उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अभिनेता सुनील शेट्टी सुनावतो, तेव्हा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 11:18 IST2023-01-10T11:18:44+5:302023-01-10T11:18:58+5:30

सिनेमा एका नट-नटीचा नसतो. प्रत्येक जाती-धर्माचे कित्येक लोक काम करतात. सिनेमांवर बंदी घालून काय मिळवणार आहात, असा थेट सवाल सुनील शेट्टीने केला!

Sunil Shetty, the famous actor of Hindi cinema, spoke in front of Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath. | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अभिनेता सुनील शेट्टी सुनावतो, तेव्हा...

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अभिनेता सुनील शेट्टी सुनावतो, तेव्हा...

- अतुल कुलकर्णी

‘मन तडपत हरी दर्शन को आज..’ हे अजरामर भजन. गीतकार शकील बदायुनी, संगीतकार नौशाद, गायक मोहम्मद रफी ! ‘इन्साफ का मंदिर है, ये भगवान का घर है’.. गायक मोहम्मद रफी, संगीतकार नौशाद, गीतकार शकील, अभिनेता दिलीप कुमार, निर्माता दिग्दर्शक मेहबूब खान ! - हे सगळे कलावंत लोक धर्माने मुस्लीम होते. त्यांच्या मनात ही गाणी करताना चुकुनतरी धर्माचा विचार आला असणे शक्य आहे का? भारतीय चित्रपटसृष्टी ही अशी ऐक्याची महती सांगणारी आहे. मात्र हल्ली हे ऐक्यच धोक्यात आले आहे. त्यामुळे चित्रपटसृष्टीचीच नाही तर देशाची जगभरात बदनामी होत आहे. ‘बॉयकॉट बॉलिवूड’ असा हॅशटॅग करून अमुक अभिनेत्यांचे चित्रपट बघू नका, असे सांगत वादंग निर्माण करण्याने संपूर्ण इंडस्ट्री अडचणीत आली आहे.

एकीकडे राजकोटमध्ये सोहिल बलूज हा मुस्लीम गायक, पाकिस्तानी तबलावादक वाजिद अली यांना घेऊन शिवभजन तयार करतो, तर दुसरीकडे इंडियन आयडॉलमध्ये गाणारी फरमानी नाज ही मुस्लीम मुलगी हर हर शंभो हे भजन गायलं म्हणून तिच्याच समाजातून टीकेची धनी होते. लाल सिंग चढ्ढा, विक्रम वेधा, ब्रह्मास्त्र, रक्षा बंधन, लायगर, सम्राट पृथ्वीराज चौहान हे चित्रपटही बॉयकॉट बॉलिवूडचे बळी ठरले. या आधी भगव्या रंगाच्या बिकिनी पडद्यावर अनेकींनी घातल्या. मात्र शाहरुख खानच्या ‘पठाण’ सिनेमात दीपिकाने त्या रंगाची बिकिनी घातली, म्हणून गहजब सुरू झाला आहे. 

हिंदी चित्रपटसृष्टीतील ही सगळी खदखद अभिनेते सुनील शेट्टी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर बोलून दाखवली. उत्तर प्रदेशमध्ये जागतिक दर्जाची फिल्मसिटी उभारण्यासाठी मुंबईत आदित्यनाथ यांनी सिनेसृष्टीतल्या तमाम दिग्गजांची बैठक बोलावली होती. त्या बैठकीत सुनील शेट्टी या सगळ्यांचा आवाज बनला. इथे तुमच्याकडे कोणी जमीन, सबसिडी, घर मागेल; मला यातले काहीही नको. मात्र ‘बॉयकॉट बॉलिवूड’ हा ट्रेंड थांबवा. सिनेमा एका नट किंवा नटीचा नसतो. त्यामागे वेगवेगळ्या जाती-धर्माचे हजारो लोक काम करतात. त्यांचे संसार या इंडस्ट्रीवर उभे आहेत. सिनेमांना बंदी घालून काय मिळवणार आहात, असा थेट सवाल करत सुनील शेट्टीने, हजारो लोकांच्या मेहनतीवर पाणी टाकू नका, तुमचे पंतप्रधानांकडे वजन आहे, त्यांच्या लक्षात या गोष्टी आणून द्या. तुम्ही ते करू शकता.. अशी भावनिक सादही योगी आदित्यनाथ यांना घातली.  

शाहरुख खानने स्वदेश, फिर भी दिल है हिन्दुस्तानी, सलमानने बजरंगी भाईजान, आमिरने लगान, थ्री एडियटसारखे चित्रपट केले. सलमान दरवर्षी त्याच्या घरी गणपती बसवतो. गोरगरीब रुग्णांना  लाखोंची मदत करतो. आजही कोणाच्या घरी मंगलकार्य असले तर बिस्मिल्ला खान यांची शहनाई वाजते. झाकीर हुसेन यांचा तबला थिरकतो. भारतीय सिनेमा आपल्या देशाचा खूप मोठा ठेवा आहे. त्याला सामाजिक बदलाचा इतिहास आहे. आजच्या काळात ‘जाने भी दो यारो’सारखा सिनेमा आला असता तर लोकांनी दंगलीच केल्या असत्या, असे वाटण्याइतपत परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच हे थांबायला हवे. 

जाता जाता : 

मकाऊ येथे एका पुरस्कारासाठी अमिताभ बच्चन उपस्थित होते. तुमचे सिनेमे आमच्याकडे आणून इथे त्याचे मार्केटिंग का करता? असा प्रश्न  एका चिनी पत्रकाराने त्यांना विचारला. त्यावर अमिताभ यांनी उत्तर दिले, “अंधाऱ्या चित्रपटगृहात तुमच्या मागे पुढे, आजूबाजूला कोण बसले आहे हे तुम्हाला माहिती नसते. मात्र पडद्यावर दिसणाऱ्या एखाद्या दुःखद प्रसंगात तुम्हा सगळ्यांचे डोळे ओले होतात. विनोदी प्रसंगात तुम्ही सगळे हसता. त्यावेळी पाहणारे कोणत्या जाती-धर्माचे, कोणत्या रंगाचे आहेत हे तिथे महत्त्वाचे ठरत नाही. तिथे भावना महत्त्वाच्या ठरतात. जगातला कुठलाही सिनेमा याच भावना जपण्याचे काम करतो...” - या उत्तरानंतर उपस्थित पत्रकारांनी टाळ्यांच्या गजरात अमिताभला दाद दिली होती. आपण या भावना कधी जपणार आहोत... हा खरा प्रश्न आहे.

Web Title: Sunil Shetty, the famous actor of Hindi cinema, spoke in front of Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.