Telemedicine facilities needed in changing times! | बदलत्या काळातील गरज टेलीमेडिसीन सुविधा!

बदलत्या काळातील गरज टेलीमेडिसीन सुविधा!

डॉ. दीपक कुलकर्णी । त्वचारोग तज्ज्ञ, पनवेल
माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गेल्या २० वर्षांत आमूलाग्र बदल झाले आहेत. संगणकीकरण, इंटरनेट, मोबाईल फोन, समाजमाध्यमे व ई-कॉमर्समुळे आयुष्य फार सुलभ झाले आहे. त्यांच्या एकत्रित वापरामुळे आपण संगणक अथवा मोबाईलवरून बँक व्यवहार, ओला उबरची नोंदणी, गुगल मॅपद्वारे पत्ता शोधणे, इ. अनेक कामे लीलया करू शकतो.


माहिती तंत्रज्ञानातील प्रगतीचा वैद्यकीय सल्ल्यासाठी वापर का होत नाही, असा प्रश्न पडतो. एखाद्या गावातील रुग्णाला शहरातील तज्ज्ञांचा सल्ला घरबसल्या मिळाला तर किती सोयीचे होईल? वास्तविक पाहता रोग झालेल्या जागेचा फोटो अथवा एक्स रे, एउॠचा फोटो पाहून, तसेच रुग्णाशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधून निदान करणे शक्य असते. त्यासाठी फारच साधे माहिती तंत्रज्ञान लागते; पण अशा टेलीमेडिसीन सुविधेचा वापर आजवर भारतात तरी होत नव्हता. (मराठीत याला ‘दूरचिकित्सा’ म्हणूया.)


या परिस्थितीला कारणे दोन. एकतर वैद्यकीय सल्ला देणे तांत्रिकदृष्ट्या अवघड व जबाबदारीचे काम असते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे टेलीमेडिसीनला आजवर भारतात कायद्याने परवानगी दिली नव्हती. कोर्टा$ने मध्यंतरी दिलेल्या काही निकालांमुळे कायदेशीर मान्यता नसल्याची वैद्यकीय संघटनांना जाणीव झाली व त्यांनी डॉक्टरांना असा सल्ला देणे टाळण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे सुयोग्य तंत्रज्ञान उपलब्ध असतानाही दूरचिकित्सा भारतात आजवर मूळ धरू शकली नाही; परंतु ‘कोविड १९’ साथीच्या दरम्यान संचारबंदीमुळे रुग्णांची अडचण लक्षात घेऊन मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया व नीती आयोगाने मार्चमध्ये दूरचिकित्सेसाठीची मार्गदर्शक तत्त्वे बनवून कायदेशीर पाया रचला व या मार्गातील अडसर दूर केला. विशेष म्हणजे ही सुविधा कायमस्वरूपी राहणार आहे. या मार्गदर्शक तत्त्वाच्या आधारे डॉक्टर व्हिडिओ कॉल, ई-मेल, साधा फोन अशा माध्यमांद्वारे देशातील रुग्णांना सल्ला देऊ शकतात.


