विशेष लेख: व्यवस्थेच्या डोळ्यांत डोळे घालून प्रश्न विचारणारा महात्मा... महात्मा जोतिबा फुले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 11:53 IST2026-04-11T11:52:35+5:302026-04-11T11:53:17+5:30

विद्येविना गेलेली मती जोतिबांनी पुन्हा मिळवून दिली, म्हणूनच आजचा बहुजन समाज ताठ कण्याने उभा आहे, हे ध्यानी ठेवले पाहिजे!

Special Article: The Mahatma who looked into the eyes of the system and asked questions... Mahatma Jyotiba Phule! | विशेष लेख: व्यवस्थेच्या डोळ्यांत डोळे घालून प्रश्न विचारणारा महात्मा... महात्मा जोतिबा फुले!

विशेष लेख: व्यवस्थेच्या डोळ्यांत डोळे घालून प्रश्न विचारणारा महात्मा... महात्मा जोतिबा फुले!

प्रा. ज्याेती वाघमारे, खासदार, राज्यसभा

भारतीय इतिहासाच्या क्षितिजावर जेव्हा अज्ञानाचा आणि विषमतेचा काळोख दाटलेला होता, तेव्हा त्या अंधाराला भेदून प्रकाशाची पहिली ठिणगी ज्या महापुरुषाने टाकली, ते महात्मा जोतिबा फुले. आज आपण त्यांची २००वी जयंती साजरी करीत आहोत. हे केवळ एका महापुरुषाच्या स्मरणाचे वर्ष नाही, तर त्यांनी मांडलेल्या समतेच्या, विज्ञानाच्या आणि माणुसकीच्या मांडणीचा पुनरारंभ करण्याचे वर्ष आहे.

क्रांतीचा सूर्य पुण्याच्या भिडेवाड्यात उगवला आणि त्याची धग आजही विषमतेच्या भिंती जाळत आहे. जोतिबा केवळ एक समाजसुधारक नव्हते, तर ते आधुनिक भारताचे पहिले ‘सकळ शास्त्रसंपन्न’ क्रांतिकारक होते. जोतिबांच्या कार्याचा पाया हा ‘शिक्षण’ होता; परंतु त्यांचे शिक्षण केवळ अक्षरांची ओळख करून देण्यापुरते नव्हते. त्यांच्या मते, शिक्षण हे शोषितांच्या हाती दिलेले अस्त्र होते. ‘विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली...’ या ओळींमधून त्यांनी शिक्षणाचा समाजशास्त्रीय कार्यकारणभाव मांडला. हा विचार आजही जागतिक स्तरावर अमान्य करता येत नाही. ज्या समाजात ज्ञानावर एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी असते, तिथे लोकशाही कधीच रुजू शकत नाही हे त्यांनी ओळखले हाेते. १ जानेवारी १८४८ रोजी भिडेवाड्यात सुरू झालेली मुलींची पहिली शाळा ही केवळ एक शैक्षणिक संस्था नव्हती, तर ती हजारो वर्षांच्या पितृसत्ताक आणि वर्णवर्चस्ववादी मानसिकतेला दिलेले खुले आव्हान होते.

२४ सप्टेंबर १८७३ रोजी जोतिबांनी स्थापन केलेला सत्यशोधक समाज ही शोषितांच्या आत्मभानाची मोठी चळवळ होती. जोतिबांनी ‘निर्मिक’ (The Creator) ही संकल्पना मांडली. त्यांनी सांगितले की, सर्व मानव एकाच निर्मात्याची लेकरे आहेत, त्यामुळे कोणालाही मध्यस्थ (पुरोहित) मानण्याची गरज नाही. ज्या काळात विचार करणे गुन्हा होता, त्या काळात जोतिबांनी व्यवस्थेच्या डोळ्यांत डोळे घालून प्रश्न विचारण्याचे धाडस दिले. 

