शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदी 9 जूनला तिसऱ्यांदा घेणार PM पदाची शपथ, या 7 देशांचे नेते होणार सहभागी; अशी असेल सुरक्षा व्यवस्था
2
Sanjay Raut : "ईडी, CBI या भाजपाच्या एक्सटेंडेड ब्रांच, प्रफुल्ल पटेल यांना..."; संजय राऊतांचा खोचक टोला
3
T20 World Cup 2024 : पाकिस्तान क्रिकेटसाठी सर्वात वाईट दिवस; वसीम अक्रमची संतप्त प्रतिक्रिया
4
"मी फक्त म्हातारी नाही, तर तरुण मुलाला..."; 12 वर्षांचं अंतर, मलायकाचं ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
5
Manoj Jarange Patil : "...तर विधानसभा निवडणुकीत सर्व जातीधर्माचे उमेदवार देणार, तेव्हा नावे घेत उमेदवार पाडणार"
6
नरेंद्र मोदींच्या विजयानं भरला राहुल गांधींचा खिसा, केवळ 3 दिवसांत झाला लाखो रुपयांचा फायदा!
7
Prashant Kishor : "४०० पारचा नारा अपूर्ण"; BJP चा आलेख घसरण्याला कोण जबाबदार? प्रशांत किशोर म्हणाले...
8
'समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही!' अंगावर शहारे आणणारा 'आम्ही जरांगे' सिनेेमाचा ट्रेलर रिलीज
9
Video - दिल्लीतील फूड फॅक्ट्रीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू, ६ जण जखमी
10
कंगनासोबत झालेल्या घटनेवर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया, म्हणाले, "ती फक्त खासदार नाही..."
11
Chandrababu Naidu कुटुंबाची संपत्ती ५ दिवसांत ₹८७० कोटींनी वाढली, 'या' शेअरमुळे बक्कळ कमाई
12
भीषण अपघात! आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर भाविकांनी भरलेली बस उलटली, 30 जण जखमी
13
BAN vs SL : १२५ धावांचे लक्ष्य पण संघर्ष मोठा; अखेर बांगलादेशचा विजय, श्रीलंकेचा दुसरा पराभव
14
AFG vs NZ Live : 75 ALL OUT! अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी न्यूझीलंडला लोळवलं; राशिद-नबीने सामना गाजवला
15
Ramoji Rao : रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजी राव यांचं निधन, ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
16
AFG vs NZ : अफगाणिस्ताननं इतिहास रचला! पहिल्यांदाच न्यूझीलंडला घाम फोडला, राशिदच्या संघानं गड जिंकला
17
Ram Bhajan: मन अस्वस्थ, उद्विग्न, अशांत असेल तेव्हा 'ही' रामस्तुती ऐका आणि म्हणा; त्वरित लाभ होईल!
18
"प्रिया बेर्डेने परवानगी दिली तरच.."; लक्ष्याला AI रुपात चित्रपटात आणण्यावर महेश कोठारेंचं वक्तव्य
19
स्मृती इराणी यांच्या ‘त्या’ शब्दांनी लिहिली पराभवाची कहानी
20
...म्हणून भारताला पाकिस्तानविरूद्ध नक्कीच फायदा होईल; सिद्धूंनी सांगितला खेळ भावनांचा

लेख: मिस्टर मूर्ती, आठवड्यात सत्तर तास काम? आपल्याला ‘वर्कोहोलिक’ समाज हवाय की...?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2023 8:32 AM

आठवड्याचे सत्तर-ऐंशी तास वर्षानुवर्षे काम करण्याचे शरीर, मन आणि जवळच्या नातेसंबंधांवर अनेक गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

प्रसाद शिरगावकर, आंतरराष्ट्रीय स्तरावर मुक्तस्रोत तंत्रज्ञान, प्रशिक्षक आणि वक्ते

‘तरुणांनी आठवड्याला सत्तर तास काम करून राष्ट्रउभारणीत योगदान दिलं पाहिजे,’ अशा आशयाचं विधान ‘इन्फोसिस’चे संस्थापक नारायण मूर्ती यांनी अलीकडे प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीत केलं. त्या विधानावरून आठवड्यात कामाचे तास किती असावेत, याबद्दल अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक उद्योजक मंडळी या विधानाच्या समर्थनार्थ बोलत आहेत, तर सोशल मीडियावर श्री मूर्ती यांची आणि सत्तर तास कामाच्या प्रस्तावाची खिल्ली उडविणाऱ्या मीम्सचा पूर आला आहे.

खरं तर प्रत्येकाच्या करिअरमध्ये  असे काही टप्पे असतात, जेव्हा आपण किती वेळ आणि किती कष्ट करून काम करतो आहोत याचा विचार करायलाही वेळ नसतो.  दिवसाचे १२-१४-१८ तासही काम करावं लागतं, करणं गरजेचं असतं.  सुरुवातीच्या काळात नव्याने काही शिकायचं असतं, स्वतःला सिद्ध करायचं असतं तेव्हा घड्याळाकडे न बघता काम करावं लागतं किंवा करावंच माणसाने. हे करणाऱ्या माणसांची भरपूर प्रगती होताना दिसते.  करिअर व्यवस्थित सुरू असतानाही एखाद्या प्रोजेक्टच्या किंवा प्रासंगिक कामांच्या गरजेनुसारही ठरलेल्या तासांपेक्षा खूप जास्त वेळ काम करावं लागतं. एखादा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होत नसेल, काही अडचणींमुळे एखादा सहकारी काम करू शकत नसेल अशा एक ना अनेक कारणांनी एखाद्या प्रोजेक्टवर प्रचंड वेळ काम करावं लागतं. अशावेळी तासांचा हिशेब अन् कष्टाची पर्वा न करता प्रोजेक्ट यशस्वीपणे पूर्ण करण्याची कमिटमेंट पाळणारे लोक प्रगती करीत राहतात.

