चीनमध्ये आता हलतोय पाळणा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 09:32 IST2025-01-21T09:11:32+5:302025-01-21T09:32:13+5:30
China: गेली कित्येक वर्षं चीन आपल्या देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी जीवतोड मेहनत घेतो आहे.

चीनमध्ये आता हलतोय पाळणा!
गेली कित्येक वर्षं चीन आपल्या देशाची लोकसंख्या वाढवण्यासाठी जीवतोड मेहनत घेतो आहे. मुलं जन्माला घालण्यासाठी जननक्षम तरुणाईला, विशेषत: तरुणींना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देणं, त्यांनी मुलांना जन्म द्यावा यासाठी लाखो रुपयांच्या आमिषासह त्यांना विविध सोयी-सवलती पुरवणं, त्यांची सर्वतोपरी काळजी घेणं, याशिवाय दाम्पत्यालाही प्रत्येक बाळाच्या जन्मागणिक अधिकाधिक सवलती देणं, त्यांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देणं, त्यांचा पगार वाढवणं, मूल झाल्यास, होणार असल्यास ते ज्या ठिकाणी कामाला जातात त्याठिकाणी त्यांना अधिकच्या सुट्या मंजूर करणं.. तरुण आणि तरुणींनी एकत्र यावं, त्यांच्यात मैत्री, प्रेम वाढावं, त्यांनी लग्न करावं आणि मुलं जन्माला घालावीत यासाठी चीननं अक्षरश: एकही उपाय शिल्लक ठेवला नाही.
साम, दाम, दंड, भेद.. हे सारे प्रकार त्यांनी वापरून पाहिले. जे तरुण लग्न करणार नाहीत, जी दाम्पत्यं मूल जन्माला घालणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारून झाला, त्यांच्या सोयी-सवलती कमी करून झाल्या, कधी प्रेमानं, कधी रागावून, कधी चुचकारून, कधी पैशांचं आमीष दाखवून, कधी दडपशाही करून, कधी धमकावून, तर कधी अगदीच मोकळं सोडून त्यांनी मुलांना जन्म द्यावा यासाठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष ‘जबरदस्ती’ करून झाली. पण, इतक्या वर्षांत चीन सरकारच्या कोणत्याच दडपशाहीला आणि कोणत्याच मार्गाला चिनी तरुणाईनं भीक घातली नाही. त्यांनी ना लग्नाला तयारी दाखवली, ना मूल जन्माला घालण्यात कुठला रस दाखवला, पण चिनी तरुणाईनं या प्रकाराला जितका नकार दिला, तितकंच चिनी सरकारही हटून बसलं. त्यांनी आपले प्रयत्न सोडले नाहीत. त्याची फळं त्यांना आता हळूहळू दिसायला लागली आहेत.
त्याचाच परिणाम म्हणून आता चीनमध्ये काही ठिकाणी जन्मदर चक्क वाढतो आहे. त्यातलंच एक प्रमुख ठिकाण म्हणजे हुबेई प्रांतातलं तिआनमेन शहर. २०२३च्या तुलनेत २०२४ मध्ये इथे चक्क १०५० बाळं अधिक जन्माला आली आहेत. या घटनेमुळे चीन सरकारला जणू हर्षवायू झाला आहे. इतक्या वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांना पहिल्यांदाच हे यश दिसलं असल्यानं त्यांनी आनंदोत्सव साजरा केला आहे.
तज्ज्ञांचं म्हणणं आहे, चीनच्या अथक प्रयत्नांचंच हे फळ आहे. कितीही कठीण प्रसंग आला, तरीही ते मागे हटले नाहीत, उलट वेळोवेळी त्यांनी आपली धोरणं बदलली, लवचिक होत वेगवेगळ्या योजना राबवल्या. याच योजनांना तरुणाई अखेर भुलली आणि त्यांचं काही प्रमाणात का होईना मतपरिवर्तन झालं. मुलांना जन्म देण्यासाठी सरकारनं जसं उदारीकरणाचं धोरण अवलंबलं, तसंच सरकारच्या या नीतीला पाठिंबा देण्यासाठी चीनमधल्या अनेक कंपन्याही पुढे आल्या आणि त्यांनीही त्याला हातभार लावला. अर्थात त्यांनाही आपल्या कंपनीच्या कामासाठी तरुण कर्मचाऱ्यांची आवश्यकता होतीच. भविष्यात का होईना आपल्याला त्यात यश येईल, या उद्देशानं त्यांनी कामाला सुरुवात केली. आजही अनेक कंपन्या ज्या कर्मचाऱ्यांना मूल होईल, त्यांचा पगार वाढवतात, बक्षीस म्हणून लाखो रुपये देतात. एक्सपेंग ही इलेक्ट्रिक वाहन कंपनी ज्या कर्मचाऱ्यांना तिसरं मूल होईल त्यांना ३०,००० युआन (सुमारे ३.५३ लाख रुपये) देते. अशा अनेक कंपन्या चीनमध्ये आहेत..