‘देशाचे भवितव्य बंदुकांवर नव्हे, धान्यावर अवलंबून!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 09:05 IST2025-08-07T09:03:00+5:302025-08-07T09:05:31+5:30

M.S. Swaminathan : हरित क्रांतीचे जनक प्रो. एम.एस. स्वामीनाथन यांची आज जन्मशताब्दी. त्यानिमित्ताने या अन्नदात्या विज्ञानाचार्याच्या कार्याचे कृतज्ञ स्मरण!

The future of the country depends on grain, not guns | ‘देशाचे भवितव्य बंदुकांवर नव्हे, धान्यावर अवलंबून!’

‘देशाचे भवितव्य बंदुकांवर नव्हे, धान्यावर अवलंबून!’

अतुल देऊळगावकर, कृषी अर्थशास्त्र आणि पर्यावरणाचे ज्येष्ठ अभ्यासक

प्रो. एम. एस. स्वामीनाथन निक्षून सांगत, ‘देशाचे भवितव्य हे बंदुकांवर नव्हे, तर ते धान्यावर अवलंबून आहे.’ त्यातून गांधी आणि नेहरू यांच्या विचारांचा विस्तार व्यक्त होत असे. त्या विचारांची कल्पक आणि सर्जनशील अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी त्यांचे आयुष्य वाहिलेले होते.

स्वामीनाथन यांनी आपल्याप्रमाणे डॉक्टर व्हावे, ही वडिलांची इच्छा नम्रपणे बाजूला सारली आणि ते शेतीशास्त्राकडे गेले. पदवी घेतल्यावर ते आय.पी.एस. परीक्षा उत्तीर्ण झाले होते. गांधीजींच्या सूचनेनुसार त्यांनी ती संधी नाकारली. स्वतंत्र भारतावर दुष्काळाचे सावट येऊ नये, यासाठी विज्ञानाचा उपयोग ही आकांक्षा घेऊन ते उच्चशिक्षणासाठी इंग्लंड व अमेरिकेला गेले. अमेरिकेत जनुकशास्त्राचा उदय होत असताना स्वामीनाथन त्यावर संशोधन करू लागले. 

त्यांनी १९५२ मध्ये जनुकीय बदल करून थंडी सहन करू शकणारी बटाट्याची प्रजाती विकसित केली. तेव्हा त्यांना ‘रेड डॉट पोटॅटो चीप’ कंपनीमध्ये रुजू होण्यास सुचवले होते. ‘विस्कॉन्सिन विद्यापीठाने’ही जनुकशास्त्र विभागात अध्यापन व संशोधनाकरिता विचारणा केली होती. 

या दोन्ही संधी सोडून ते ‘भारतीय शेती संशोधन संस्थे’त रूजू झाले. तेव्हा जगात व देशात आशेचे वातावरण होते. नवनव्या संस्था निर्माण होत होत्या. गांधी व नेहरू यांच्या विचारांनी भारावलेल्या असंख्य व्यक्ती देशभर कार्यरत होत्या. या वातावरणाशी एकरूप झालेल्या स्वामीनाथन यांनी ‘भारतीय शेती संशोधन संस्थे’ला आकार देऊन तिचा कायापालट केला. त्यांनी १९५५ साली विकिरणांच्या साहाय्याने उत्परिवर्तन (म्युटेशन) घडवण्यास आरंभ करून विकिरण जीवशास्त्र (रेडिएशन बायॉलॉजी) विभाग स्थापन केला. त्यामुळे तुर्भे येथील ‘अणुतंत्रज्ञान संस्थे’मध्ये शेतीशास्त्रज्ञांना स्थान मिळाले. त्यातून क्ष-किरण, गॅमा किरण व न्यूट्रॉन यांच्या साहाय्याने तांदूळ, गहू, भुईमूग, डाळी, मका, बाजरी आणि ज्वारी सारख्या मुख्य पिकांच्या बहुगुणी जाती निघाल्या. अणुऊर्जेचा शेतीसाठी उपयोग पाहून डॉ. होमी भाभा थक्क झाले. (त्यामुळेच त्यांनी १९५८ साली जिनेव्हा येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या, ‘अणुऊर्जेचा शांततेसाठी उपयोग’ या जागतिक परिषदेसाठी भारताचे प्रतिनिधी म्हणून स्वामीनाथन यांना पाठवले.)

स्वामीनाथन यांनी ‘भारतीय अवकाश संशोधन संस्थे’चे प्रमुख डॉ. विक्रम साराभाई यांना शेतीसाठी मदत करण्याची विनंती केली. देशातील पिकांवरील किडीचा प्रसार पाहण्यासाठी उपग्रहाकडून आलेल्या छायाचित्रांचा उपयोग होईल, हे सांगितल्यामुळे इंदिरा गांधी यांनी उपग्रह संशोधनास मंजुरी दिली आणि हरित क्रांती सुकर होत गेली. 

