कुसुमाग्रज प्रतिष्ठानमधल्या ‘तीन खुर्च्यां’चे नाटक; मनमानी कारभाराची लक्तरे अखेर वेशीवर
By धनंजय वाखारे | Updated: November 4, 2025 11:01 IST2025-11-04T11:01:05+5:302025-11-04T11:01:31+5:30
नाशिककरांचे ‘मौन’ आता सुटले असून, अनेक प्रश्नांचे मोहोळ उठले आहे.

कुसुमाग्रज प्रतिष्ठानमधल्या ‘तीन खुर्च्यां’चे नाटक; मनमानी कारभाराची लक्तरे अखेर वेशीवर
धनंजय वाखारे, उपवृत्त संपादक, लोकमत, नाशिक
प्रवाह वाहता राहिला तर ठीक, नाहीतर त्यात साचलेला गाळ नदीच गिळंकृत करू शकतो. कधीतरी येणारे महापूर हे साचलेपण दूर करण्यासाठी आवश्यकच असतात. तमाम मराठीजनांच्या आस्था आणि श्रद्धेचे विद्यापीठ असलेल्या ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’मध्येही गेली अनेक वर्षे साचून राहिलेल्या गाळामुळे श्वास घुसमटून गेल्यावर शेवटी संतापाचा महापूर आलाच. अंतर्गत कलहाचे तोंड दाबून प्रतिष्ठानमधल्या जुन्या मुखंडांनी बंदिस्त करून ठेवलेला बांध अखेर फुटला, तो प्रतिष्ठानचे कार्यवाह व ज्येष्ठ पत्रकार सुरेश भटेवरा यांनी तडकाफडकी दिलेल्या राजीनाम्यामुळे. धरण फुटावे तसे झाले. वर्षानुवर्षांची झाकपाक अचानकच उघडी पडली आणि ‘तात्यांचे प्रतिष्ठान’ म्हणून जुन्या प्रेमादरापोटी नाशिककरांनी धरलेली गुळणी अखेर सुटली. आरोप-प्रत्यारोपांचा महापूर आला. मात्र या उद्वेगाला कारण ठरलेले ‘सल्लागार’ महापुरात वाहून न जाता; प्रतिष्ठानच्या खुर्च्यांना चिकटून राहिल्याने नाशिककरांमध्ये सांस्कृतिक अस्वस्थता पसरली आहे.
समाजजीवनाचा सांस्कृतिक स्तर उंचावण्यासाठी आणि कुसुमाग्रजांच्या साहित्याचा प्रसार करण्याचे उद्दिष्ट आखत कुसुमाग्रजांच्या हयातीतच प्रतिष्ठानची उभारणी झाली. तात्यासाहेबांच्या निर्वाणानंतर मात्र प्रतिष्ठानची सूत्रे काही मोजक्या मुखंडांच्या हाती गेली आणि कालांतराने प्रतिष्ठानचे रूपांतर संस्थानात झाले.
विश्वस्ताचा कार्यकाळ हा पाच वर्षांचा असेल; त्याची फेरनिवडही होऊ शकते. मात्र दहा वर्षांपेक्षा अधिक काळ कुणालाही पद भूषविता येणार नाही, अशी प्रतिष्ठानच्या घटनेत तरतूद आहे. प्रतिष्ठानचा कारभार सध्या दोन माजी आमदार आणि एक उद्योगपती अशा तीन ‘सल्लागारां’च्या हाती एकवटलेला आहे. या तिघांनीही तात्यांनी घातलेली ‘अट’ कधीच ओलांडली आहे. ते म्हणतील त्याला मम म्हणणाऱ्यांची वर्णी विश्वस्तपदावर लागते. प्रतिष्ठानमधील या एकाधिकारशाहीला कार्यवाह सुरेश भटेवरा यांनी सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. त्यातून कानठळ्या बसविणारे आवाज झाले, हादरे बसले, परंतु मुखंड मात्र जागचे हललेले नाहीत.