आयुष्यात चढ-उतार होतात, मोठी कौटुंबिक संकटं येतात, आर्थिक फटके बसतात; अशावेळी कंबर कसून अहोरात्र काम करावं लागतं. अहोरात्र काम करून स्वतःला आणि कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढावं लागतं. या काही विशिष्ट परिस्थिती, अवस्था आणि अपवादात्मक परिस्थितींमध्ये कोणालाही आठवड्याला सत्तरहून जास्त तास काम करावं लागतं, तेव्हा करावंच; मात्र सातत्याने आयुष्यभर इतकं काम करणं ही शाश्वत जीवनशैली होऊ शकत नाही, तसा कुणी विचारही करू नये.

आठवड्याला सत्तर तास काम म्हणजे आठवड्याचे सहा दिवस सुमारे बारा तास काम. मोठ्या शहरांमध्ये घर ते ऑफिस प्रवास किमान तासाभराचा असतो. म्हणजे दिवसाचे चौदा तास कामासाठी माणूस घराबाहेर असणार. उरलेल्या दहा तासांत आठ तास झोप आणि दोन तास आन्हिकं उरकणं, जेवण इत्यादींसाठी. म्हणजे आठवड्यातले सहा दिवस पूर्णपणे कामासाठी झोकून देऊन कुटुंबासाठी आणि स्वतःसाठी एकही क्षण देता येणं शक्य नाही. स्वतःचं आरोग्य, मनोरंजन आणि समाजासाठी काही वेळ वगैरे तर पूर्णपणे विसरूनच जावं या जीवनशैलीत. स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी काहीही वेळ देता येणं शक्य नसेल तर हे इतकं काम आयुष्यभर सातत्याने का करावं कोणीही?

आठवड्याचे सत्तर-ऐंशी तास  वर्षानुवर्षे काम करण्याचे शरीर, मन आणि जवळच्या नातेसंबंधांवर अनेक गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. अंगमेहनतीचं काम करीत असू तर शारीरिक थकवा येणे, बैठं काम असेल तर लठ्ठपणा, मधुमेह, रक्तदाब यांच्यासारखे जीवनशैलीसंबंधी आजार बळावणं हे अतिकामामुळे होऊ शकतं. शिवाय मानसिक थकवा, नैराश्यग्रस्तता अथवा ‘बर्न आऊट’ होणं हेही घडू शकतं. सातत्याने अतिकाम करणाऱ्या व्यक्तीला कुटुंबासाठी आणि जिवलग नात्यांसाठी द्यायला वेळ नसतो. कोणतंही नातं हे भावनिक देवाण-घेवाणीवर अवलंबून असतं. नात्यातील दोन्ही बाजूंनी पुरेशी देवाण-घेवाण नियमितपणे होत असेल तर नातं टिकतं आणि समृद्ध होत राहतं. जवळची नातीच समृद्ध आणि भक्कम नसतील तर अतिकाम करून प्रचंड पैसे का आणि कशासाठी कमवायचे? आयुष्याच्या शेवटी एकही व्यक्ती ‘मी ऑफिसमध्ये आणखी जास्त वेळ घालवायला हवा होता’ असं म्हणताना दिसत नाही!

‘तरुणांनी राष्ट्रउभारणीसाठी सत्तर-सत्तर तास काम केलं पाहिजे’ हे प्रेरणादायी वाक्य म्हणून ठीक आहे; पण अशा पद्धतीने काम करणाऱ्या युवकांच्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक आरोग्याचं काय करावं, यावरही विचार केला पाहिजे. आपल्याला अहोरात्र काम करणाऱ्या ‘वर्कोहोलिक’ तरुणांचा समाज तयार करायचा आहे की भावनिक संतुलन असलेल्या, समृद्ध नातेसंबंध असलेल्या आणि समाजाशी बांधिलकी असलेल्या तरुणांचा समाज तयार करायचा आहे? - हा विचार न केल्यास, प्रचंड वेळ काम करून अफाट आर्थिक समृद्धी निर्माण केली आहे; पण तिचा उपभोग घेण्यास वेळही नाही अन् तेवढी भावनिक प्रगल्भताही नाही, असा समाज निर्माण होण्याचा धोका आहे.

आवश्यकता असेल तेव्हा आठवड्यातील तासांकडे न बघता झटून काम करणं हे करावंच लागतं प्रत्येकाला अन् करावंच ते; पण सातत्यानं अतिकाम करणं, तशी सवय लागणं किंवा नियमामुळे ते करावं लागणं हे व्यक्ती आणि समाज दोघांच्याही आरोग्यावर दूरगामी घातक परिणाम करू शकतं. आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेचा कामासाठीचा, स्वतःसाठीचा, कुटुंबासाठीचा आणि समाजासाठीचा वेळ यांच्यामध्ये समतोल साधणं हे खरोखर महत्त्वाचं असतं. अशा समतोलातून केवळ आर्थिकच नव्हे, तर भावनिकदृष्ट्या समृद्ध समाज निर्माण होऊ शकतो अन् असा समाज निर्माण करणं आपलं लक्ष्य असलं पाहिजे.

 

टॅग्स :Narayana Murthyनारायण मूर्तीInfosysइन्फोसिस