लबाडी, द्वेषाशी लढलेल्या पाच योद्ध्यांची कहाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 07:14 IST2025-12-11T07:13:17+5:302025-12-11T07:14:14+5:30
आपल्या विचारांवर ठाम असलेल्या या पाच समाजवाद्यांनी सत्ताधीशांशी संघर्ष करण्याचाच मार्ग स्वीकारला आणि विखारी राजकारणाशी अखेरपर्यंत झुंज दिली.

लबाडी, द्वेषाशी लढलेल्या पाच योद्ध्यांची कहाणी
योगेंद्र यादव, राष्ट्रीय संयोजक, भारत जोड़ो अभियान, सदस्य, स्वराज इंडिया
सरता सरता, २०२५ हे वर्ष देशभरातील समाजवादी कुटुंबाला पोरके करून गेले. या वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांत, समाजवादी आंदोलनाच्या परंपरेचे उद्गाते असलेले पाच समाजवादी नेते आपल्याला सोडून गेले. त्यांच्यापैकी कुणीच पारंपरिक अर्थाने राजकीय नेते नव्हते; परंतु जे-जे कल्याणप्रद ते-ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करणे हेच खरे राजकारण असेल तर मग या सर्वांचे स्मरण आपण ‘राजकीय नेते’ म्हणूनच करायला हवे.
शंभरी पार केलेले डॉ. जी. जी. पारीख गेल्या २ ऑक्टोबर रोजी निवर्तले. त्यानंतर नोव्हेंबरात ९७ वर्षीय सच्चिदानंद सिन्हा यांनी मुजफ्फरपुरात अंतिम श्वास घेतला. पाठोपाठ प्रा. सतीश जैन यांचे आग्रा येथे निधन झाले. त्यानंतर पन्नालाल सुराणा आणि लगेच डॉ. बाबा आढाव हेही आपल्यातून निघून गेल्याचे वृत्त धडकले. दोघेही वयाच्या नव्वदीत होते. हे पाचही नेते नरेंद्र देव-जयप्रकाश-लोहिया यांच्या समाजवादी परंपरेचे वारसदार होते. समाजवादी राजकारणाच्या संस्कारातूनच त्या सर्वांची घडण झाली होती. समताधारित समाजनिर्मितीवरील त्यांची निष्ठा अखेरपर्यंत अबाधित होती; परंतु यातील कुणीच सत्तेच्या राजकारणात शिरले नाही.
समाजवादी पक्षांतील ज्येष्ठ आणि मान्यवर सदस्य असूनही जी. जी. पारीख किंवा सच्चिदानंद सिन्हा यांनी स्वतः कधी निवडणूक लढवली नाही. बाबा आढाव केवळ एकदा आणि पन्नालाल सुराणा बऱ्याचदा निवडणुकीला उभे राहिले असले, तरी निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी कधीही नैतिक तडजोडी केल्या नाहीत. निवडणूक हेच राजकारणाचे सर्वस्व न मानता, त्यांनी तिचा वापर प्रबोधनाचे आणि संघटना बळकट करण्याचे एक साधन म्हणून केला. समाजवादी आंदोलन विस्कळीत झाल्यानंतर यांच्यापैकी कुणीच एखाद्या मोठ्या पक्षात शिरले नाहीत. आपण निवडलेला मार्ग सत्ता किंवा लौकिक यश मिळवून देणारा मुळीच नाही, याची पुरेपूर जाणीव असूनही छोट्या; परंतु आदर्शवादी समाजवादी गटांत राहणे त्यांनी पसंत केले. या काळात समाजवादी आंदोलनातील अनेक नेते भाजपच्या मांडीवर जाऊन बसले. इतर काहींनी या ना त्या सबबीखाली जातीयवादी राजकारणाशी सोयिस्कर तडजोडी केल्या; परंतु आपल्या विचारांवर ठाम असलेल्या या पाच समाजवाद्यांनी आयुष्यभर सत्ताधीशांशी संघर्ष करण्याचाच मार्ग स्वीकारला आणि लबाडी व द्वेषाने भरलेल्या राजकारणाशी अखेरपर्यंत झुंज दिली.
