पेच वंचित बहुजन आघाडीच्या रणनीतीचा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 01:41 AM2019-02-16T01:41:42+5:302019-02-16T01:42:28+5:30

वंचित बहुजन व दोन्ही काँग्रेस अशा आघाडीच्या अंकगणितामध्ये डावपेच आणि रणनीतीचे पेचप्रसंग उभे राहिले आहेत. या आघाडीचे प्रमुख नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची रणनीती संघ-भाजपा आणि हिंदुत्व विरोधी आहे.

 The strategy of the vanchit bahujan aghadi | पेच वंचित बहुजन आघाडीच्या रणनीतीचा

पेच वंचित बहुजन आघाडीच्या रणनीतीचा

Next

- प्रकाश पवार
(ज्येष्ठ राजकीय अभ्यासक)

वंचित बहुजन व दोन्ही काँग्रेस अशा आघाडीच्या अंकगणितामध्ये डावपेच आणि रणनीतीचे पेचप्रसंग उभे राहिले आहेत. या आघाडीचे प्रमुख नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांची रणनीती संघ-भाजपा आणि हिंदुत्व विरोधी आहे. त्यामुळे दोन्ही काँग्रेस पक्षांशी जुळवून घेण्याची रणनीती आपोआपच स्पष्ट होत गेली. प्रत्यक्षात जुळवाजुळव करतानाचे डावपेच मात्र परस्परविरोधी टोकांचे दिसू लागले. अर्थातच रणनीती दूर पल्ल्याची आहे, तर डावपेच रणनीतीइतके दूर पल्ल्याचे नाहीत. तरीही अंकगणिताची जुळणी होत नाही. याची कारणे रणनीतीपेक्षा डावपेचामध्ये जास्त दिसतात.
भारिप-बहुजन महासंघाने किनवट आणि अकोला असे दोन प्रयोग आधी केले. त्या दोन्ही प्रयोगांमध्ये बहुजन ही संकल्पना वापरली. त्यांनी बहुजन संकल्पनेसोबत वंचित ही नवीन संकल्पना मांडण्यास सुरुवात केली. ही बहुजन संकल्पनेची नवी रणनीती म्हणता येईल. कारण सरसकट बहुजन याऐवजी वंचित बहुजन अशी धारणा आखीव-रेखीव दिसते. बहुजन व वंचित यांचे ऐक्य असा साधा-सोपा अर्थ होत नाही, तर वंचित बहुजनांचे ऐक्य हा रणनीतीचा अर्थ दिसतो. कोरेगाव भीमाच्या वादानंतर या ऐक्याचा प्रयोग सुरू झाला. सोलापूरच्या अधिवेशनानंतर औरंगाबाद येथे शक्तिप्रदर्शन केले गेले. यानंतर, या आघाडीच्या सामाजिक पायाचे मूलभूत घटक अनुसूचित जाती, ओबीसी, मुस्लीम असे तीन पुन्हा-पुन्हा मांडले गेले. अनेकदा भटके-विमुक्त, धनगर, माळी, कोळी असा तपशील दिला गेला. या रणनीतीचा एक आधार गंगाधर गाडे यांनी आॅल इंडिया मजलीस ए मुस्लिमीन या पक्षांच्या पाठिंब्यामुळे तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली हा दिसतो. मध्यंतरीच्या काळात ओबीसी आरक्षणाच्या संरक्षणासाठी बहुजनाची आंदोलने सुरू झाली.
राज्यघटनेवर आधारलेल्या संस्था आणि मूल्यांचा ºहास सुरू झाला, म्हणून राज्यघटना बचाव आंदोलने उभी राहिली. थोडक्यात, भाजपा विरोध, ओबीसी आरक्षणातील हस्तक्षेपाला विरोध, स्वातंत्र्यावरील हल्ल्यांना विरोध अशा आशयाचा ‘वंचित बहुजन समाज’ अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी कल्पिलेला दिसतो. या समूहाचे संख्याबळ हे अंकगणित आहे. त्यानुसार, दोन्ही काँग्रेस पक्षांचे बरेच नुकसान होईल, अशी अटकळ आहे. यामुळे दोन्ही काँग्रेस पक्षांकडून जास्तीतजास्त जागा मिळविण्याचा एक उद्देश वंचित आघाडीचा आहे. लोकसभेच्या ४८ पैकी १२ जागांची मागणी वंचित