दूरचिकित्सेचा इतिहास दीडशे वर्षांचा. अमेरिकन यादवी युद्धावेळी तज्ज्ञ सल्ल्यासाठी टेलीग्रामचा वापर केल्याचा उल्लेख आढळतो. ब्रिटनमध्ये बालरोग तज्ज्ञाने फोनवरून निदान करून बाळाचा जीव वाचविल्याची घटना १८७९च्या ‘ळँी छंल्लूी३’ या वैद्यकीय नियतकालिकात नोंदली आहे. त्यानंतर फोन, सीसीटीव्ही व इंटरनेटचा वापर रुग्णसेवेसाठी चालू झाला. दूरचिकित्सेचे अनेक फायदे आहेत. ग्रामीण व दुर्गम भागात उच्च दर्जाची सेवा पुरविणे तसेच पूर, युद्धस्थिती, महामारी अशा संकटांवेळी रुग्णसेवा पुरविणे सोपे होईल. विशेष करून कोविड साथीदरम्यान परस्पर संसर्गाचा धोका रुग्ण व आरोग्य कर्मचाऱ्यांना होणार नाही. लहान मुले तसेच वयोवृद्धांना छोट्या-मोठ्या त्रासावर दवाखान्यात आणावे लागणार नाही. तेथील प्रतीक्षाही कमी होईल. क्लिनिकच्या वेळेनंतरही डॉक्टरांचा सल्ला उपलब्ध होऊ शकेल. होम व्हिजिटकरिता वा शिबिरासाठी कनिष्ठ डॉक्टरांना पाठवून ते त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे परामर्श देऊ शकतील. देशातील जाणकार वैद्यकीय तज्ज्ञ सर्व ठिकाणच्या रुग्णांना सल्ल्यासाठी उपलब्ध होतील. त्वचारोग तज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ यांना या सुविधा त्यांच्या व्यवसायात उपयुक्त ठरेल. दुर्गम भागातील रुग्णांना हे वरदानच ठरेल; परंतु त्यातील काही आव्हानांचाही विचार करावा लागेल.
दूरचिकित्सेत प्रत्यक्ष तपासणी शक्य नसल्याने अचूक निदानाच्या क्षमतेत बाधा येऊ शकते. प्रत्यक्ष भेट नसल्याने डॉक्टर-रुग्ण नाते तयार होण्यात अडचण येऊ शकते. प्रत्यक्ष तपासणी शक्य नसल्याने शल्यचिकित्सक, प्रसूतितज्ज्ञांना या सुविधेचा पुरेसा फायदा घेता येणार नाही. तंत्रसाधनांच्या अभावामुळे खेड्यातील रुग्णांना याचा वापर करणे कदाचित अवघड जाऊ शकेल. सरकारी मार्गदर्शिकेत दूरचिकित्सा पद्धत विस्तृतपणे सांगितलीय. प्रथम रुग्णाला डॉक्टर वा रुग्णालयाच्या संकेतस्थळावर किंवा अ‍ॅपवर जाऊन स्वत:ची ओळख कऊच्या साहाय्याने पटवावी लागेल व दूरचिकित्सेच्या अंगभूत मर्यादा मान्य असल्याच्या संमतीपत्रावर स्वाक्षरी करावी लागेल. रुग्ण स्वत: अथवा आरोग्य सहाय्यकाच्या, तसेच फॅमिली डॉक्टरांमार्फतही सल्ला घेऊ शकतो. फक्त त्याचे संमतीपत्र वेगळे असेल. त्यानंतर रुग्ण त्याच्या रोगाचे फोटो, तक्रारींचा तपशील, पूर्वीच्या तपासणीचे रिपोर्ट अपलोड करेल.


डॉक्टर या माहितीचे विश्लेषण करतील व रुग्णाच्या त्रासावर दूरचिकित्सेद्वारे सल्ला देणे शक्य आहे का, हे कळवतील. होकार असल्यास रुग्ण तपासणीशुल्क आॅनलाईन भरून पूर्वनोंदणी करेल. नंतर डॉक्टर रुग्णाशी योग्य त्या माध्यमाचा वापर करून संवाद साधतील. योग्य रोगनिदानानंतर औषधयोजना करून प्रिस्क्रिप्शनचा फोटो रुग्णाला पाठविला जाईल. काही तपासण्यांचाही सल्ला देतील. रुग्णास तत्काळ आॅनलाईन सल्ल्याची आवश्यकता असेल तर त्याचेही नियम या मार्गदर्शिकेत आहेत. दूरचिकित्सेसाठी डॉक्टरांना आॅनलाईन प्रशिक्षण घ्यावे लागेल; परंतु सद्य:परिस्थितीत शासन त्याची व्यवस्था करू शकले नाही. ‘कोविड’च्या आणीबाणीच्या परिस्थितीत दूरचिकित्सेचा वापर व्हॉट्सअ‍ॅप व मेलद्वारे होऊ लागलाय व त्याला चांगला प्रतिसाद आहे. साथीचा प्रभाव कमी झाल्यानंतर रुग्ण त्याचा वापर चालू ठेवतील वा डॉक्टरांची भेट घेण्याची पद्धत अनुसरतील हे काळच सांगेल. मेडिकल कौन्सिल व नीती आयोगाने घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमामुळे भारतातील रुग्णसेवेत नवे दालन उघडले गेले आहे हे नक्की. त्याबद्दल या संस्थांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच.

Web Title: Telemedicine facilities needed in changing times!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.