अशीही सौरऊर्जा

By Admin | Updated: November 4, 2014 02:02 IST2014-11-04T02:02:19+5:302014-11-04T02:02:19+5:30

अणुवीजनिर्मिती हा एक प्रदूषणविरहित पर्याय आपल्याला उपलब्ध आहे. परंतु हिरोशिमा आणि नागासाकीपायी तो बदनाम झाला आहे.

Such solar energy | अशीही सौरऊर्जा

अशीही सौरऊर्जा

डॉ. बाळ फोंडके
पत्रकार व विज्ञान लेखक

वीज किंवा ऊर्जा ही माणसाची प्राथमिक गरज झाली आहे. विजेचा वापर जगभरात वाढतोच आहे. विकसित जगाची गरज बहुतांश प्रमाणात भागलेली आहे. तरीही तिथंसुद्धा वीजनिर्मितीचे सगळेच पर्याय पर्यावरणप्रेमी नाहीत. फ्रान्स, जपान यांसारखे काही मूठभर देश सोडल्यास बहुतांश भागात अजूनही वीजनिर्मितीचा भार खनिज इंधनांवरच पडलेला आहे. साहजिकच या ज्वलनातून वायुप्रदूषण होतच आहे. त्यापायी धरतीचं तापमान वाढण्याचा आणि हवामान बदलाचा मुकाबला आपल्याला करावा लागतो आहे.
अणुवीजनिर्मिती हा एक प्रदूषणविरहित पर्याय आपल्याला उपलब्ध आहे. परंतु हिरोशिमा आणि नागासाकीपायी तो बदनाम झाला आहे. त्यातच तीन वर्षांपूर्वी फुकुशिमा इथं आलेल्या त्सुनामीनं जो धुमाकूळ घातला त्याची भर पडून लोकांच्या मनात अणुऊर्जेविषयी एक अढी तयार झाली आहे. भीती माणसाच्या विवेकबुद्धीवर घाला घालते. त्यामुळं फुकुशिमापोटी उद्भवलेल्या शंका अनाठायी आहेत, तिथं जो काही अपघात झाला तो एका अभूतपूर्व अस्मानी सुलतानीचा प्रताप होता, अणुवीजनिर्मितीच्या तंत्रज्ञानातील त्रुटींपायी ते अघटित घडलं नव्हतं,हे सोदाहरण आणि तर्कसंगतरीत्या सांगूनही लोकांच्या मनावरचं भीतीचं दडपण नाहीसं, होत नाही. त्यामुळंच मग अणुऊर्जेला असलेला विरोध मावळत नाही. त्यात राजकीय कुरघोडी करण्यासाठी काहीजण त्या भीतीचाच वापर करू पाहत आहेत. त्यामुळं तर मामला अधिकच पेचीदा झालेला आहे.
याला उपाय सौरऊर्जेचा, असं सांगण्यात येतं. सौरऊर्जेचा एक मार्ग म्हणजे सूर्यापासून येणाऱ्या प्रकाशाचं आणि उष्णतेचं विजेत रूपांतर करण्याचा आहे. पण सौरऊर्जेचा दुसराही एक अर्थ आहे. तो म्हणजे सूर्याच्या अंतरंगात ज्या नाभिकीय प्रक्रियांच्या परिणामी ऊर्जा उत्सर्जन होतं, त्याचा उपयोग वीजनिर्मितीसाठी करण्याचा आहे. आजवर जगात ज्या अणुभट्ट्या बांधल्या गेल्या आहेत आणि ज्या बांधल्या जाणार आहेत त्या सगळ्या अणुविभाजनाच्या प्रक्रियेवर आधारित आहेत. युरेनियम किंवा प्लुटोनियम यांसारख्या जडजंबाल अणूंचं विभाजन करून त्यात कोंडून पडलेली प्रचंड प्रमाणातली ऊर्जा मोकळी करण्याचा तो मार्ग आहे. अर्थात ते करताना काही प्रमाणात किरणोत्सर्ग होत असतो. पण तो आटोक्यात आणण्याच्या उपायांचा अंतर्भाव त्या तंत्रज्ञानातच केला गेलेला आहे. त्यामुळं सर्वसामान्य जनतेला त्यापासून कोणताही धोका नाही.
