विशेष लेख: म्यानमारमधील भूकंपातून आपण काय बोध घ्यावा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 14:00 IST2025-04-14T13:59:43+5:302025-04-14T14:00:35+5:30

Earthquake Mumbai: मध्यंतरी आयआयटी मुंबई यांच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग विभागाच्या मदतीने मुंबईत भूकंप झाल्यास काय परिस्थिती उद्भवेल याचा अभ्यास केला गेला.

Special Article: What lessons should we learn from the earthquake in Myanmar? | विशेष लेख: म्यानमारमधील भूकंपातून आपण काय बोध घ्यावा?

विशेष लेख: म्यानमारमधील भूकंपातून आपण काय बोध घ्यावा?

-सीताराम कुंटे (माजी मुख्य सचिव)
नुकताच म्यानमार आणि थायलंडमध्ये प्रचंड भूकंप आला. त्यामुळे झालेला हाहाकार आपण बघितला. अनेक घरं पडली. त्याखाली अनेकजण दबून मरण पावली. आपल्या शेजारी देशात नेपाळ आणि पाकिस्तानात काही वर्षांपूर्वी भूकंपामुळे प्रचंड नुकसान झालेले आपण पाहिले आहे. दिल्लीत आणि उत्तर भारतात भूकंपाचे सौम्य धक्के अधूनमधून बसत असतात. गुजरातच्या भूजला २००१ मध्ये प्रलयंकारी भूकंपाचा तडाखा बसला. 

महाराष्ट्रात कोयना (१९६०) आणि लातूरला १९९३ मध्ये भूकंप येऊन गेला आहे. आपण या सर्वांतून काय बोध घ्यावा? तर भूकंपाच्या धोक्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. आपण राहतो त्या घरांच्या सुरक्षिततेची खबरदारी घेतली पाहिजे. 

भूकंपाच्या संदर्भात बरेच संशोधन झाले आहे. प्रत्येक भागाची भूकंप प्रवणता शास्त्रज्ञांनी निर्धारित केली आहे. भारतातील भूभागाचे मूल्यांकन करून एकूण चार भागात भूकंप प्रवणता दर्शविण्यात आली आहे. झोन २, ३, ४ व ५. त्यापैकी झोन २ हे सर्वांत कमी धोक्याचे, तर झोन ५ हे सर्वाधिक धोक्याचे मानले गेले आहे. 

महाराष्ट्राचा विचार केला तर जीएसएचएपी हझार्ड मॅप ऑफ महाराष्ट्रप्रमाणे मध्य व पूर्व महाराष्ट्र झोन २ मध्ये आहे, म्हणजे तुलनेने कमी धोक्याचा भाग आहे. मात्र सातारा, रायगड, मुंबई झोन ४ मध्ये येतात, जिथे भूकंपाचा धोका अधिक आहे. भूकंप झाल्यास त्याची तीव्रताही जास्त असण्याची शक्यता आहे. अन्य भाग झोन ३ मध्ये येतात जिथे धोक्याचं प्रमाण तुलनेने सौम्य आहे. 

दुसरा महत्त्वाचा अभिलेख म्हणजे बीएमटीपीसी व्हलनरेबिलिटी ॲटलास ऑफ इंडिया ज्यात संपूर्ण देशाची माहिती सादर केली आहे. त्यातील महत्त्वाचे म्हणजे जिल्हानिहाय हाऊसिंग व्हलनरेबिलिटी टेबल्स दिले आहेत. त्यामध्ये जिल्हानिहाय घरांची संख्या, बांधकामाच्या प्रकारनिहाय दिलेली आहे. 

बांधकामाचा प्रकार महत्त्वाचा अशासाठी की भूकंपामुळे थेट प्राणहानी होणे अत्यंत कमी असते; मात्र पडलेल्या घरांमध्ये किंवा इमारतींमध्ये ढिगाऱ्याखाली अडकून अनेक जण मृत्युमुखी पडतात. किल्लारी असो किंवा भूज; त्या ठिकाणी दगडी व कच्च्या घरांमध्ये सर्वात जास्त जीवितहानी झाली. याउलट जापानकडे पाहिले की लक्षात येते, तिथे जास्त तीव्रतेने भूकंप आले तरी जीवितहानी फार कमी असते. त्याचे कारण भूकंपाचे धोके विचारात घेऊनच घरे व इमारती बांधल्या जातात. 

बीएमटीपीसीच्या आकडेवारीचे अवलोकन करता असे लक्षात येते की अजूनही अनेक लोकं भूकंपाच्या दृष्टीने असुरक्षित घरांमध्ये वास्तव्य करीत आहेत. 

मध्यंतरी आयआयटी मुंबई यांच्या स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग विभागाच्या मदतीने मुंबईत भूकंप झाल्यास काय परिस्थिती उद्भवेल याचा अभ्यास केला गेला. त्यातून असे निदर्शनास आले की बहुमजली झोपडपट्टी आणि सेस बिल्डिंग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुन्या इमारती या सर्वांत जास्त धोकादायक आहेत. याशिवाय अशा इमारती ज्यांच्या बांधकामाच्या वेळी भूकंप प्रतिबंधक उपाययोजना करण्यात आल्या नाहीत, किंवा ज्या इमारतींची देखभाल व दुरुस्ती वेळच्या वेळी केली गेली नाही अशा सर्व इमारती लोकांच्या जिवावर बेतू शकतात. 

खरं तर आता जे बिल्डिंग कोड वापरले जातात त्यांचे तंतोतंत पालन केले तर भूकंप आला तरी जीवितहानी टाळता येऊ शकते. शिवाय असे देखील नियम आहेत की दर ३० वर्षांनी स्ट्रक्चरल ऑडिट केले गेले पाहिजे आणि त्याच्या अहवालात दर्शविल्याप्रमाणे सुधारणा केलीच पाहिजे. जपानी लोकांकडून शिकून आपणदेखील भूकंपाबाबत जास्त सजग राहू शकतो.

पुनर्विकासाच्या धोरणांचा लाभ घेऊन मोडकळीस आलेल्या इमारतीतून बाहेर पडून नवीन इमारत बांधून घ्यावी. तसेच झोपडपट्टी विकासाच्या योजना हाती घेऊन बहुमजली झोपड्यांऐवजी नवीन इमारतीत राहायला जावे. जिथे इमारती चांगल्या बांधल्या आहेत; पण जुन्या आहेत तिथल्या सोसायट्यांनी वेळोवेळी नियमानुसार स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. 

भूकंपाचा अंदाज लावता येत नाही, तो नकळत येऊन आपले जीवन क्षणार्धात उद्ध्वस्त करू शकतो. म्हणूनच भूकंपाचे धोके ओळखून परिस्थितीप्रमाणे योग्य ती पावले उचलणे क्रमप्राप्त आहे.

Web Title: Special Article: What lessons should we learn from the earthquake in Myanmar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.