विशेष लेख: ठाणे, मुंबई महापालिकेने बाउन्सरसाठी अनुदान द्यावे

By अतुल कुलकर्णी | Updated: April 7, 2025 07:54 IST2025-04-07T07:52:58+5:302025-04-07T07:54:28+5:30

मुंबई, ठाण्याच्या महापालिकेने या विषयाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. पायलट प्रोजेक्ट म्हणून हा प्रकल्प सगळीकडे राबवला पाहिजे.

Thane Mumbai Municipal Corporation should provide subsidy for bouncers | विशेष लेख: ठाणे, मुंबई महापालिकेने बाउन्सरसाठी अनुदान द्यावे

विशेष लेख: ठाणे, मुंबई महापालिकेने बाउन्सरसाठी अनुदान द्यावे

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई |

कांदिवली पश्चिममधील महावीरनगर येथे पंचशील हाइट्स सोसायटीने हाइटच केली. इतके दिवस जे महापालिकेला जमले नाही, ते या सोसायटीने चुटकीसरशी करून दाखवले. खरे तर महापालिकेने या सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईतील अतिक्रमणे हटविण्यासाठी सल्लागार म्हणून नेमले पाहिजे. मुंबई, ठाण्यातील प्रत्येक सोसायटीला या योजनेसाठी महापालिकेने विशेष अनुदान दिले पाहिजे. या सोसायटीसारखे काम केल्यामुळे अनेक फायदे होतील.

कांदिवलीच्या पंचशील हाइट्स सोसायटीने असे केले तरी काय? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. या सोसायटीच्या समोरील फुटपाथवर बेकायदा फेरीवाल्यांचा विळखा होता. वारंवार सांगूनही पालिका वॉर्ड ऑफिसरला किंवा अतिक्रमणविरोधी पथकांना अशा फुटकळ गोष्टींकडे लक्ष द्यायला बिलकुल वेळ नव्हता. ‘तुमचा प्रश्न तुम्हीच सोडवा...’ असे कदाचित तिथल्या वॉर्ड ऑफिसरने सांगितले असावे. या सोसायटीच्या परिसरातील फुटपाथ फेरीवाल्यांनी बळकावले होते. बिचारे रहिवासी जीव मुठीत घेऊन कसेबसे चालायचे. पालिकेकडे तक्रार केली की, अतिक्रमणविरोधी पथक यायचे. लगेच फेरीवाले पळून जायचे. पथकाने तरी किती वेळा चकरा मारायच्या? त्यांना दुसरी कामे नाहीत की काय? त्यामुळे सोसायटीची तक्रार आली की ते ऐकून न ऐकल्यासारखे करू लागले. अखेर सोसायटीने हट्टे-कट्टे दहा-पाच बाउन्सर सोसायटीच्या बाहेर उभे केले. फेरीवाले आले की बाउन्सर त्यांचा समाचार घेऊ लागले. यामुळे महापालिकेचा खर्च वाचला. अतिक्रमण पथकाचे जाणे-येणे वाचले... पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचला... अतिक्रमण हटवल्याच्या नोंदी करण्यासाठी जाणारा वेळ, कागद, शाई सगळं काही वाचलं..! 

तेव्हा मुंबई, ठाण्याच्या महापालिकेने या विषयाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. पायलट प्रोजेक्ट म्हणून हा प्रकल्प सगळीकडे राबवला पाहिजे. ज्या सोसायटी बाउन्सर नेमतील व त्यांच्या इमारतींसमोर फुटपाथवरचे अतिक्रमण काढतील, त्यांना सानुग्रह अनुदान देणे, जी सोसायटी सगळ्यांत जास्त अतिक्रमणे दूर करील तिचा शिवाजी पार्कवर जाहीर सत्कार, सगळ्यांत जास्त फेरीवाल्यांना ठोकून काढणाऱ्या बाउन्सर्सना ‘पालिका भूषण’ पुरस्कार, सकाळी सात ते रात्री नऊ या वेळेत काम करणाऱ्या बाउन्सर्सना निश्चित मानधन, यापेक्षा जास्त वेळ काम करणाऱ्यांना एक्स्ट्रा बोनस याची एक नियमावली महापालिकेने तयार केली पाहिजे. राहिला प्रश्न कायदा मोडण्याचा, तर फुटपाथवर अतिक्रमण करणाऱ्यांनी मुंबईत कायद्याची ऐशीतैशी केलीच आहे. त्यापेक्षा हा गुन्हा कमी प्रतीचा असेल, असा कायदा केला पाहिजे. असे गुन्हे करणाऱ्यांची आम्हाला गरज आहे, अशी जाहिरातही पालिकेने द्यायला हरकत नाही. शेवटी हे बाउन्सर्स शहर स्वच्छ करण्याचे, पर्यायाने महापालिकेचेच काम करत आहेत. 
पंचशील सोसायटीत ३०० फ्लॅट आहेत. एक हजार लोक तिथे राहतात. त्यांनी १२ बाउन्सर्स नेमले. या निकषावर कोणत्या सोसायटीला किती बाउन्सर्स लागतील, त्यांचा खर्च किती येईल? याविषयीची नियमावलीही पालिकेने करावी. सगळ्या महाराष्ट्राला ती ‘आदर्श नियमावली’ म्हणून पाठवावी. यामुळे रोजगारनिर्मिती होईल. बाउन्सर्स व्हायचे म्हणून लोक तब्येतीकडे लक्ष देतील. जिम, योगा जॉइन करतील. लोकांचे आरोग्य सुधारेल. त्यामुळे महापालिकेचा आरोग्यावरचा खर्च कमी होईल. सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे पोलिस आणि प्रशासनावरचा अतिक्रमण हटवण्याचा ताण कितीतरी कमी होईल. ‘कल्पना एक - आविष्कार अनेक’ ही स्पर्धा बंद झाली असली तरी, महापालिकेने आता या कल्पनेचा विस्तार करायला हरकत नाही.