पण, अणुविभाजनाऐवजी सूर्याच्या अंतरंगात अणुमीलनावर आधारित भट्ट्या धडधडत असतात. हायड्रोजन या विश्वातील सर्वांत हलक्या मूलद्रव्याच्या अणूंचं मीलन घडवून त्यांच्या गर्भात अडकून पडलेल्या ऊर्जेला मुक्त करण्याचं काम या प्रक्रियांद्वारे केलं जातं. या प्रक्रियेत कोणत्याही किरणोत्सर्गी मूलद्रव्यांची निर्मिती होत नसल्यामुळं ते संपूर्ण निर्धोक आणि प्रदूषणमुक्त आहे. त्याची कास धरावी, असा आग्रह होत असला, तरी अजूनही ते तंत्रज्ञान हस्तगत करण्याच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही. अणुविभाजनापेक्षा अणुमीलनाची प्रक्रिया तितकी सहजसाध्य नाही. निदान अजूनतरी झालेली नाही. आजवर तसे प्रयत्न झालेच नाहीत, असं नाही. कितीतरी झाले आहेत. आपणही आदित्य असं बारसं झालेली अणुमीलनावर आधारित अणुभट्टी बांधण्याचे प्रयत्न गेली कित्येक वर्षं चालवले आहेत. पण त्याला यश लाभलेलं नाही.
म्हणूनच अमेरिकेतील एका खासगी संशोधनसंस्थेनं जो दावा केला आहे त्याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे. यू-ट्यूबवर उपलब्ध असलेल्या एका व्हिडिओफितीमार्फत संस्थेनं ही घोषणा केली आहे. त्यानुसार येत्या पाच वर्षांत एक छोटीशी आणि तंत्रज्ञानाची प्रचिती देणारी अणुभट्टी आपण बांधणार असून, पुढच्या दहा वर्षांमध्ये व्यापारी स्तरावर वीजनिर्मिती करण्याची क्षमता असलेली अणुभट्टी उभारणं शक्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
वैज्ञानिक जगतात यावरची प्रतिक्रिया संमिश्र स्वरूपाची आहे. काही जणांनी यावर साफ अविश्वास दाखवला आहे. आजवर असे दावे केले गेले आहेत आणि ते सगळेच फसवेही निघाले आहेत. तो अनुभव ध्यानात घेता ही प्रतिक्रिया रास्तच म्हणावी लागेल. परंतु, संशोधनाच्या बाबतीत सर्वत्र काळाकुट्ट अंधार दिसत असतानाच अकस्मात लख्ख उजेड पडावा अशा घटनाही विरळा नाहीत. ध्यानीमनी नसतानाच संपूर्ण ढाचाच बदलून टाकणारा शोध लागल्याच्या अनेक घटना इतिहासात पानोपानी आढळतात. त्यामुळं हा दावा तसा उपरणं झटकून टाकावं, तसा झटकून टाकणं अपरिपक्वतेचं लक्षण ठरेल.
इतक्या ठामपणे आणि निश्चित कालावधीचा दाखला देणारा दावा आजवर कोणी केला नव्हता, हेही ध्यानात घ्यायला हवं. म्हणूनच त्याबाबतीत आशा बाळगण्यासारखी परिस्थिती आहे. जर अपेक्षेनुसार या संशोधकांना अशी अणुमीलनावर आधारित अणुभट्टी बांधण्यात यश मिळालं, तर मात्र ऊर्जा निर्मितीचं क्षेत्र मुळापासून ढवळून निघेल, यात शंका नाही.

Web Title: Such solar energy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.