बहुजन आघाडीची आहे. या खेरीजच्या ३६ जागा दोन्ही काँग्रेसने लढविण्यास या आघाडीची सहमती राहिली आहे. याशिवाय धनगर, माळी, कोळी, मातंग यांना प्रत्येकी दोन जागा अशी उपवाटाघाटी दिसते. मुक्ता साळवे मातंग सत्तासंपादन एल्गार परिषदेत (अहमदनगर) शिर्डी व लातूरच्या जागावर आल्हाटांनी दावा केला होता. हे आघाडीचे सूत्र दोन्ही काँग्रेस पक्षांनी स्वीकारले नाही. याशिवाय घराणेशाही विरोधाचे तत्त्वही आघाडी मांडते. (राहुल गांधी-सुप्रिया सुळे) आघाडी वाटाघाटीमध्ये शरद पवारांच्याबद्दल दुहेरी भूमिका मांडते.
शरद पवार प्रतिगामी नाहीत, पण त्यांच्या काही भूमिका प्रतिगामी आहेत. हा सर्व तपशील डावपेचात्मक स्वरूपाचा दिसतो. महात्मा फुले पगडी आणि पेशवे पगडीपैकी फुले पगडीचे समर्थन केले गेले. या व्यूहरचनेचा भाग म्हणजे राहुल गांधी यांच्या जानवेधारी धारणेला विरोध केला. यामध्ये रणनीतीपेक्षा या गोष्टीचा समावेश आहे. कोल्हापूरच्या सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीने डावपेच व रणनीती जास्त धारदार केली. जवळपास पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर केले. या सर्व राजकीय घडामोडींमध्ये ओवेसी यांनी दोन्ही काँग्रेसला सतत विरोध केला.
दोन्ही बाजूच्या रणनीतीपेक्षा डावपेच हाच एक मोठा पेचप्रसंग म्हणून पुढे आला, तसेच वंचित बहुजन समूह एकसंध दिसत नाही. कारण गवई गट, जोगेंद्र कवाडे (पीपल्स रिपब्लिकन, आठवले गट व सुरेखा कुंभारे (रिपब्लिकन एकता मंच) यांना वंचित आघाडीने दूर ठेवले. वंचित बहुजन आघाडीला नेतृत्व अस्वाभिमानी वाटते. यामुळे गवई गट, जोगेंद्र कवाडे काँग्रेससोबत आणि आठवले गट व सुरेखा कुंभारे भाजपसोबत असे वंचितांच्या शक्तीचे विभाजन आहे. मुंबई-मराठवाडा येथे ओवेसींना सामाजिक आधार मिळाले आहेत, परंतु विदर्भात त्यांचे आधार दिसून आले नाहीत. विदर्भात वंचित आघाडीने दोन जागांची मागणी केली (अकोला, चंद्रपूर किंवा यवतमाळ). या विभागात अनुसूचित जाती, मुस्लीम आणि ओबीसी घटक प्रभावी ठरणारे आहेत, परंतु हे सामाजिक घटक वंचित आघाडीबरोबर फार कमी प्रमाणात आहेत. बहुजन समाज पक्षाला विदर्भात चांगला आधार आहे. त्यामुळे वंचित आघाडीची जुळवाजुळव दोन्ही काँग्रेसशी घडण्यात अशा सामाजिक अडचणी आहेत.
त्यामुळे दोन्ही काँग्रेस पक्षांना केवळ एका जागेपुरती मर्यादित जागा वाटपाची आघाडी करावयाची दिसते, तर वंचित आघाडी जवळपास बारा जागांचा दावा करते, हा खरा पेचप्रसंग आहे. दोन्ही काँग्रेसला पुन्हा उठून उभे राहण्यासाठी प्रकाश आंबेडकरांची मदत हवी आहे. हा पेचप्रसंग लक्षात घेऊन डावपेच म्हणून जास्त जागाचे लक्ष ठेवले गेले, तर दोन्ही काँग्रेस एका जागेच्या पुढे सरकत नाहीत. त्यामुळे दोन्ही काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या प्रयोगाची धुसरता दिसू लागली. अशा टोकदार डावपेचाचा फटका अर्थातच दोन्ही काँग्रेसबरोबर वंचित आघाडीला जास्त बसणार, असे चित्र दिसते.
 

Web Title:  The strategy of the vanchit bahujan aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.