जोतिबांचे साहित्य हा शोषितांच्या दुःखाचा आणि संघर्षाचा दस्तऐवज आहे.  त्यांनी ‘बळीराजा’ हा कष्टकऱ्यांचा सांस्कृतिक नायक म्हणून उभा केला. तत्कालीन संस्कृतप्रचुर भाषेला नाकारून बहुजनांच्या बोलीभाषेला साहित्यात प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांनी मांडलेले तत्त्वज्ञान हे सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत होते. ‘शेतकऱ्याचा आसूड’ (१८८३) या ग्रंथातून त्यांनी शेतकऱ्यांच्या शोषणाची कारणे सांगितली. सावकारी पाश, अस्मानी संकटे आणि सुलतानी जुलूम यावर त्यांनी कडाडून प्रहार केला. 

जोतिबांचा स्त्री-मुक्तीचा विचार केवळ शाळा काढण्यापुरता मर्यादित नव्हता. त्यांनी सावित्रीबाईंना शिक्षित करून त्यांना वैचारिक सहचारी म्हणून उभे केले. ‘बालहत्या प्रतिबंधकगृह’ स्थापन करून सामाजिक बहिष्कार सोसणाऱ्या स्त्रियांना आश्रय दिला. एका  विधवा स्त्रीच्या मुलाला (यशवंत) दत्तक घेऊन  रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते श्रेष्ठ असल्याचे सिद्ध केले. ही कृती आजच्या काळातील कोणत्याही मानवी हक्क चळवळीपेक्षा कितीतरी मोठी आणि क्रांतिकारी होती.

जोतिबांनी ब्रिटिश राजवटीचे विश्लेषण अत्यंत बारकाईने केले होते. ब्रिटिशांमुळे शिक्षणाची दारे उघडली, हे मान्य करतानाच त्यांनी सावध केले की, सरकारी नोकऱ्यांमध्ये पुन्हा तेच लोक बसले आहेत जे शेतकऱ्यांचे शोषण करतात. भारतातील पहिली कामगार संघटना उभी करण्यात जोतिबांच्या विचारांचा मोठा वाटा होता. कामगारांना सुटी मिळावी, त्यांच्या कामाचे तास निश्चित असावेत, ही मागणी सर्वप्रथम जोतिबांच्याच विचारसरणीतून पुढे आली. ११ मे १८८८ रोजी मुंबईच्या कोळीवाड्यात एका प्रचंड जनसमुदायाने जोतिबांना ‘महात्मा’ ही पदवी बहाल केली.

ही पदवी कोणत्याही राजाने किंवा सत्तेने दिलेली नव्हती, तर ती ज्यांच्यासाठी जोतिबा आयुष्यभर लढले, त्या कष्टकरी जनतेने दिलेली कृतज्ञता पावती होती. विद्येविना गेलेली मती जोतिबांनी पुन्हा मिळवून दिली, म्हणूनच आजचा बहुजन समाज ताठ कण्याने उभा आहे. महात्मा फुलेंची २०० वी जयंती साजरी करत असताना केवळ त्यांच्या प्रतिमेचे पूजन करणे पुरेसे नाही. समाजातील अंधश्रद्धा आणि जातीय विद्वेष संपवण्यासाठी जोतिबांच्याच मार्गाने चालावे लागेल. जात, धर्म आणि लिंगाच्या पलीकडे जाऊन माणसाला माणूस म्हणून ओळखणे, हीच जोतिबांना खरी श्रद्धांजली ठरेल.

Web Title : महात्मा फुले: व्यवस्था पर सवाल उठाने वाली निडर आवाज; विशेष लेख।

Web Summary : ज्योतिबा फुले, समाज सुधारक, ने शिक्षा को सशक्तिकरण का उपकरण माना। उन्होंने जाति भेद का विरोध किया, महिलाओं के अधिकारों की वकालत की, और सामाजिक मानदंडों को चुनौती देने के लिए सत्यशोधक समाज की स्थापना की। उनका कार्य समानता और सामाजिक न्याय की लड़ाई को प्रेरित करता है।

Web Title : Mahatma Phule: A fearless voice questioning the system; a special article.

Web Summary : Jyotiba Phule, a pioneer of social reform, championed education as a tool for empowerment. He fought against caste discrimination, advocated for women's rights, and established the Satyashodhak Samaj to challenge societal norms. His work continues to inspire the fight for equality and social justice.