‘विश्वस्त पदा’साठी कार्यवाहांनी सुचविलेल्या नावांना स्वयंघोषित सल्लागारसमर्थक तिघा विश्वस्तांनी विरोध केला. त्यावर चर्चा होण्यापूर्वीच कार्यवाहांनी राबविलेली निवडीची प्रक्रिया नियमबाह्य असल्याचा ठपका ठेवला गेला. कार्यवाहांनी स्वत:हून राजीनामा सुपूर्द करत प्रतिष्ठानमधून बाहेर पडणे पसंत केले. प्रतिष्ठानबद्दल साचून राहिलेल्या नाराजीचे धरण फुटले, ते या राजीनाम्यामुळे.
शेवटी प्रतिष्ठानचे अध्यक्ष वसंत डहाके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. कार्यवाहांचा राजीनामा स्वीकारून वर तीनही विश्वस्तांची प्रस्तावित नावे फेटाळली गेली. हे करताना सदर नावांना विरोध का झाला याचे स्पष्टीकरण कुणालाच देता आले नाही. या निमित्ताने प्रतिष्ठानमधल्या ‘बंद’, मनमानी कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली आणि नाशिककर संतापले. प्रतिष्ठानच्या कारभाराबद्दल आधी सगळ्यांनीच धरलेले ‘मौन’ आता सुटले असून, अनेक प्रश्नांचे मोहोळ नाशिकच्या परिघात घोंगावत आहे.
संस्था मोठ्या होतात त्या तेथे झोकून देऊन काम करणाऱ्या माणसांमुळे. अलीकडे सामाजिक-सांस्कृतिक संस्थांमध्ये घुसलेले आत्मकेंद्री राजकारण, वर्चस्ववाद, मूळ उद्दिष्टांपासून घेतलेली फारकत यामुळे खऱ्या अर्थाने कार्यकर्ती मंडळी चार हात दूर राहणे पसंत करतात. कुसुमाग्रज प्रतिष्ठानही त्याला अपवाद नाही. इथल्या देखण्या परिसराला असलेला तात्यासाहेबांच्या मायेचा स्पर्श कधीच पुसला गेला आहे. तात्यांच्या जवळची मंडळी दुरावली, लेखक-कलावंतांची शहरातली नवी पिढी तर या वास्तूची पायरी चढायलाही नाखुश असते. ‘भाडे भरा आणि स्मारकात येऊन वाढदिवस साजरे करा, श्राद्ध-पक्ष-नाचगाणी करा’ असे आवतण आहे, पण रंगकर्मींना तालमींना जागा द्यावी, प्रयोगशील लेखक-कलावंतांच्या पाठीशी उभे राहावे हे प्रतिष्ठानमधल्या कुणाला सुचत नाही. कंपूबाजीतल्या ‘खुर्च्या’ उबवण्यात रस नसलेली जुनी-जाणती मंडळीही एकतर निवृत्त झाली किंवा दुरावली.
जेथे नाटक, संगीत, कला यांचा जागर व्हायला हवा, त्या कुसुमाग्रज स्मारकात मुंज, बारसे, दहावे-तेराव्याच्या जेवणावळी उठतात हे नाशिककरांना कधीही रुचले नाही. आता मात्र नाशिकचे सांस्कृतिक मौन सुटलेले दिसते. नाशिकमध्ये इतरही जुन्या काही संस्था आहेत. नाशिक सार्वजनिक वाचनालय काही वर्षांपूर्वी असेच गाळाने भरलेले, भांडणे-कोर्टकचेऱ्यांनी बुजबुजलेले होते. परंतु प्रा. दिलीप फडके यांच्या हाती सत्तासूत्रे येताच त्यांनी ‘तंटामुक्त सावाना’ हे उद्दिष्ट घेऊन कामास सुरुवात करताच ‘सावाना’त वेगाने साफसफाई झाली. सावानाला हे जमले; प्रतिष्ठानलाही जमेल! त्याकरिता संध्याकाळी खुर्च्या उबवणाऱ्या सल्लागारांऐवजी खुर्चीवरून खाली उतरून काम करणाऱ्या खमक्या कार्यकर्त्यांची गरज तेवढी आहे.
dhananjay.wakhare@lokmat.com