महापालिका असेही करू शकते..!

मलबार हिल येथे  हँगिंग गार्डनजवळ असणाऱ्या उद्यानात महापालिकेने निसर्ग उन्नत मार्ग तयार केला आहे. म्हणजे वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज ऐकत आजूबाजूच्या झाडीतून निसर्गाच्या सान्निध्यात एक मॉर्निंग वॉक घ्यायचा. सिंगापूर येथे ट्री टॉप व ही संकल्पना राबवली जाते, त्याच्याशी साधर्म्य असणारा या ‘निसर्ग उन्नत मार्गा’ला ‘एलिव्हेटेड  फॉरेस्ट वॉक वे’ म्हणतात. अतिशय उत्तम कल्पना महापालिकेने राबवली. ४८५ मीटर लांब आणि २.४ मीटर रुंदी असणारा लाकडाचा बनवलेला हा  पूल मुंबईकरांचे आकर्षण बनेल याविषयी दुमत नाही. महापालिका सगळ्याच गोष्टी वाईट करते असे नाही. काही चांगलेही प्रयोग महापालिका करते. विद्यमान आयुक्त भूषण गगराणी यांना प्रसिद्धीची हाैस नाही; त्यामुळे ‘मी केले,’ असे सांगत ते फिरत नाहीत. 

भक्कम पायाभरणीसह (पाइल फाउंडेशन) पोलादी जोडणीचा आधारही या बांधकामाला देण्यात आला आहे. लाकडी कठडा (रेलिंग), दुतर्फा आधार देणारे खांब आणि लाकडी जोडणी, आकर्षक स्वरूपाची प्रकाशव्यवस्था येथे आहे. पहाटे पाच ते रात्री नऊपर्यंत हा मार्ग खुला आहे. यासाठी २५ रुपये प्रवेश शुल्क आहे. ऑनलाइन तिकिटाची सोय आहे. एकाच वेळी २०० लोक एक तासासाठी या चालण्याचा आनंद घेऊ शकतात. मुंबईच्या समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवणाऱ्या १०० हून अधिक वनस्पतींसह निरनिराळे पक्षी न्याहाळण्याची संधी येथे उपलब्ध झाली आहे. वनस्पतींमध्ये गुलमोहर, बदाम, जांभूळ, कांचन, ताड, फणस, रतन गुंज, सीता, अशोक, अर्जुन, मुचकुंद, सप्तपर्णी, करमळ, विलायती, शिरीष, आदी प्रजातींचा समावेश आहे. 

पक्ष्यांमध्ये कोकीळ, ताडपाकोळी, घार, भारतीय राखी धनेश, खंड्या, तांबट, टोपीवाला पारवा / पोपट, हळद्या, नाचण/नाचरा/नर्तक, कावळा, शिंपी चिमणी, बुलबुल, लालबुड्या बुलबुल, साळुंकी, दयाळ, चिमुकला फुलटोचा, जांभळ्या पाठचा सूर्यपक्षी, शुभ्रकंठी, ठिपकेवाली मनोली, आदी पक्षी पाहण्याची संधीदेखील मिळत आहे. महापालिकेने या कामाची मोठी प्रसिद्धी केली पाहिजे. मुंबईत अनेक ठिकाणी असे छोटे-छोटे उपक्रम राबवून मुंबईकरांचा ‘हॅपी इंडेक्स’ वाढवणे सहजशक्य आहे. त्यासाठीची इच्छाशक्ती हा प्रकल्प उभा करून आयुक्तांनी दाखवली आहे. त्यासाठी त्यांचे अभिनंदन....!

Web Title: Thane Mumbai Municipal Corporation should provide subsidy for bouncers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.