इकोफ्रेंडली वाहतूक सुरू करायची!
By Admin | Updated: January 1, 2015 02:57 IST2015-01-01T02:57:13+5:302015-01-01T02:57:13+5:30
दररोज ३० कि़मी़ रस्ता बांधण्याचे नव्या वर्षातील आपले उद्दिष्ट आहे. पर्यावरण, इंधन बचत, आरोग्य जपण्यासाठी विकास व नावीन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी या पातळीवर विचार केला तेव्हा उत्तर मिळाले,

इकोफ्रेंडली वाहतूक सुरू करायची!
दररोज ३० कि़मी़ रस्ता बांधण्याचे नव्या वर्षातील आपले उद्दिष्ट आहे. पर्यावरण, इंधन बचत, आरोग्य जपण्यासाठी विकास व नावीन्यपूर्ण योजनांची अंमलबजावणी या पातळीवर विचार केला तेव्हा उत्तर मिळाले, नव्या वर्षीचा संकल्प ठरला-‘इकोफ्रेंडली वाहतूक, बायोइंधनाला प्राधान्य व जलवाहतूक सर्वौच्च पर्याय!’ ‘गडकरी एक ‘सक्सेस स्टोरी’ आहे. मी जे ठरवतो, ते करतो हेही होईलच!’
देशाला उत्तम पर्यावरणाची गरज आहे. वातावरणातील कार्बन डायआॅक्साइड कमी करण्यावर माझा भर आहे. नव्या वर्षात नवीन तंत्रज्ञान व नव्या इंधनाला ताकद देणार असून इलेक्ट्रिक, बायोडिझेल, बायोगॅस, इथेनॉलवर बसेस चालवण्याचा मानस आहे. १०० टक्के इथेनॉलवर चालणारी केनियाच्या कंपनीची एक बस नागपुरात धावते आहे. ही चाचणी यशस्वी झाली तर सार्वजनिक वाहतुकीचा उत्तम पर्याय उभा होईल. अलीकडेच लंडन प्रवासात मी इलेक्ट्रिकची बस पाहिली. ती हिंदुजांनी तयार केली आहे. हा पर्यायही उत्तम ठरू शकेल. इकोफ्रेंडली ‘ई-रिक्क्षा’ धावतेच आहे. तीन-चार महिन्यांत सर्व बाबी स्पष्ट होतील. नवीन तंत्रज्ञानाची सांगड घालत केलेल्या वाहतूक व वाहन क्षेत्रातील या बदलामुळे आॅटोमोबाइल क्षेत्रात नक्कीच ऊर्जा निर्माण होईल. ‘ई-टोल’ ही एक चांगली कल्पना प्रत्यक्षात आली आहे. त्यामुळे इंधनाची मोठी बचत होईल. नव्या वर्षात देशातील सर्वच राष्ट्रीय महामार्गांवरील टोल प्लाझांवर सुरू झालेला असेल व त्याचे नियंत्रण दिल्लीतील माझ्या कार्यालयातून होईल. यामुळे इंधन, इंजिन व वेळीची बचत होईल. जहाजबांधणी मंत्रालय दुर्लक्षित राहिले आहे. त्याकडे आव्हान म्हणून मी पाहतो. रस्त्याने प्रवास केला तर एका किलोमीटरसाठी दोन रुपये, रेल्वेने केला तर एक रुपये आणि पाण्यातून केला तर त्याच अंतरासाठी फक्त ५० पैसे खर्च येतो. शिवाय पर्यावरणाची कोणतीच हानी नाही. त्यामुळे जलवाहतुकीला माझे सर्वौच्च प्राधान्य आहे. मुंबईमध्ये सीप्लेनला आधीच परवानगी दिली आहे. पुढच्या काळात एअरपोर्टप्रमाणे आपण बसपोर्ट, सीपोर्ट व वॉटरपोर्ट विकसित करणार आहोत. निविदांची प्रक्रियाही पूर्ण होण्याच्या टप्प्यात आहे़ त्यामुळे नव्या वर्षात जलवाहतुकीने मैदान गाजवलेले असेल. मुंबईच्या नागरिकांना दिलासा देण्यास काही योजना आहेत. आॅस्ट्रेलियन कंपनी लाइटवेट अॅल्युमिनियम बोटी तयार करते. त्या मुंबईतील वाहतुकीस उपयुक्त ठरू शकतात. त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. महाराष्ट्राला मुंबईपासून गोवा तसेच वर गुजरातच्या सीमेपर्यंतच्या समुद्रकिनाऱ्याने वाहतुकीचे अनेक पेच सोपे केले आहेत. समुद्रकिनाऱ्याच्या या सीमावर्ती भागात शिप बिल्डिंग, शिप ब्रेकिंग, इनलँड वॉटरवेज, हॉवरक्राफ्टस्ट सी प्लेनस, वॉटर टर्मिनल्स उभे करून त्यांना रेल्वे लाइनने जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. नद्यांतून देशांतर्गत जलवाहतुकीसाठी २३ हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव तयार झाले.
(शब्दांकन : रघुनाथ पांडे)
मुंबई - गोवा रस्ता चौपदरी काँक्रीटचा करून, १४ फ्लायओव्हर्सची कामे सुरू केली आहेत. नवीन पुलांच्या निर्मितीमध्ये जलसिंचनासाठी बंधाऱ्यांची निर्मिती, मुंबईला समुद्राच्या आतून भुयारी रिंग रोड करण्याबाबत अभ्यास सध्या सुरू आहे. तो ४५ ते ५० हजार कोटींचा होईल.
अमरावतीपासून सूरतपर्यंतचा रस्ता ८ हजार कोटी खर्चून सिमेंट काँक्र ीटचा करणार आहे. त्याचबरोबर बोरखेडीपासून रत्नागिरीपर्यंत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात जाणारा ८ ते ९ हजार किलोमीटरचा चौपदरी काँक्र ीटचा रस्ता तसेच देहू व आळंदीपासून पंढरपूरपर्यंतचे आठ हजार कोटी रु पये खर्चून दोन पालखी मार्ग निर्माण करण्याचे निर्णय घेतले आहेत.
मुंबईतील मेट्रोपॉलिटन भागांमध्ये फेरी सर्व्हिस सुरू करण्याचे प्रयत्न करू. औरंगाबाद व वर्धा जिल्ह्यातील सिंदी येथे दोन ड्रायपोर्ट निश्चितपणे तयार होतील. नव्या वर्षात अनेक बदल दिसून येतील. रस्ते विकासाचे मार्ग असतात ते आपण यापूर्वी सिद्ध केले़ आता ते महामार्ग दिसून येईल.
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री