विशेष लेख: समृद्धी, नवोन्मेषाच्या संवर्धनासाठी खुलेपणा हवाच, हाच मानवाच्या इतिहासाचा धडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 11:14 IST2025-11-05T11:13:57+5:302025-11-05T11:14:20+5:30
मुक्त समाजांची भरभराट होते आणि बंदिस्त समाजांची प्रगती खुंटून त्यांचा ऱ्हास होण्याचा धोका असतो, हाच मानवाच्या इतिहासाचा धडा आहे. : उत्तरार्ध

विशेष लेख: समृद्धी, नवोन्मेषाच्या संवर्धनासाठी खुलेपणा हवाच, हाच मानवाच्या इतिहासाचा धडा
शशी थरूर, ज्येष्ठ काँग्रेस नेते, खासदार
जगभरातील ज्या संस्कृतींनी खुलेपणा स्वीकारला, त्यांचीच भरभराट झाली. याउलट ज्या संस्कृतींनी दारे मिटून घेतली, त्यांचे वैभवही लयास गेले, असा निष्कर्ष संशोधनाअंती काढणाऱ्या जोहान नोबर्ग या स्वीडिश इतिहासकारांच्या Peak Human या पुस्तकाबाबत आपण कालच्या पूर्वार्धात समजून घेतले. भारतीय संदर्भातही या विधानाचा प्रत्यय सातत्याने येतोच येतो. खुलेपणामुळे समृद्धी आणि सांस्कृतिक प्रगती कशी साधता येते, याचे आणखी एक उदाहरण म्हणून नवव्यापासून तेराव्या शतकापर्यंत भरभराटीस आलेल्या चोल साम्राज्याकडे बोट दाखवता येईल. राजराजा चोल (पहिला) आणि राजेंद्र चोल (पहिला) यांसारख्या राजांच्या राजवटीत चोल साम्राज्याचा प्रचंड विस्तार झाला. त्यात श्रीलंका, मालदीव आणि आग्नेय आशियातील काही प्रदेशांचाही समावेश होता.
सागरी सामर्थ्य आणि व्यापाराचे विस्तृत जाळे यासाठी चोलांची ख्याती होती. त्यांनी अग्नेय आशिया, चीन आणि अरबी समुद्रातील द्वीपकल्पांबरोबर व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते. त्याद्वारे वस्तू, कल्पना आणि तंत्रज्ञान यांची सुलभ देवाणघेवाण होत असे. खुल्या आंतरराष्ट्रीय व्यापारामुळेच याही साम्राज्याच्या वैभवात भर पडली होती. चीनच्या त्सांग यांच्याप्रमाणेच चोल राजेही केवळ गुणवत्तेच्या आधारावर आपले अधिकारी निवडत असत. त्यामुळे महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर सक्षम माणसांचीच निवड होऊन राज्याला प्रशासकीय कार्यक्षमता व स्थैर्य लाभत असे. भिन्नभिन्न सांस्कृतिक प्रवाहांना साम्राज्यात मुक्तद्वार असल्याने त्यांच्या बौद्धिक आणि कलात्मक परंपरा समृद्ध बनल्या. कवी, विद्वान, कलाकार यांना राजाश्रय लाभल्याने चैतन्यशील सांस्कृतिक पर्यावरणाचे संवर्धन झाले. साहित्य आणि अन्य कलांमध्ये चिरस्थायी निर्मिती होऊ शकली. शाश्वत संपत्तीच्या निर्मितीसाठी आणि संस्कृतीच्या प्रगतीसाठी खुलेपणाची नितांत आवश्यकता असते, ही बाब अधोरेखित करणारे, चोल साम्राज्य हे भारतातील महत्त्वाचे उदाहरण होय.
इ. स. १५२६ ते १८५७ मधील मुघल साम्राज्य हेही विभिन्न संस्कृतींच्या संयोगामुळे अतुलनीय भरभराट कशी होते आणि कलात्मक नवोन्मेष कसे आकाराला येतात, याचे मूर्तिमंत उदाहरण होय. एका मध्य आशियाई घराण्याने त्याची स्थापना केली होती. परंतु, स्थानिक भारतीय समाजात पूर्ण सामावून गेल्यामुळेच हे साम्राज्य इतके दीर्घकालीन यश प्राप्त करू शकले. मुघलांनी चलनाचे प्रमाणीकरण केले. रस्त्यांचे व्यापक जाळे बांधले आणि राज्यभर तुलनेने शांतता राखली. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळाली. युरोपबरोबरचे व्यापारी संबंध बळकट झाले.
अकबराची सुलह-ए-कुल नीती ही अशा खुलेपणाचे उत्तम उदाहरण ठरेल. गैर मुस्लिमांवरील जिझिया कर त्याने रद्द केला, धर्माधर्मातील संवादाला प्रोत्साहन दिले आणि उच्च प्रशासकीय पदांवर हिंदूंच्याही नेमणुका केल्या. या समन्वयशील दृष्टिकोनामुळे तत्कालीन वास्तुकला, लघुचित्रकला, संगीत आणि पाककला यात भारतीय आणि फारसी संस्कृतीचा संगम झालेला दिसतो. मध्ययुगीन भारतातील, केवळ व्यक्तिगत भक्तीवर भर देणाऱ्या आणि धार्मिक सीमा ओलांडणाऱ्या सुफी आणि भक्तीपंथीय आंदोलनांनीही या काळात जोर धरला. या ‘गंगा जमुना तहजीब’मुळे भारताचे सांस्कृतिक वस्त्र अधिकच भरजरी झाले.
ही भारतीय उदाहरणे नोबर्गने दिलेली नाहीत. तरीही समृद्धी आणि नवोन्मेष यांच्या संवर्धनासाठी खुलेपणाची आवश्यकता ठळकपणे मांडत असल्याने त्याचे पुस्तक अत्यंत समयोचित ठरते. १९९०पासून माणसांच्या राहणीमानात होत असलेली असाधारण प्रगती पाहता, सांप्रतचे युग हेच निःसंशयपणे सर्वश्रेष्ठ सुवर्णयुग आहे. जागतिकीकरणाचे हे युग, सहकार्य आणि विकास यांच्या अभूतपूर्व संधी घेऊनच आले आहे. परंतु, सध्या अलगतावाद, संरक्षणवाद आणि मुक्त प्रश्नांना आडकाठी यामुळे आपण मिळवलेले यश धोक्यात आले आहे. मुक्त समाजांची भरभराट होते आणि बंदिस्त समाजांची प्रगती खुंटून त्यांचा ऱ्हास होण्याचा धोका असतो, हा इतिहासाचा धडा आहे. खुलेपणा स्वीकारूनच आपण भारतीय लोक समृद्ध आणि गतिशील भविष्य घडवत राहू शकू. संकुचितपणा, फाजील धर्माभिमान किंवा दारमिटू परद्वेषाधीन दृष्टिकोन आपली हानीच करेल. नोबर्गच्या शब्दात, ‘नियती नव्हे तर आपली निवडच आपले अपयश निश्चित करते.’