स्वामीनाथन यांच्यामुळे १९६० च्या दशकात शेतीशास्त्रज्ञ आणि शेती प्रसारक शेताशेतांत जाऊ लागले. शेतकरी बदल स्वीकारू लागले आणि अशा ‘साथी हात बढाना’मुळे एक साधी सरकारी योजना ‘हरित क्रांती’ घडवून गेली. त्याकाळात एकदा विदेशातून गव्हाचे बियाणे आयात करावे लागल्यामुळे देशभर सडकून टीका झाली होती; परंतु शेतकरी हे बियाणांच्या बाबत स्वावलंबीच असले पाहिजेत, यासाठी स्वामीनाथन हे अतिशय जागरूक होते. त्यांनी, शेतकऱ्यांना दरवर्षी नव्याने बियाणे विकत घेण्याची गरज पडू नये यासाठी सरळ व सुधारित बियाणे विकसित केले. (त्यांनी पंजाबच्या जौनती गावाला बियाणे ग्राम करून ठेवले होते.) त्यामुळे डोळे फाटावे एवढे गव्हाचे उत्पादन वाढले. 

स्वातंत्र्यानंतर नेहरू यांनी वैज्ञानिक विचारांचा प्रसार करण्यासाठी दरवर्षी ‘भारतीय विज्ञान परिषदे’चे आयोजन सुरू केले होते. हरितक्रांतीचे लोण पंजाब, हरियाणातून देशभर पोहोचण्याआधी १९६८ मधील वाराणशी अधिवेशनात स्वामीनाथन जाहीरपणे म्हणाले, ‘आपणास शास्त्रीय पद्धतीने शेतीतून अधिकाधिक उत्पादनाची संधी आहे, परंतु केवळ तातडीचा फायदा पाहून शेती झाली तर पुढच्या काळात अनेक धोके उभे राहतील. पाण्याचा निचरा होऊ न देता अतीव पाणी देत गेलो तर जमीन खारफुटी होत जाईल. पूर्वजांनी साठवून ठेवलेला अनमोल जलसाठा उपसून उधळून टाकला तर जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने घसरेल. रासायनिक खतांचा बेसुमार वापर केला तर मातीचा कस व पोत टिकून राहणार नाही. कीटकनाशक, तणनाशकांचा मारा केल्यास जैविक चक्राचे संतुलन बिघडेल, त्या विषारी रसायनांचा अंश धान्यातून पोटात गेल्यानं कर्करोगासारखे दुर्धर रोगवाढीला लागतील. पारंपरिक शेतीकडून अधिकाधिक उत्पादन (एक्स्प्लॉयटेटिव्ह) देणाऱ्या शेतीकडे वळताना त्यातील प्रत्येक घटकाला नीट समजून घेणे आवश्यक आहे. आपल्याला तातडीने शास्त्रीय प्रशिक्षणाचा भक्कम पाया तयार करावा लागेल. अन्यथा भविष्य काळात शेतीतील समृद्धी ही शेतीवरची आपत्ती ठरेल. हरित क्रांतीचे रूपांतर ‘हव्यासाच्या क्रांती’कडे (ग्रीन टू ग्रीड) जाईल.’

फिलिपाईन्समधील ‘इंटरनॅशनल राईस रीसर्च इन्स्टिट्यूट’चे महासंचालक असताना स्वामीनाथन यांनी (१९८२ ते १९८८) चीन, व्हिएतनाम, कांपुचिया, थायलंड, मलेशिया, उत्तर कोरिया, टांझानिया, ब्रह्मदेश, श्रीलंका, नेपाळ, इराण, इजिप्त, बांगलादेश आणि पाकिस्तानला भेट देऊन त्या देशांमधील तांदूळ संशोधनाला मदत केली. शेतकऱ्यांचे प्रशिक्षण घडवले आणि जगभर तांदूळ उत्पादन वाढत गेले. त्यांच्या शेती क्षेत्रातील असामान्य कार्यासाठी त्यांना पहिले ‘वर्ल्ड फूड प्राइज’ बहाल करण्यात आले. प्रो. स्वामीनाथन हरीत क्रांतीकडून सदाहरित क्रांतीकडे कसे वळले, तीही एक कहाणी आहे...
    atul.deulgaonkar@gmail.com
    (उत्तरार्ध उद्याच्या अंकात)

Web Title: The future of the country depends on grain, not guns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.