शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या विदर्भावरून महाविकास आघाडीत जुंपली; संजय राऊतांचा वार, विजय वडेट्टीवारांचा पलटवार
2
Lionel Messi: फुटबॉलचा 'GOAT' मेस्सीच्या ७० फूट उंच पुतळ्याचे व्हर्च्युअल अनावरण
3
भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा मॅच फिक्सिंगचं थैमान, या चार खेळांडूंना केलं, सस्पेंड, FIRही दाखल
4
१०० कोटींचं जेट, १०० कोटींचं घर... लियोनेल मेस्सीची नेटवर्थ किती? फुटबॉलचा जादूगार भारताच्या दौऱ्यावर
5
अरेरे! इन्स्टावरचं प्रेम पडलं महागात; बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी दिल्लीहून रायबरेलीला आली पण...
6
आलिशान घर, राईस मिल, पेट्रोल पंप... अधिकाऱ्याकडे सापडलं ४० लाखांसह कोट्यवधींचं घबाड
7
पुढील ३ वर्षांत २ IPO आणण्याची रिलायन्सची तयारी; पाहा काय आहे मुकेश अंबानींचा प्लॅन
8
"मला फक्त माझ्या मुलाची परीक्षा..."; रात्रभर ८०० किमी कार चालवणाऱ्या वडिलांची हृदयस्पर्शी गोष्ट
9
केरळमध्ये ३ महापालिकांच्या मतमोजणीत काँग्रेस आघाडीवर; तिरुवनंतपुरमला NDA आणि LDF मध्ये चुरस
10
एका गंभीर विषयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र; काय घडलं?
11
८५ लाख मतदारांच्या वडिलांच्या नावात गडबड, १३ लाख जणांचे आई-वडील एकच, बंगालमधील SIR मधून धक्कादायक माहिती समोर
12
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
13
Crime: प्रेयसीनं संबंध तोडल्यानं भडकला प्रियकर, घरात घुसून तिच्यावर झाडल्या गोळ्या!
14
अमेरिकेकडून भारतावर लावलेलं टॅरिफ हटवण्याची मागणी; शुल्काला थेट आव्हान, खासदारांनी संसदेत मांडला प्रस्ताव
15
शुक्र गोचर २०२५: वर्षाखेरिस 'या' ५ राशींना मिळणार धन, संपत्ती करिअरबाबत मोठी भेट
16
सफला एकादशी २०२५: सफला एकादशीचा गुप्त उपाय! कागदावर ३ इच्छा लिहा, २०२६ ला इच्छापूर्तीचा अनुभव घ्या!
17
Crime: "मला प्रेग्नंट कर नाही तर,..." हे ऐकताच प्रियकर भडकला; विवाहित प्रेयसीला कायमचं संपवलं
18
Food: भेसळयुक्त पनीर कसे ओळखाल? फक्त ४ मिनिटात घरी 'या' ४ सोप्या चाचण्या करून पाहा!
19
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
20
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

बाई फुकट रांधणार, स्वयंपाकाचे ठेके पुरुषांकडे!

By सुधीर लंके | Updated: March 7, 2023 07:33 IST

एरवी जी कामे बायका सहज आणि फुकट करतात; त्या कामातून पैसे मिळणार म्हणताच पोषण आहार शिजवण्यासकट सगळे ठेके पुरुषांकडे का?

सुधीर लंके, आवृत्ती प्रमुख, लोकमत अहमदनगर

‘द ग्रेट इंडियन किचन’ नावाचा सिनेमा आहे. या सिनेमात घरातील महिला दिवसरात्र भाज्या कापणे, तांदूळ निवडणे, पोळ्या लाटणे, भांडी धुणे व पुरुषांसमोर गरमागरम ताट वाढणे या कामांत कशी घामाघूम होते याचे चित्रण आहे. ही सगळी कामे उपसूनही तिला पुरुषांच्या नंतर जेवायला मिळते हे तर आणखी भयानक. शहरी व ग्रामीण भागांत हे चित्र आजही ठिकठिकाणी आहे. घरातील किचन, झाडलोट, धुणीभांडी या कामांत पुरुष डोकावायला तयार नाहीत. (काही पुरुष ही कामे करतात ते अपवाद). पण, ज्या किचनमधून पैसा मिळतो, ते किचन कुणाच्या ताब्यात आहे?-  ती मात्र पुरुषांनी बळकावली आहेत. 

