प्रबोधनाची भयानक कमतरता
By Admin | Updated: January 3, 2015 22:27 IST2015-01-03T22:27:36+5:302015-01-03T22:27:36+5:30
स्तव:च्या सुखासाठी जन्मदात्या आईस जिवंतपणी बळी देण्याचा उघडकीस आलेला प्रकार अंगावर शहारे आणणारा.

प्रबोधनाची भयानक कमतरता
स्तव:च्या सुखासाठी जन्मदात्या आईस जिवंतपणी बळी देण्याचा उघडकीस आलेला प्रकार अंगावर शहारे आणणारा. ही बातमी व त्यासंबंधीचा तपशील वाचल्यानंतर मला पहिल्यांदा प्रकर्षाने जाणवले ते असे, की आपल्या समाजातील मूल्यांची घसरण किती घाणेरड्या पातळीपर्यंत झाली आहे. आजवर जन्मदात्या आईची महती गाणाऱ्या कथा, कविता, कादंबऱ्या, नाटके, पुराणे, कीर्तने ऐकून आईसंबंधीची जी उदात्त भावना मनात जागृत होते, तिला मुळापासून हादरा बसला. ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ ही ओळ आठवली. ‘देवाला आई नाही आणि आम्हाला आई आहे’ या अति उदात्त भावना सांगणाऱ्या ओळी या घटनेने कुचकामी ठरल्या आहेत.
चंगळवादाने व चंगळ करायला मिळेल या अपेक्षेने मनुष्य किती हीन झाला, हे समजल्यावर एकप्रकारची उद्विग्नता आणि हा समाज कसा सावरणार, असे एक प्रचंड मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. समाजातील मूल्यहीनतेबद्दल वाटणारी चिंता अधिक जोरकसपणे त्रास देऊन गेली.
थोडे थांबून विचार केल्यानंतर हे जाणवले की नुसती चिंता करून काय होणार..? संत कबीर याने सांगून ठेवले आहे की, ‘चिंतासे चतुराई घटें...’ समाजाच्या अशा अवस्थेत जास्त चतुराईची गरज आहे. ही घटना पाहून समाजातील अघोरी प्रथा व अंधश्रद्धाविरोधी अति कठोर कायद्याची किती गरज आहे, हे आणखी एकदा अधोरेखित झाले.
कुणीतरी ‘बच्ची बाई’ नावाची मांत्रिक देऊळ बांधण्यासाठी सात महिलांचा बळी देण्याचे ठरवून लोकांना फसवते व सुखप्राप्तीच्या आशेने स्वत:ची आई, बहीण आणि मावशी यांना कुणीतरी मांत्रिक बाई, त्या चेटकिणी आहेत, त्यांचा बळी दिल्याशिवाय तुमच्या घरात सुख नांदणार नाही, असे सांगते काय आणि हा कुणी दशरथ त्यांना बळी देण्याच्या दृष्टीने कामाला लागतो काय, हे सारेच महाभयानक आहे़ अशा अघोरी प्रथेविरुद्ध कठोर कायदा हवा, हे निर्विवादच आहे़ परंतु तो कायदा व्हावा, यासाठी तब्बल एक तप संघर्ष करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना त्यासाठी स्वत:चे बलिदान द्यावे लागले. त्यांची जिवंतपणी तथाकथित धर्माभिमानींनी कुचेष्ठा केली. अशा प्रकारांना आळा घालणाऱ्या कायद्याच्या मागणीची कुचेष्टा केली़ अखेरीस त्यांचा खून करण्यात आला. त्यानंतरच असा कायदा झाला. आता तरी दाभोलकरांची कुचेष्टा करणाऱ्यांनी आपले चुकले होते हे मान्य करावे व या अनैतिक व्यवहाराच्या विरुद्ध जे कोणी उभे राहताहेत त्यांना बळ द्यावे.
तथापि हा केवळ कायद्याचा मुद्दा नाही. एकूणच समाजातच मूल्यासंबंधीच्या प्रबोधनाची किती भयानक कमतरता आहे, हे या निमित्ताने जाणवले.
महाराष्ट्र पुरोगामी आहे, असे म्हणणे सर्वांनी त्वरित थांबविले पाहिजे आणि महाराष्ट्राला पुरोगामी करण्याच्या कार्यासाठी व्यापक व सखोल प्रबोधनाचे कार्य चिकाटीने करीत राहिले पाहिजे. एवढे जरी या निमित्ताने महाराष्ट्रातील शहाण्यांना कळाले तरी अशा अनेक घटना आपण नक्कीच रोखू शकू.
तत्त्वज्ञानहीनता ही मूल्यहीनतेचा पाया आहे. कुणालाही कोणतेच तत्त्वज्ञान नको आहे. विद्यापीठ व महाविद्यालयांतील तत्त्वज्ञानाचे वर्ग बंद पडत आहेत. प्रगत-अतिप्रगत तंत्रज्ञान हेच समाजाचे सर्व प्रश्न सोडवेल, असे सिद्धांत मांडले जात आहेत. केंद्र सरकारने नेमलेल्या उच्चशिक्षणात काय शिकवावे, यासंबंधी शिफारस करण्यास बिर्ला-अंबानी या दोन नफेखोर भांडवलदारांची कमिटी नेमली होती. तिने कोणतेही समाजशास्त्र किंवा मानव्यशास्त्रे शिकवूच नयेत, अशी शिफारस केली. ती माणसाचा सारासार विवेक मारून टाकणारी आहे. एकदा विचार व विवेक मारला की लोकांना अंधश्रद्धाळू बनविणे सोपे.
-गोविंद पानसरे
ज्येष्ठ विचारवंत