाव श्रद्धेने घेतले जाते. त्यांच्या निधनामुळे झारखंडच नव्हे, तर संपूर्ण देश अशा प्रखर आदिवासी जननेत्याला मुकला आहे, ज्याने दिल्लीच्या दरबारात आदिवासींना आवाज मिळवून दिला!
ते केवळ एका राजकीय पक्षाचे अध्यक्ष नव्हते, तर संघर्षशील नेतृत्वाचे प्रतीक होते. त्यांच्या स्मृती जपणे हे केवळ राजकीय कर्तव्य नाही, तर ती झारखंडी अस्मितेची खरी सेवा ठरेल. त्यांच्या जीवनातून प्रत्येकाने खूप काही शिकण्यासारखे आहे. अन्यायाविरोधात झुकायचे नाही, अपयश आले तरी पुन्हा उभे राहायचे आणि आपल्या लोकांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढत राहायचे, ही त्यांची शिकवण प्रत्येकाने अंगी बाणवली पाहिजे. शिबू सोरेन हे आता इतिहासाचा भाग झाले आहेत; पण त्यांच्या विचारांचा प्रकाश झारखंडच्या पिढ्यान्पिढ्यांना मार्गदर्शन करत राहील. त्यांच्या जाण्याने एक पर्व संपले; पण त्यांनी निर्माण केलेली चळवळ आजही जिवंत आहे आणि तीच त्यांची खरी विजयगाथा आहे! यापुढेही आदिवासी समुदायात अनेक नेते होतील; पण गुरुजींची उंची कोणालाही गाठता येणार नाही. गुरुजी म्हणजे झारखंडी जनतेच्या हृदयावर कोरलेली एक अमिट खूण आहे!