याचे उदाहरण द्यावयाचे झाल्यास बहुतांश हॉटेलांतील किचनमध्ये पुरुष खानसामे असतात. तेथे गल्ल्यावर व वेटर म्हणून सुटाबुटातील पुरुष आहेत. तेथे महिला आहेत; पण त्या पुन्हा भाकरी थापणे, पोळ्या लाटणे किंवा भांडी धुण्यासाठी. निर्णयप्रक्रियेत किंवा महत्त्वाच्या स्थानी त्या नाहीत. याबाबत सातत्याने चर्चा होत असते, ते  एक सोडा!- पण आता तर अगदी शासनानेही आपले किचन पुरुष ठेकेदारांच्या हवाली केले आहे. याचे सर्वांत मोठे उदाहरण म्हणजे शाळांतील पोषण आहार योजना!. शालेय मुलांना आई घरातून डबा देते. पण जेव्हा शाळांमधील पोषण आहार शिजवायची वेळ येते तेव्हा ही ‘आई’ गायब होते आणि पुरुष ठेकेदार पुढे येतो. प्राथमिक व माध्यमिक शाळांतील पोषण आहारासाठी जिल्ह्यांच्या ठेकेदारांना शासन तांदूळ पुरविते. ठेकेदार हा तांदूळ शाळांना पोहोचवितात. बऱ्याचदा त्याचा दर्जा चांगला नसतो. तांदूळ कमी भरतो. शाळा स्थानिक महिलांमार्फत या तांदळापासून खिचडी शिजवितात. पण त्यांचा सहभाग फक्त शिजविण्यापुरता असतो. शहरी भागात तर महापालिकांनी नियुक्त केलेले ठेकेदारच शाळांमध्ये थेट खिचडी पोहोचवितात. यात महिलांना बाजूला ठेवले जाते. अंगणवाड्यांचाही कोरडा आहार शासनाचा ठेकेदारच गावोगावी पोहोचवितो. मग, अंगणवाडी मदतनीस अत्यंत तुटपुंज्या इंधन बिलात तो आहार शिजविते. वर्षानुवर्षे हे चालत आले आहे. ही नवीच पुरुषसत्ताक पद्धती आहे... आणि त्यामागे एक  अर्थशास्त्र आहे.

पोषण आहारावर शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च होतात. ठेकेदार हे ठेके कसे मिळवितात व ते कोण असतात हे सर्वश्रुत आहे. योजना मुलांसाठी आहे की, ठेकेदारांसाठी, हा प्रश्नही बऱ्याचदा विचारला जातो. वास्तविकत: हे काम महिला बचत गटांमार्फत करता येेईल. शाळांतील प्रत्येक मुलामागे केंद्र व राज्य शासनाने  गावागावांतील बचत गटांना थेट अनुदान दिले तर धान्य, डाळी, मसाले, भाजीपाला या सर्व चांगल्या दर्जाच्या वस्तू खरेदी करून हे बचत गट मुलांना दररोज सकस आणि गरम आहार देऊ शकतात. उलट यातून मुलांना दररोज नवा आहार मिळेल.

उदाहरणार्थ, एखाद्या गावात वाटाण्याचे पीक असेल तर त्यातून उसळ बनेल. गाजराचे पीक असेल तर गाजराचा हलवा, गव्हाची लापशी देता येईल. गावात दूध उपलब्ध असते. त्याची खीर देता येईल. गावातील धान्य, भाजीपाला यालाही जागेवर बाजारपेठ मिळेल. गावातील दुकानांनाही व्यवसाय मिळेल. म्हणजे शासनाने एक ठेकेदार बाजूला काढला तर एवढी मोठी साखळी उभी राहील आणि गावपातळीवर जगेल. ग्रामीण व शहरी अशा दोन्ही भागांत हे करता येईल. एका बचत गटाला एक शाळा, एक अंगणवाडी असे धोरण ठेवता येईल. राज्यात शहरी व ग्रामीण भागांत मिळून सरकारी व अनुदानित ८९ हजार शाळा आहेत. म्हणजे एवढ्या बचत गटांना काम मिळेल. 

याशिवाय कामगार कल्याण विभाग कामगारांना दररोज मध्यान्ह आहार पुरवितो. त्या योजनेतही असेच पुरुष ठेकेदार घुसलेेे आहेत. तेथेही ही पद्धत अवलंबणे शक्य आहे. रेल्वेस्थानक, बसस्थानक, शासकीय कार्यालये येथील कॅन्टीनही महिला बचत गट चालवू शकतात. 

आणखी एक हताश करणारी बाब म्हणजे अनेक कार्यालये, खासगी हॉस्पिटल्स येथील साफसफाई महिला करतात; पण त्याचे कंत्राट मात्र पुरुष ठेकेदारांनी घेतलेले असते. स्त्रीवादी चळवळ सांगते, महिलांना केवळ चूल व मूल यांत अडकविणे ही असमानता आहे. ती असमानता तर जिवंत आहेच. पण, जेथे पैसा आहे तेथे महिलांना मागे सारून पुरुष किचनमध्ये घुसतात हे पुरुषसत्ताक पद्धतीचे आणखी एक नवेच मॉडेल आहे. 

बबनराव ढाकणे हे राज्यात दुग्धविकास मंत्री असताना त्यांनी महिलांच्या सहकारी दूध संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा शरद पवार मुख्यमंत्री होते. पण हे महिला दूध संघ टिकले नाहीत. आज खेडोपाडी दुधाचा धंदा खऱ्या अर्थाने महिला सांभाळतात. पण, गावातील सहकारी डेअरी मात्र पुरुषांच्या ताब्यात आहे. - महिला दिनानिमित्त ही विसंगती पाहिली जाणार आहे का? sudhir.lanke@lokmat.com

टॅग्स :foodअन्न