समाजवादी आंदोलनाच्या या सैनिकांनी समताधारित समाजाची निर्मिती करण्यासाठी आपापली वेगवेगळी क्षेत्रे निवडली. बाबा आढाव यांनी असंघटित क्षेत्रातील मजुरांना न्याय मिळवून देणाऱ्या ऐतिहासिक लढ्याचे नेतृत्व केले. रिक्षाचालक आणि हमालांची संघटना बनवून त्यांना सन्माननीय वेतन मिळवून दिले. जोडीला स्वस्त दरात भोजन मिळण्याचीही सोय करून दिली. त्यांच्यासाठी महाराष्ट्रात एक खास कायदा करून घेतला.
जीजींनी युसूफ मेहेर अली केंद्र उभारून त्याद्वारे आदिवासी समाजात सार्वजनिक आरोग्य, शिक्षण आणि सहकाराचा एक नमुना सादर केला. सच्चिदानंद सिन्हा आणि सतीश जैन यांनी विचारनिर्मिती आणि प्रसार हे क्षेत्र निवडले. सच्चिदाजींचा जन्म बिहारातील स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबात झाला होता. त्यांनी आयुष्यभर समाजवादी चळवळीचा प्रसार आणि परिष्करण केले. अंतर्गत वसाहतवाद, जातिव्यवस्थेचे बदलते रूप, आघाडीच्या राजकारणाची आवश्यकता आणि आधुनिक सभेच्या पोकळपणाची मांडणी याबरोबरच कला आणि सौंदर्यशास्त्र या विषयांवर त्यांनी केलेल्या मौलिक लेखनासाठी ते सदैव स्मरणात राहतील. अमेरिकेतून अर्थशास्त्राचे शिक्षण घेऊन आल्यानंतर, मार्क्सवादी विचारसरणीकडे झुकलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शिकवत असूनही, प्रा. सतीश जैन यांनी गांधीवादी-समाजवादी विचारांचा आणि विकासाच्या एका अनोख्या नमुन्याचा शोध चालूच ठेवला.
पन्नालाल सुराणा तर समाजवादी कार्यकर्त्यांचे चालते-बोलते विद्यापीठ होते. प्रत्येक प्रश्नावर नवी पुस्तिका लिहिणे आणि कार्यकर्त्यांचे वैचारिक संगोपन करणे हे त्यांचे अद्वितीय जीवितकार्य होते.
या पिढीच्या दृष्टीने समाजवाद म्हणजे केवळ एक विचारसरणी नव्हती. ती त्यांची जीवनशैली होती. वेगवेगळ्या क्षेत्रांत स्वतःला झोकून देत असताना या सर्वांनी समता आणि साधेपणा ही तत्त्वे जीवनमूल्ये म्हणून अंगिकारली. सतीश जैन हे ‘जेएनयू’मधील एक प्रतिष्ठित प्राध्यापक होते. तरीही त्यांचा साधेपणा पाहण्यासारखा होता. सच्चिदानंदजींनी आयुष्याची शेवटची चाळीस वर्षे मुजफ्फरपूर जिल्ह्यातील मनिका नावाच्या छोट्याशा गावात एखाद्या सामान्य खेडुताप्रमाणे व्यतीत केली. पन्नालाल शेवटपर्यंत एस.टी. बसेसच्या गर्दीतूनच प्रवास करत राहिले. जी. जी. पारेख आणि बाबा आढाव यांच्या जीवनातही अपरिग्रहाचे हेच तत्त्व साकार झाल्याचे दिसून येते. अशी सुंदर सुमने गळून पडतात तेव्हा नैराश्य दाटून येणे स्वाभाविक आहे; पण या सर्वांनी नव्या पिढीतील कार्यकर्त्यांच्या मनात समाजवादी विचारांचे आणि नैतिकतेचे संस्कार रुजवले. या फुलांनी सर्वदूर उधळलेल्या बीजांतून फुटलेले अंकुर देशाचे सार्वजनिक जीवन दीर्घकाळ समृद्ध करत राहतील.