विनम्रता, निष्कलंक समर्पण आणि मूर्तिमंत सौजन्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 08:23 IST2025-12-13T08:22:47+5:302025-12-13T08:23:21+5:30
पाच दशकांची नि:स्पृह कारकीर्द असलेल्या शिवराज पाटील चाकूरकर यांचे जाणे ही सौजन्यशील, मूल्यनिष्ठ राजकारणाची अत्यंत मोठी हानी आहे.

विनम्रता, निष्कलंक समर्पण आणि मूर्तिमंत सौजन्य
खा. अशोक चव्हाण
माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
निजामाच्या राजवटीत मागासलेपणाचा ठसा उमटलेल्या मराठवाड्याला नवी दिशा देण्यासाठी व प्रगतिपथावर अग्रेसर करण्यासाठी मराठवाड्यातल्या काही महान रत्नांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. यामध्ये देशाचे माजी गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण, डॉ. शिवराज पाटील चाकूरकर, विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे यांची नावे प्राधान्याने घ्यावी लागतील. मागील दोन दशकांत यापैकी तिघांनी ईहलोकाचा निरोप घेतला आणि आज शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाची मन सुन्न करणारी बातमी आली.
१२ ऑक्टोबर १९३५ रोजी जन्मलेल्या डॉ. शिवराज पाटील चाकूरकर यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण पदांवर काम केले. १९६६ मध्ये वयाच्या ३१ व्या वर्षी लातूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदावरून सुरू झालेली त्यांची कारकीर्द पंजाबच्या राज्यपालपदापर्यंत पोहोचली. १९७२ ते १९८० या काळात त्यांनी लातूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले. याच काळात विधानसभेचे उपाध्यक्ष व त्यानंतर अध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. १९८० मध्ये त्यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली. २००४ पर्यंत ते सतत सहा वेळा विजयी झाले. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. मात्र, त्यानंतरही त्यांच्यावर देशाच्या गृहमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली. या कालावधीत त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. दरम्यानच्या काळात केंद्रीय वाणिज्य, विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री म्हणून काम केले. लोकसभेचे सभापती, उपसभापती आदी पदांवर काम करण्याचा मोठा अनुभव त्यांना मिळाला. याच काळात लोकसभेचे थेट प्रक्षेपण दूरदर्शनवरून करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला व त्याची प्रभावी अंमलबजावणी केली.
त्यांच्या राजकीय जीवनात अनेक चढउतार आले. मात्र, ते कधीच नकारात्मक भूमिकेत गेले नाहीत. जवळपास पाच दशकांची त्यांची कारकीर्द निष्कलंक राहिली. राज्य व राष्ट्रीय पातळीवर त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण पदे भूषवली. मात्र, त्यांना कधीही अहंभाव साधा स्पर्शसुद्धा करू शकला नाही. शिस्त, नम्रता, साधनशुचिता व समर्पणाचे ते प्रतीक होते. त्यांच्या विनम्रतेचे व सौजन्याचे दाखले अनेक जण देत असतात. माझे वडील डॉ. शंकरराव चव्हाण व डॉ. शिवराज पाटील चाकूरकर यांचे बंधुत्वाचे नाते होते. दोघांची सार्वजनिक कारकीर्द साधारणतः १०-१५ वर्षांच्या अंतराने सुरू झाली. मात्र, त्यात संयोगाने अनेक साम्य होते.
दोघांच्याही राजकीय जीवनाची सुरुवात स्थानिक स्वराज्य संस्थांमधून झाली. डॉ. शंकरराव चव्हाण हे तत्कालीन नांदेड नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून काम करू लागले. दशकभराचा कालावधी लोटल्यानंतर शिवराज पाटील चाकूरकर यांनाही लातूर नगरपालिकेचे अध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला. दोघेही आपली कामाची शैली व जनतेप्रति समर्पणाची भावना यामुळे लोकप्रिय होते. विनम्रता, अभ्यासुवृत्ती, इतरांविषयी आदरभाव, कामाप्रति असलेले समर्पण व मराठवाड्याच्या विकासासाठीचा आग्रह असे अनेक समान गुण त्यांच्यात होते. दोघांनीही वैयक्तिक कामांपेक्षा सार्वजनिक कामांवर अधिक भर दिला.
दोघांनीही त्यांच्या राजकीय जीवनाची सुरुवात त्यांची कर्मभूमी असलेल्या जिल्ह्यातूनच केली. डॉ. शंकरराव चव्हाण जेव्हा निवडणुकीच्या रिंगणात असत तेव्हा त्यांच्या प्रचारासाठी डॉ. शिवराज पाटील चाकूरकर आवर्जून येत असत, तर डॉ. शिवराज पाटील चाकूरकर यांच्या प्रचारासाठी डॉ. शंकरराव चव्हाण लातूरला आवर्जून हजेरी लावायचे.
श्री सत्यसाईबाबा यांच्या सत्संगाचा भव्यदिव्य कार्यक्रम नांदेड येथील गुरु गोविंदसिंगजी स्टेडियमवर घेण्यात आला होता. त्यावेळी श्री सत्यसाईबाबा यांनी आपले आध्यात्मिक व्याख्यान त्यांच्या मातृभाषेत म्हणजेच तेलुगूतून केले. स्वामीजींचे व्याख्यान सुरू असतानाच डॉ. शिवराज पाटील चाकूरकर यांनी त्याचे संपूर्ण भाषांतर केले होते. डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी अनुवादकाची भूमिका पार पाडल्याचा हा प्रसंग अनेकांच्या स्मरणात कायमचा कोरला गेला.
अशा या पितृतुल्य मार्गदर्शकाचे आपल्यातून जाणे ही संपूर्ण महाराष्ट्राची विशेषतः मराठवाड्याची कधीही न भरून निघणारी हानी आहे.